Login

लग्नगाठ भाग 46

About Love And Marriage
रात्री बारा वाजता मैत्रिणींनी विद्याला खूप सारे सरप्राईज देत, तिचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. त्यांनी बर्थडे केक व खूप सारे गिफ्ट आणले होते. आपल्या मैत्रिणींचे आपल्यावरील प्रेम व त्यांचा उत्साह पाहून विद्या खूप भारावून गेली होती. रात्री उशिरापर्यंत बर्थडे सेलिब्रेशन सुरू होते. खूप मौज मस्ती केली. त्यामुळे विद्याला सकाळी लवकर जाग आली नाही. आज कॉलेजला लेक्चर ही नव्हते. त्यामुळे ती कॉलेजला जाणार नव्हती. तिने रोजचा अलार्म पण लावला नव्हता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आई-बाबांचा तिला फोन आला आणि विद्याच्या आजच्या खास दिवसाची छान सुरुवात झाली.
आई बाबांशी बोलून विद्याला खूप बरे वाटले. थोड्या वेळाने सासूबाई व सासऱ्यांचाही फोन आला. त्यांनी आठवणीने वाढदिवस लक्षात ठेवला आणि आपल्याला फोन केला. याचा विद्याला विशेष आनंद झाला होता.

आज कॉलेज पण नव्हत, त्यामुळे विद्याची रोजसारखी धावपळ ही नव्हती. निवांत सुरू होते. रूममध्ये राहूनच अभ्यास करायचा. असे तिने ठरवले होते. सर्व सकाळची कामे आवरून ती अभ्यासला बसणार होती.

'मैत्रिणींनी रात्री छान बर्थडे सेलिब्रेशन केले. आई-बाबा व सासू-सासरे यांचाही फोन आला. त्यांच्याशी बोलून खूप छान वाटले; पण मन अभ्यासात काही लागत नाही. मनाला काहीतरी हवे आहे पण ते काही मिळत नाही आहे. अशी मनाची अवस्था झाली आहे. मनाला एक वेगळीच हुरहुर लागली आहे.
विनयच्या फोनची वाट पाहते आहे का आपले मन?
आपल्या वाढदिवशी विनय फोन करेल का? विनय जर्मनीवरून घरी येऊन आठ-दहा दिवस झाले; पण अजून एकदाही फोनवर बोलणे झाले नाही. आज माझा वाढदिवस आहे. हे तरी विनयच्या लक्षात आहे का? आईंनी आठवण करून दिली असेल. अशी मला खात्री आहे.

मला वाटले होते, पहिला फोन त्यांचाच यावा. पण कसले काय?
माझ्या मनासारखे कधी काही झाले आहे का? मलाही मन आहे. याचा विचार कोणी का करत नाही?
थांब ना, किती विचार करतेस?
अजून पूर्ण दिवस आहे. येईल त्यांचा फोन नक्की.

माझे मन वेडे झाले का? किती आणि नको ते विचार करते आहे.

आता या विचार करणाऱ्या मनाला अभ्यासात गुंतवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नाहीतर ते मला दिवसभर असाच त्रास देईल.'

असा विचार करून विद्याने अभ्यास करायला सुरुवात केलीच आणि तेवढ्यात,

"विद्या, तुझ्याकडे गेस्ट आले आहेत. तुला मॅडमने बोलावले आहे.'

असे विद्याला एका मुलीने सांगितले.

'कोण आले असेल मला भेटायला?'

आश्चर्याने व उत्सुकतेने धावतच विद्या मॅडमला भेटायला गेली.

विद्या मॅडमला विचारणार होती की, 'कोण गेस्ट आले आहेत मला भेटायला?' तेवढ्यात तिचे लक्ष तिथे खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडे गेले आणि ती त्या व्यक्तीकडे बघतच राहिली.


क्रमश:
नलिनी बहाळकर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all