चार दिवसांनी कॉलेजची परीक्षा होती, त्यामुळे विद्याला हॉस्टेलला जायचे होते. पण त्या अगोदर ती माहेरी जाणार होती आणि मग तिकडूनच हॉस्टेलला जाणार होती.
"चांगला अभ्यास कर. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. यशस्वी हो."
विद्या माहेरी जाण्यास निघाली, तेव्हा ती सासू-सासरांच्या पाया पडली आणि त्यांनी तिला असा आशीर्वाद दिला.
"पेपर लिहिताना विनयचा विचार नको करू, नाहीतर केलेला अभ्यास विसरून जाशील. विनयच्या आठवणीने पेपरात काय लिहायचे? ते वेळेवर तुला आठवणार नाही."
विद्याच्या नणंदबाई हसत हसत विद्याला म्हणाल्या.
नणंदबाईंच्या मस्करीच्या बोलण्याने विद्या लाजली व इतरांची नजर चुकवत विनयच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहू लागली. विनयच्या चेहऱ्यावर उमटलेली स्मित हास्याची लकेर पाहून तिला बरे वाटले.
"विनय, असा नुसता उभा का आहेस? विद्याला अंगणापर्यंत तरी सोडून ये."
विनयची आई विनयला म्हणाली.
विद्याच्या मनातील इच्छा सासूबाईंना कशी कळाली माहीत नाही? पण आईने सांगितलेले ऐकून विनय लगेच विद्याला निरोप द्यायला अंगणापर्यंत गेला.
आपली इच्छा पूर्ण झाली, त्यामुळे विद्याने मनातून सासूबाईंचे आभार मानले. विनयकडे प्रेमभरल्या नजरेने पाहत तिने डोळ्यांनीच त्याचा निरोप घेतला आणि माहेरी जाण्यास निघाली.
आपल्या घरी लहानाची मोठी झालेली आपली मुलगी, लग्न करून सासरी जाते आणि लग्नाला दोनच दिवस झालेले असले तरी, सासरहून पहिल्यांदा माहेरी आल्यावर ती आई वडिलांसाठी पाहुण्यासारखी होऊन जाते.
विद्या माहेरी आल्यावर,
विद्यासाठी काय काय करू? असे विद्याच्या आईला झाले होते. बाबा तर खूप खुश झाले होते. अनिकेतही ताई ताई..करत तिच्या मागे पुढे फिरत होता.
"कशी आहे सासरची मंडळी? व्यवस्थित आहे ना सगळे? काही बोलणे, त्रास वगैरे?"
आई-बाबांनी विद्याकडे तिच्या सासरची चौकशी केली.
"सर्व काही छान आहे. सर्वजण खूप चांगले आहेत."
चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणत, विद्याने आपल्या सासरविषयी आई-बाबांना सांगितले.
आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान पाहून विद्याच्या आईबाबांना आनंद झाला व चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले.
विनय आपल्याशी काय बोलला? कसे वागला? हे विद्याने आई-बाबांना सांगितले नाही. हे सर्व सांगून ती त्यांना टेन्शन देणार नव्हती. त्यामुळे सर्व चांगले आहे. असे तिने सांगितले.
'पुढे जे होईल ते बघू. सध्या आता फक्त अभ्यास महत्त्वाचा आहे.'
या विचाराने विद्या हॉस्टेलला जाण्याच्या तयारीला लागली.
आपल्या गळ्यातील मंगळसूत्र व पायातील जोडवी पाहून कॉलेजच्या व हॉस्टेलच्या मैत्रिणींनी काही विचारले तर काय सांगू? याची मनात जुळवाजुळव करू लागली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा