Login

लग्नगाठ भाग 38

About Love And Marriage
'विनयचे खरंच महत्त्वाचे काम आहे म्हणून तो जर्मनीला जात आहे की त्याने हे सर्व मुद्दाम केले आहे? तो माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आहे का?'

सासरी जात असताना विद्याच्या मनात विचार सुरू होते.

विद्याच्या दुःखी चेहऱ्यावरून तिच्या आई-बाबांना तिच्या मनातील दुःख समजत होते. इतर गोष्टींवर गप्पा मारत ते तिचे मन आनंदी करण्याचा प्रयत्न करत होते.


सासरी पोहोचल्यावर विद्या सासू-सासऱ्यांच्या व नणंदबाईंच्या पाया पडली. त्यांची विचारपूस केली.
विद्याची नजर विनयला घरभर शोधत होती.


"विनय काही कामासाठी बाहेर गेला आहे. येईलच थोड्या वेळात."

विद्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तिच्या नणंदबाई बोलल्या.

आपल्या मनातील भाव नणंदबाईंना कळले. हे विद्याच्या लक्षात आले आणि ती लाजून किचनमध्ये गेली.

विद्याचे आई-बाबा व सासू-सासरे एकमेकांची विचारपूस करू लागले आणि त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. तेवढ्यात बाहेर गेलेला विनयही आला. त्याने विद्याच्या आई-बाबांचा नमस्कार केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. विद्या काही दिसली नाही म्हणून हातातील बॅग ठेवण्याच्या निमित्ताने बेडरूमकडे तो गेला पण किचनमध्ये भांड्यांचा आवाज आला म्हणून किचनमध्ये त्याने डोकावून पाहिले. विद्या चहा ठेवत होती.


"मला आल्याचा चहा आवडत नाही."

विनय असे बोलताच, विद्याने त्याच्याकडे वळून पाहिले. एकदम दोघांची नजरानजर झाली.


'खूप काही सांगायचंय, खूप काही विचारायचं.' असे विद्याच्या नजरेत होतं आणि दुसरीकडे 'तुझ्याशी मी असे का वागतो आहे. हे माझे मलाही कळत नाही.' अशी भावना विनयच्या डोळ्यांत होती.

"झाला का चहा?"

असा नणंदबाईंचा मोठा आवाज ऐकताच, विद्या चहाकडे लक्ष देऊ लागली आणि विनय ही घाईघाईने बेडरूमकडे गेला.

चहाचा ट्रे घेऊन विद्या हॉलमध्ये आली. तिने सर्वांना चहा दिला. विनयला चहा देण्यासाठी ती बेडरूममध्ये जाणार होती. तेवढ्यात,
"दे तो चहा मी देऊन येते विनयला."

नणंदबाई विद्याला म्हणाल्या.

मनात नसतानाही विद्याने चहाचा ट्रे नणंदबाईंकडे दिला आणि ती किचनकडे गेली.

"तुझा चहा आण आणि हा विनयचा चहा घेऊन जा त्याला द्यायला. सोबतीने घ्या चहाचा आनंद."

नणंदबाईंनी विद्याला सांगितले.


'हॉलमध्ये सर्वांसोबत चहा घेऊ की नणंदबाईंनी सांगितल्याप्रमाणे विनयसोबत चहा घेऊ?'

विद्या असा विचार करत होती.

"अगं, विचार काय करते आहेस? जा पटकन चहा थंड होतो आहे."

नणंदबाई मोठ्या आवाजात बोलताच, विद्या तिचा व विनयचा चहा घेऊन बेडरूममध्ये गेली.


क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all