Login

लग्नगाठ भाग 45

About Love And Marriage
विद्याचे कॉलेज सुरू झाले. ती हॉस्टेलला आली. कॉलेज व अभ्यास असे तिचे रुटीन सुरू झाले. लग्नाचे ठरविताना विद्याच्या बाबांनी सांगितले होते की, विद्याला पुढे शिक्षण पूर्ण करायचे आहे व ती हॉस्टेलला राहणार आहे. विनयच्या घरातून या गोष्टीला विना तक्रार संमती मिळाली. त्यामुळे विद्याला खूप आनंद झाला होता.


बारावीनंतर इंजीनियरिंगसाठी विद्या पहिल्यांदा घर सोडून हॉस्टेलला राहत होती. घर सोडून जाताना ती खूप रडली होती. पण हळूहळू हॉस्टेलमध्ये तिचे मन रमू लागले होते. हॉस्टेलमध्ये तिला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या. त्यांच्या आयुष्यातील सुखदुःख तिला समजले. आता त्यांचे मैत्रीचे नाते इतके छान जोडले गेले होते की, एक वर्षानंतर दूर जावे लागणार. याचे त्यांना वाईट वाटत होते. इथून गेल्यावर आपण सर्वांनी एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवायचा व अधूनमधून भेटत राहायचे. असे सर्व मैत्रिणींनी ठरवले होते.


कॉलेजला गेल्यावर विद्याला जेव्हा हर्षल दिसला तेव्हा त्याच्याशी आता काय बोलावे? हे सुचत नव्हते. पण तो तिच्याशी अगदी व्यवस्थित बोलत होता. हे पाहून विद्याला खूप बरे वाटले.

प्रेम यशस्वी झाले नाही म्हणून अनेक जण स्वतःचे आयुष्य उध्वस्त करतात किंवा एकतर्फी प्रेमातून समोरच्या व्यक्तीचे काही बरे वाईट करतात. अशा अनेक घटना विद्याने ऐकलेल्या होत्या. त्यामुळे प्रेम वगैरे या गोष्टीपासून ती दूरच राहत होती.

कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी आलेले काही मुलं-मुली आपले करिअर घडविताना प्रेमाचाही आनंद घेत असतात. त्यातील काहींचे प्रेम यशस्वी होते तर काहींचे होतही नाही.

ज्यांना आपले प्रेम मिळते ते पुढे आनंदात जीवन जगतात; पण काही कारणास्तव काहींना त्यांचे प्रेम नाही मिळाले तर ते आपले व इतरांचेही जीवन उध्वस्त करून टाकतात.

'हर्षलचे आपल्यावर प्रेम होते पण आपले तर विनयसोबत लग्न झाले आहे. त्यामुळे हर्षलच्या प्रेमाचा मी कसा स्वीकार करू शकते? आणि हर्षलला जशी माझ्याबद्दल प्रेमाची भावना होती तशी मला त्याच्याबद्दल नव्हती. माझ्या मनात तसा कधी विचारही आला नाही.

समोरच्या व्यक्तीची बाजू लक्षात घेऊन वागले तर प्रत्येकाचे जगणे किती सोपे होऊन जाते!

हर्षलला मनातून जरी वाईट वाटले पण त्याने सत्य परिस्थितीचा स्वीकार केला आणि आपले जीवन पुन्हा नव्याने, आनंदाने जगू लागला. हे पाहून खूप बरे वाटते आहे. व सर्वांनी हर्षलसारखा असा विचार केला तर सर्वांचे जीवन आनंदी होईल.'

या विचाराने विद्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all