'कोण असेल तो मुलगा? आपली एवढी चौकशी का करत होता?'
दीपकने त्या मुलाबद्दल सांगितल्यावर, विद्या विचार करू लागली.
असा विचार करतच ती कॉलेजमधून हॉस्टेलकडे जात होती. एवढ्यात तिला पाठीमागून कोणीतरी आवाज दिला. तिने मागे वळून पाहिले तर, हर्षल तिला आवाज देत होता.
"हाय विद्या,कशी आहेस? मी तुला त्या दिवशी जे बोललो, त्यावर तू काही विचार केला का? तुझे काय म्हणणे आहे? तुला काय वाटले? ते मला जाणून घ्यायचे आहे."
हर्षल विद्याकडे आशेच्या भावनेने पाहत बोलत होता.
"हर्षल, तू खूप चांगला मुलगा आहेस. तुझ्या भावना मी समजू शकते. पण तुझ्या प्रेमाचा मी स्वीकार नाही करू शकत. आपण फक्त मैत्री या नात्यानेच बोलू या ना. तू पण मनातून प्रेमाचा विचार काढून टाक व करिअरकडे लक्ष दे. तू खूप हुशार आहेस. या बाकी गोष्टीत वेळ खर्च नको करू."
हर्षलच्या बोलण्यावर विद्याला जे काही सुचले ते ती बोलत गेली.
विद्याचे बोलणे संपल्यावर हर्षल म्हणाला,
"तू बोलते आहे, ते सर्व खरे आहे; पण एकदा पुन्हा विचार कर. आपल्याकडे अजून एक वर्ष आहे. आपण अजून एक वर्ष सोबत आहोत. मी वाट बघतो तुझ्या उत्तराची."
विद्याने खूप छान समजून सांगितल्यानंतरही हर्षल असे बोलून तेथून निघून गेला.
"काय म्हणत होता हर्षल? प्रपोज वगैरे करत होता की काय तुला?"
असे बोलत मीनल विद्याजवळ आली.
"काही नाही गं, अभ्यासाविषयी विचारत होता."
विद्याने असे बोलत प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला.
"पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तर वेगळेच काही वाटत होते. विद्या, हर्षल खूप चांगला मुलगा आहे. जर त्याने तुला प्रपोज केले असेल तर जास्त विचार नको करू. लगेच हो म्हणं."
मीनलने आपले मत व्यक्त केले.
"काही पण हं मीनल, मी कसे हो म्हणू? माझे तर लग्न..."
बोलता बोलता विद्याने आपली जीभ चावली.
"काय म्हणाली? तुझे लग्न? बोल ना पुढे."
विद्या जे काही बोलली ते ऐकून,
मीनल विद्याकडे साशंकतेने व उत्सुकतेने पाहत बोलली.
'आपल्याकडून खरे बोलले गेले. आता मीनलशी खोटे बोलण्यात किंवा काही लपवण्यात अर्थ नाही. आणि किती दिवस तिच्यापासून सत्य लपवून ठेवायचे?'
असा विचार करत विद्याने सर्वकाही तिला खरे सांगितले आणि कोणाला सांगू नकोस हे ही बजावले.
"लग्नाला नाही बोलावले, पण निदान आता पार्टी तर दे आणि जिजाजींचा फोटोही दाखव. आमचे जिजाजी कसे आहेत? पाहू तर दे."
विद्याची गंमत करत मीनल म्हणाली.
मीनलच्या बोलण्याने आपला लाजलेला चेहरा विद्या तिच्यापासून लपवित होती.
तिचे हे वागणे पाहून मीनललाही हसू येत होते.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा