Login

लग्नगाठ भाग 40

About Love And Marriage
"विद्या, स्वयंपाकाचे आम्ही बघतो. तू विनयला बॅग भरायला मदत कर."

विद्याच्या सासूबाई विद्याला म्हणाल्या.

विनय तीन महिन्यासाठी जर्मनीला जात होता. पुढे विद्याही एक वर्ष हॉस्टेलला राहणार होती. लग्न होऊनही दोघे एकत्र राहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना आता जेवढा वेळ मिळेल, तेवढ्या वेळात त्यांना एकमेकांचा सहवास मिळावा. त्यांच्यात जवळीत निर्माण व्हावी. या हेतूने विद्याच्या सासूबाई तिला म्हणाल्या.


विनयपासून दूर जाऊच नये. त्याच्या आसपासचं राहावे. असे विद्याला मनातून जरी वाटत होते, पण ती सून म्हणून घरातले कामही करत होती. सासूबाई व नणंदबाई तिच्या मनातील ओळखून तिला विनयच्या सहवासात राहण्याची संधीही देत होत्या.


विनयचे वागणे, बोलणे पाहून,
विद्याला विनय हा शांत,अबोल व भावनाशून्य वाटत होता.

'विनयचा स्वभावच असा आहे की आयुष्यात घडून गेलेल्या प्रसंगामुळे तो तसा झाला होता?'

विद्या असा विचार करतच विनयला बॅग भरण्यासाठी मदत करायला बेडरूममध्ये गेली.
तिला माहीत होते की, विनय काही बोलत नाही, त्यामुळे ती पण काहीही न बोलता बॅगमध्ये विनयचे कपडे,कागदपत्रे व इतर सामान व्यवस्थित ठेवत होती.


"मी जर्मनीला जातो आहे. याचा तुला राग येतोय ना? पण काम खूप महत्त्वाचे आहे,त्यामुळे मला जावे लागते आहे. मला समजून घे."


विनयच्या अशा अनपेक्षित बोलण्याने विनयाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले व म्हणाली,


"मला राग येत नाही आणि 'मी जाऊ नका.' असे म्हटल्यावर थांबणार आहात का तुम्ही? जाणारच आहात ना?"


विद्याच्या चेहऱ्यावरील हावभाव व बोलण्यातील नाराजीचा स्वर पाहून विनय म्हणाला,

"अरे वा! बॅगमध्ये सर्व सामान किती छान ठेवलंस! किती व्यवस्थित आणि नीटनेटके काम आहे तुझे!"

"आईने सर्व छान शिकवले आहे मला."

विद्या त्याच्याकडे पाहत म्हणाली.

"आता अजून एक काम करशील का? तिथे जे सर्व कागदपत्रे आहेत ना, ते व्यवस्थित फाईलमध्ये लाव आणि कपाटात ठेव. मी बाहेर जातोय. थोडं काम राहिलय, ते करून येतो."


एवढे बोलून विनय रूममधून बाहेर गेला.


विद्या ते सर्व कागदपत्रे व्यवस्थित लावत होती. त्यात विनयला मिळालेले सर्टिफिकेट्स पण होते. त्याने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये मिळवलेले यश दिसत होते, ते सर्व पाहून तिला आनंद होत होता. ती आनंदाने ते सर्व फाईलमध्ये लावत होती, तेव्हा तिला फाईलच्या एका कप्प्यात एका मुलीचा पासपोर्ट साईजचा फोटो दिसला. फोटोतील मुलगी दिसायला छान होती व राहणीमानावरून श्रीमंत घरातील असावी. असे वाटत होते.


' कोण आहे ही मुलगी? असे विचारावे का विनयला? म्हणजे मनात काही शंका राहणार नाही. पण असे काही विचारल्यावर विनयचा मूड पुन्हा बिघडायचा. एकतर तो अगोदरच खूप दुःखी आहे आणि एवढ्या दूर कामासाठी जात आहे. माझ्या वागण्याने तो डिस्टर्ब होईल आणि घरातील मलाच दोष देतील.

या मुलीबद्दल घरात कोणाला माहित नसेल आणि मी त्यांना याबद्दल विचारले तर घरात अजून वेगळे टेन्शन सुरू होईल आणि जरी त्यांना काही माहीत असेल तर ते मला सर्व खरं सांगतीलच कशावरून?'


एवढा सर्व बाजूने विचार करत विद्याने ती फाईल कपाटात ठेवली व त्या मुलीचा फोटो आपल्या पर्समध्ये ठेवला.


क्रमश:
नलिनी बहाळकर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all