Login

लग्नगाठ भाग 44

About Love And Marriage
'कॉलेज कॅम्पसमध्ये जो मुलगा माझी चौकशी करत होता, तो विनयच्या बाबांच्या ओळखीचा होता तर...माझ्या मनात शंका होती तेच खरे ठरले.'

नणंदबाई व सासूबाईंचे बोलणे सुरू होते, तेव्हा बाहेर काही कामासाठी गेलेली विद्या घरात आली आणि तिने त्यांचे बोलणे ऐकले. ऐकून तिला थोडे वाईट वाटले आणि तो मुलगा आपली चौकशी का करत होता? याचे उत्तरही तिला मिळाले.
आणि मनात तिचे विचार सुरू झाले.


विद्या घरात आली. हे सासूबाईंनी पाहिले व चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणत त्या तिला म्हणाल्या,


"विद्या, तुझाही चहा केला आहे बरं. ये बस आमच्यासोबत."

सासूबाईंच्या प्रेमळ शब्दांनी विद्याच्या दुखावलेल्या मनाला थोडे बरे वाटले आणि चहा घेतल्यावर विचार करणारे डोकेही थोडे शांत झाले.


विनय जर्मनीला जाणार होता म्हणून सीमाताई त्याला भेटायला आली होती. तो गेल्यावर दोन दिवस माहेरी राहून ती पुन्हा सासरी गेली.


विद्याला घरात करमत नव्हते. घरातले काम करण्यात वेळ घालवत होती. सासूबाईंकडून त्या करतात तसे स्वयंपाकाचे पदार्थ शिकून घेत होती आणि काही नवीन पदार्थ ती स्वतःही करत होती.


विनय फोन करायचा. आईबाबांशी बोलायचा.

"विद्याशी बोल." असे म्हणत विद्याच्या सासूबाई त्याचा फोन विद्याजवळ द्यायच्या.

काय बोल? आणि किती बोलू? असे विद्याला होऊन जायचे; पण कशी आहेस? काय करतेस?... याव्यतिरिक्त विनय जास्त काही बोलायचा नाही. त्यामुळे विद्या मनातून दुःखी होत होती.

हॉस्टेलमध्ये असताना विद्याने पाहिले होते. ज्या मुलींचे लग्न ठरलेले होते व ज्यांचे नवीनच लग्न झालेले होते, त्या मुली फोनवर कितीतरी वेळ बोलत असायच्या आणि आपण त्या मुलींची किती गंमत करायचो?

हे सर्व आठवून विद्याला हसू येत होते.


आई-बाबांचा फोन यायचा. त्यांच्याशी बोलून विद्याला बरे वाटायचे.


असेच एके दिवशी,
आईचा फोन आल्यावर कळाले की, मामाच्या मुलीचे लग्न आहे व विद्यालाही लग्नाला यायचे आहे. हे ऐकून विद्याला खूप आनंद झाला. कधी माहेरी जाऊ असे तिला वाटू लागले. लग्नाला गेल्यावर थोडे दिवस माहेरी राहू व हॉस्टेलला जाऊ. असे तिने ठरवले होते.


मामाच्या मुलीच्या लग्नात विद्या छान तयार झाली होती. सुंदर साडी नेसली होती. दागिने घातले होते. ती खूपच सुंदर दिसत होती. सर्व नातेवाईकांना भेटून तिला आनंद होत होता. सर्वांशी ती आनंदाने बोलत होती. तेवढ्यात तिचे लक्ष हर्षलकडे गेले आणि त्यानेही तिच्याकडे पाहिले. तिचे हे वेगळे रूप पाहून तो तिच्याकडे पाहतच राहिला.

"हर्षल, तू इथे?"

विद्याने असे विचारल्यावर तो म्हणाला,
"नवरदेव माझ्या मित्राचा भाऊ आहे. म्हणून लग्नाला आलो आहे."

" माझ्या मामाच्या मुलीचे लग्न आहे. म्हणून मी पण आली आहे."

विद्यानेही त्याला असे सांगितले.


"विद्या, तुझे लग्न झाले! तू बोलावले पण नाही लग्नाला?"

हर्षल नाराजीने विद्याला म्हणाला.


"अरे, खूप घाईत झालं ना सर्व म्हणून नाही बोलवता आले लग्नाला."

विद्या म्हणाली.

हर्षल अजून पुढे काही बोलणार होता, तेवढ्यात विद्याला कोणीतरी विचारले,

"जावईबापू नाही आले का?"

"नाही आले. ते कंपनीच्या कामासाठी जर्मनीला गेले आहेत."

विद्या त्यांच्याशी बोलते आहे, हे पाहून हर्षल दुसरीकडे चालला गेला व नंतर विद्याही तिथून निघून गेली.


आपले प्रेम पूर्ण झाले नाही. अपूर्ण राहिले. याचे हर्षलला वाईट वाटत होते. आणि 'आपले लग्न झाले आहे. हे हर्षलला कळाले, हे चांगले झाले.
मी त्याला हे सांगणारच होते; पण अगोदरच त्याला कळाले. हे कळल्यावर
त्याला नक्कीच वाईट वाटले असणार. पण मी काय करू शकते आता?

देवा, हर्षलला यातून सावरण्याची शक्ती दे.'

विद्याने हर्षलसाठी देवाकडे प्रार्थना केली. आपले मन पुन्हा आनंदी करण्याचा प्रयत्न करू लागली.


क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all