विद्याला विनयशी खूप बोलायचे होते. त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे होते. आणि ती संधी तिला मिळाली.
लग्नानंतरची दोघांची पहिली रात्र. दोघांना मिळालेला एकांतवास.
प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील हा एक वेगळाच क्षण असतो.
विद्याच्या मनात भीती, लज्जा व संकोच या भावना होत्या आणि त्या सर्व तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.
तिला विनयशी खूप बोलायचे होते पण विनयशी काय बोलावे? कशी सुरूवात करावी? हे तिला सुचत नव्हते.
विनय स्वतःहून काहीतरी बोलेल. असे तिला वाटत होते; पण विनयही एकदम शांत, अबोल आणि संकोचल्यासारखा दिसत होता.
थोडा वेळ असाच गेला.
विनय काही बोलत नाही. असे दिसल्यावर आपणच काहीतरी बोलावे, असे विद्याला वाटले आणि ती त्याच्याशी काहीतरी बोलणार...
तेवढ्यात,
"जे काही झाले त्यात तुझी काही चूक नव्हती. लग्न करण्याची माझी इच्छाच नव्हती; पण मी लग्न करावे. अशी माझ्या आई-बाबांची खूप इच्छा होती. त्यांच्या इच्छेसाठी मी लग्नाला तयार झालो. मी लग्न केल्यावर, त्यांना आनंद होणार होता. म्हणून मी लग्न केले. तुला आत्ताच हे सर्व सांगून मी दुखावणार नव्हतो. पण सत्य परिस्थिती सांगतो आहे. माझे मन अजूनही जे काय झाले, ते स्वीकारायला तयार नाही. तू थोडं समजून घेशील मला?"
विनय विद्याची नजर चुकवत सर्व बोलत होता.
अपेक्षेपेक्षा वेगळेच काहीतरी ऐकायला मिळाल्याने, विद्या शांतपणे सर्व ऐकत होती.
तिच्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर तिला राग आला असता व काहीतरी वेगळे उत्तर देऊन तिने आपला रागही व्यक्त केला असता.
पण विद्या आपल्या स्वभावाप्रमाणे व परिस्थिती पाहून शांत राहिली.
पण विद्या आपल्या स्वभावाप्रमाणे व परिस्थिती पाहून शांत राहिली.
विनयच्या आयुष्यात जे काही झाले त्यात खरंच विद्याची काही चूक नव्हती. उलट ती अभ्यास, परीक्षा हे सर्व सांभाळत लग्नाला तयार झाली होती. आलेल्या कठीण प्रसंगात, विनयशी लग्न करून, तिने आनंदच दिला होता.
आपल्या बोलण्यावर विद्या काही बोलणार? याची वाट न पाहता विनय बेडवर झोपून गेला.
त्याच्या अशा वागण्याचा अर्थ विद्याला स्पष्ट दिसत होता की, त्याला या विषयावर आपले काही ऐकायचे नाही व आपल्या भावनाही जाणून घ्यायच्या नाहीत.
त्याचे असे बोलणे व वागणे पाहून, विद्याने आपल्या मनातील विचार, भावना शब्दांतून व वागण्यातून व्यक्त न करता मनातच ठेवल्या.
'स्मिताच्या पळून जाण्याने विनय खूप दुखावला गेला. त्यामुळे तो असे बोलत असावा, वागत असावा.'
असा विचार करत विद्या शांतपणे बेडवर बसून राहिली.
क्रमश :
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा