Login

लग्नगाठ भाग 35

About Love And Marriage
"अगं मीनल, सविताने आपल्याला तिच्या प्रेमाबद्दल व लग्नाबद्दल काही सांगितले नाही. म्हणून तू नाराज आहेस. तिचा तुला राग आला आहे. पण तिचाही काही प्रॉब्लेम असेल म्हणून तिने आपल्याला सांगितले नसेल. आपण तिच्या मैत्रिणी आहोत. आपण तिला समजून घ्यायला हवे.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही प्रॉब्लेम असतात, जे इतरांना नाही सांगू शकत. तू आता हा सर्व विषय मनातून काढून टाक आणि अभ्यासात लक्ष दे बरं."

विद्याने मीनलला समजावून सांगितले.

सविताच्या वागण्याचा मीनलला इतका राग आला आणि माझे लग्न झाले आहे. हे जर मीनलला कळले तर तिला माझाही राग येईल ना? बघू जेव्हा अशी वेळ येईल, तेव्हा सांगू काहीतरी.

स्मिताप्रमाणे सवितानेही स्वतःच्याच मनाचा विचार केला. प्रेमासाठी आई-बाबांना सोडून जाणे कसे जमते या मुलींना? एक प्रेम मिळवण्यासाठी दुसऱ्या प्रेमाला सोडावे लागते.
आपले प्रेम मिळाल्यावर स्मिता व सवितासारख्या मुली जीवनात खरंच आनंदी राहत असतील का?

विनयला पाहताच मी पण त्याच्या प्रेमात पडले होते. मग प्रेमासाठी मी पण आई बाबांना सोडून गेली असती का?

ज्यांना आपले प्रेमही मिळते व आई-बाबांनाही सोडावे लागत नाही, ते खरंच किती भाग्यवान ना!

आणि अशाही अनेक प्रेमकथा होत असतात, जिथे कुठेतरी त्याग, दुःख,त्रास, विरह वगैरे असते.

काही प्रेमकथा यशस्वी होतात तर काही अपूर्णच राहतात.


लग्न होऊन नशिबाने माझे प्रेम मला मिळाले. पण आता पुढचा प्रवास कसा होईल? विनय माझ्याशी कसा वागेल? हे सर्व आता येणारा काळच ठरवेल. आता फक्त अभ्यास महत्त्वाचा आहे.'

प्रेमाबद्दल एवढा विचार करणाऱ्या मनाला विद्याने पुन्हा अभ्यासात गुंतवले.



"विद्या, तुला एक सांगायचे आहे. पंधरा-वीस दिवसांपूर्वी कॉलेज कॅम्पसमध्ये एक मुलगा तुझ्याबद्दल चौकशी करत होता. मला वाटले काही काम असेल त्याचे आणि मी पण खूप घाईत होतो, त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष दिले नाही. आता माझ्या मित्रांकडून कळते आहे की, तो मुलगा तुझी खूप चौकशी करत होता. तुझ्याबद्दल त्याला काहीतरी जाणून घ्यायचे होते. तुला काही समजले का कोण होता तो? आणि का चौकशी करत होता एवढी?"

विद्याच्या वर्गातील दीपक विद्याला म्हणाला.

"नाही रे, मला नाही असे कोणी भेटले आणि मला कोणी याबद्दल सांगितले ही नाही. पुन्हा जर तो मुलगा भेटला तर विचार त्याला."

विद्या दीपकला म्हणाली.

"ठीक आहे. तो पुन्हा भेटला तर विचारतो त्याला. पण तू काळजी घे."

असे बोलून दीपक त्याच्या मित्रांसोबत कॅन्टीनमध्ये गेला.


क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all