Login

लग्नगाठ भाग 41

About Love And Marriage
खरंतर विनयचे आता जर्मनीला जाणे. कोणालाच आवडले नव्हते;पण नाईलाज होता म्हणून त्याला जाण्यासाठी कोणी विरोध केला नाही.
जाताना विनयने आई-बाबांचा, ताईचा व विद्याच्या आई-बाबांचा नमस्कार केला. सर्वांनी त्याला प्रवास सुखाचा होण्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.


"येतो मी."
विद्याशी असे बोलून विनयने तिचा निरोप घेतला.

"हॅपी जर्नी." म्हणत विद्याने त्याला शुभेच्छा दिल्या.

'मला पण घेऊन जा ना तुमच्यासोबत.'

असे विद्या मनातल्या मनात बोलली. तिच्या मनात खूप सार्‍या भावना होत्या पण तिला त्या व्यक्तही करता येत नव्हत्या.

विनय समोर होता, तोपर्यंत विद्या शांत होती आणि तो गेल्यावर तिने तिच्या सर्व भावनांना अश्रूंवाटे मोकळी वाट करून दिली.


"आई-बाबा, मी पण तुमच्याबरोबर येते."

विद्या आपल्या आई-बाबांना म्हणाली.

"तू थांब ना इथे. विनय जर्मनीला गेला. तो इथे नाही, म्हणून तू पण चालली का? आई-बाबा आहेत ना इथे? लग्न झाल्यापासून तू इथे राहिलीच नाही. लग्नानंतर लगेच परीक्षा होती, म्हणून हॉस्टेलला गेली. आता कॉलेज सुरू झाल्यानंतर पुन्हा हॉस्टेलला जाणार.

नातेवाईक व आजूबाजूचे लोक आम्हांला विचारतात ना.
'सुनबाई राहत नाही का इथे?'

तू इथे राहिली नाही तर त्या लोकांना अफवा पसरवण्यास एक नवा विषय मिळेल अजून.
अगोदरच विनयच्या आयुष्यात जे काही झाले, त्यात आमची काही चूक नसताना आम्हांला मनस्ताप सहन करावा लागला. मी पण आता दोन दिवसात चालली माझ्या घरी. हे रिकाम घर आई-बाबांना खायला उठेल ना? तू इथे राहिली तर त्यांनाही थोडे बरे वाटेल."


विद्या आई-बाबांना ती त्यांच्याबरोबर येते आहे. असे सांगत असताना, नणंदबाईंनी हे ऐकले व त्यांनी आपले म्हणणे स्पष्ट शब्दांत सांगून टाकले.

विद्याची सासरी राहण्याची मुळीच इच्छा नव्हती. शिक्षण सुरू असताना लग्न,संसार वगैरे जबाबदारी तिला नको होती. आपले कॉलेज लाईफ, हॉस्टेल लाईफ एन्जॉय करायचे होते आणि शिक्षणानंतर नोकरी करायची होती.
पण अनपेक्षितपणे तिचे विनयबरोबर लग्न झाले आणि तिच्या आयुष्यात एक वेगळा टर्न आला.

विनय जरी तिला आवडला होता. त्याच्यावर ती प्रेम करत होती पण त्याच्याशी लगेच लग्न करून संसार करणे. हे तिने ठरवले नव्हते. शिक्षण, नोकरी व मग लग्न असा तिचा प्लॅन होता. पण तिच्या आयुष्यात वेगळेच घडत गेले.

विनय जरी तिच्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हता, वागत नव्हता. पण तो घरात असला तरी तिला बरे वाटायचे. त्याला नुसते पहिले तरी तिचे मन आनंदी व्हायचे. पण आता तो घरात नाही म्हटल्यावर, तिला त्याच्या आठवणीत कसे राहायचे? हा प्रश्न होता.
आई-बाबांबरोबर ती घरी गेली की, मैत्रिणींसोबत गप्पागोष्टी व इतर काही मनासारखे करण्यात तिचे मन तरी रमणार होते. म्हणून ती आई-बाबांबरोबर घरी जाणार होती.

तिच्या आई-बाबांना तिच्या मनाची व्यथा समजत होती; पण नणंदबाईंच्या शब्दाला मान देत, त्यांनी विद्याला व्यवस्थित समजावले व ते आपल्या घरी गेले.

क्रमश:
नलिनी बहाळकर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all