Login

लग्नगाठ भाग 43

About Love And Marriage
"आई, तू तुझा भोळा स्वभाव अगोदर सोड बरं. तुझ्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतात सर्वजण. आता तू सासू झाली आहे. हे लक्षात ठेव. जरा सासूसारखी वागत जा. आतापासून सुनेला डोक्यावर नको बसवू नाहीतर नंतर ती तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. आणि किती कौतुक करत राहते तिचे दिवसभर? नवीन आहे म्हणून करते ती सर्व चांगले. नंतर बघ...दाखवेल तिचे एक एक गुण.


माझं बघं ना. मी माझ्या सासरी एवढं सर्व चांगलं करते, चांगलं वागते;पण माझी सासू माझ्याशी कधी चांगलं वागत नाही. माझं कधी कौतुक करत नाही. माझ्या कामात नेहमी चुका काढत राहते. आता घरी गेल्यावर मला सर्व इकडच्या गोष्टी विचारणार. तुझी वहिनी कशी आहे? तुझी आई तिच्याशी कशी वागते? अशी चौकशी करणार.

माझ्या प्रत्येक कामावर बारीक नजर ठेवून असते. कोणाशी मी फोनवर बोलत असली की, कान देऊन ऐकते. तू तर माझ्या सासूबाईसारखी वागतच नाही. तू विद्याशी किती प्रेमाने वागते. तिला सर्व समजावून सांगते. मला तर असे माझ्या सासूबाईकडून कधीच प्रेम मिळाले नाही. चांगली वागणूक मिळाली नाही."

विनयची बहिण सीमा आपल्या आईला समजुतीच्या गोष्टी सांगत होती, शिकवत होती.


'सीमाच्या बोलण्यात तिच्या सासूबाईबद्दलची तक्रार होती की ती मला शिकवत होती?'

हा प्रश्न सीमाच्या आईच्या मनात आला व त्या तिला म्हणाल्या,

"एवढ्या वर्षाच्या अनुभवातून मला कळते गं..कोण कसे आहे ते? विद्या खरंच खूप चांगली आहे. बोलण्यातून व वागण्यातून लगेच कळते. तिचे आई-बाबाही खूप चांगले आहेत. त्यांनी विद्याला छान संस्कार दिले आहेत. मला तर विद्या सून म्हणून खूप आवडली. विनयसाठी स्मिताच्या ऐवजी जर विद्यालाच मागणी घातली असती तर बरे झाले असते.

आता जे झाले ते झाले. शेवटी एवढेच म्हणावं लागेल,
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.


तुझ्या सासुबाई तुझ्याशी असे वागतात म्हणून मी पण विद्याशी असे वागावे का?"


" तू तिला त्रास दे असे नाही सांगत आहे मी. फक्त जास्त डोक्यावर नको बसवू असे सांगते आहे. आणि तिच्याकडे जरा लक्ष दे. कोणाशी काय बोलते? काय करते दिवसभर? हॉस्टेलला राहिलेली आहे ती. हॉस्टेलचे लाईफ काय असते? हे माहित आहे मला. ऐकले आहे मी सर्व. आणि ती स्मिताची बहिण आहे, चुलत बहीण असली तरी काहीतरी गुण असतीलच ना तिच्यासारखे."

सीमा आईला म्हणाली.

"अगं, आपण लग्नाअगोदर केली तिची सर्व चौकशी व तुझ्या बाबांनी कोणाच्या तरी ओळखीने तिच्या कॉलेजमध्येे व हाॅस्टेलमध्ये सुद्धा चौकशी केली. तिच्या घराच्या आजूबाजूला व नातेवाईकांकडूनही माहिती काढली. सर्वांनी तिच्याबद्दल चांगलेच सांगितले. मगच आपण पुढचे सर्व ठरवले ना?

एकदा अनुभव आल्यावर माणूस शहाणा होतो. म्हणून तर सर्व विचारपूस करूनच लग्न केले.

आणि तुला एक आई म्हणून सांगते,
तू आता इकडचे काही टेन्शन घेऊ नकोस. सर्व व्यवस्थित आहे. तू फक्त आता तुझा संसार सुखाचा कर आणि स्वतःची काळजी घे."

सीमाच्या आईने तिच्या सर्व शंकाचे उत्तर देत तिला व्यवस्थित समजावले.


क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all