Login

लग्नगाठ भाग 42

About Love And Marriage
विनयला निरोप देताना सर्वांच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि विनयच्याही मनात भावनांची चलबिचल सुरू होती.


'जर मी ठरवले असते तर जर्मनीच्या प्रोजेक्टचे काम कंपनीत माझ्या एखाद्या मित्रालाही देऊ शकत होतो. पण निराश असलेल्या माझ्या मनाला काहीतरी चेंज हवा होता. मन कामात गुंतून राहील व मनाला थोडे बरे वाटेल. या हेतूने मी जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या वागण्यामुळे आई-बाबांना वाईट वाटते आहे. विद्याचे आई-बाबाही दुःखी आहेत आणि विद्या काही बोलत नव्हती;पण तिच्या मनात असलेले दुःख मला तिच्या डोळ्यातून समजत होते. माझ्या आयुष्यात जे काही झाले, त्यात तिचा काही दोष नसतानाही तिला माझ्या अशा वागण्याचा त्रास होतो आहे. हे मला कळते आहे.


हे सर्व मला मान्य आहे. मलाही मन आहे आणि ते दु:खी आहे.
या माझ्या मनाचा कोणी विचार करत का?

स्मिताने असे केले आणि रीना होती ती पण अशीच होती.'

या विचाराने विनयला भूतकाळातील आठवणी आठवू लागल्या.

'कॉलेजमध्ये जेव्हा मी रीनाला पहिल्यांदा पाहिले, आणि तिच्या प्रेमात पडलो. मला तिच्यात असे काही वेगळेपण जाणवत होते की काय, त्यामुळे माझे मन तिच्याकडे धावू लागले होते.

कॉलेजचे जीवन असेच असते.

अभ्यास व मित्रांबरोबर मजा,मस्ती करणं, मनाला वाटेल तसं स्वच्छंदी जगणं. हे सर्व म्हणजेच जीवन! असे वाटू लागत.
काय चांगलं? काय वाईट? हा विचार न करता, जे मनाला आवडते तेच चांगलं असतं. या धुंदीत आपण जगत असतो.

मी पण रीनावर वेड्यासारखा प्रेम करत होतो. ती पण माझ्यावर प्रेम करते आहे. या भ्रमात मी राहत होतो. पण जेव्हा तिने एका श्रीमंत मुलाच्या पैशाच्या प्रेमात पडून, माझ्या प्रेमाला सोडले.. तेव्हा माझ्या मनाला खूप त्रास झाला.
माझी जगायची इच्छाच राहिली नव्हती. आयुष्य संपवून टाकावे असे वाटत होते; पण आई-बाबा, ताई यांचा विचार मनात आला. त्यांच्यासाठी मी जगायचे ठरवले.
स्वतःला सावरत शिक्षण पूर्ण केले व पुढे चांगली नोकरीही मिळवली.

हळूहळू जीवनात आनंद घेण्याचा प्रयत्न करत होतो.


लग्नात त्या दिवशी स्मिताकडे माझे मन ओढले गेले. घरातल्यांनाही ती आवडली. सर्व काही छान होत होते. पण पुन्हा माझ्या आयुष्यात दु:ख आले.

साखरपुडा होऊनही, स्मिता तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली आणि जाताना माझ्या मनाला जखम देऊन गेली.


समाजात हुंडाबळी, बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार यासारख्या घटनांसाठी पुरूष जबाबदार ठरतात.
अशा घटना घडू नये. यासाठी कायदे आहेत. अनेक संस्थाही काम करत आहेत.
मुलींना आता शिक्षण, नोकरी करण्याचे स्वातंत्र्य आहे.
समाजात बदल होतो आहे. खूप चांगल्या सुधारणा होत आहेत. पण समाजात मी अशा अनेक घटना ऐकल्या, जिथे घरात सर्व काही चांगले असतानाही सून चांगली राहत नाही. सासू-सासऱ्यांना, नवऱ्याला त्रास देते. तेव्हा अशा लोकांनी काय करावे? हा प्रश्न मनात येतो.
आणि
माझ्यासारखे असे अनेक मुले असतील, ज्यांची प्रेमात फसवणूक झाली असेल. मुलींनी प्रेमाचा गैरफायदा घेतला असेल. असे मुले व्यसनाधीन होतात किंवा काही आपले जीवन संपवतात.

यात दोष कोणाचा?

हा प्रश्न मला नेहमी पडत असतो.



रीना व स्मिता यांच्या अनुभवातून,
मुलींविषयी मला तिरस्कार वाटू लागला. लग्न, प्रेम, संसार हे सर्व नकोच. असे मनाने ठरवले होते. पण आईबाबांच्या इच्छेसाठी मी कसातरी लग्नाला उभा राहिलो.
लग्न करून त्यांची इच्छा मी पूर्ण केली होती. यापुढेआता मी माझ्या इच्छेनुसार जगणार होतो आणि तसे वागतही होतो.

पण देवाने जिच्यासोबत माझी
लग्नगाठ बांधली, ती रीना व स्मितापेक्षा खूप वेगळी वाटली.
तिच्यापासून मी दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण तितकाच तिचा सहवासही मला आवडत होता. जर विद्याची व माझी लग्नगाठ बांधलेली होती तर माझ्या आयुष्यात विद्या अगोदर का आली नाही? रीना व स्मितामुळे जो त्रास झाला, तो झाला नसता ना?'


क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all