Login

लग्नगाठ भाग 47

About Love And Marriage
"विद्या, काय झाले गं?"

खुर्चीवर बसलेल्या त्या व्यक्तीकडे एकटक बघत असलेल्या विद्याला
मॅडमने आवाज दिला आणि विद्या आपल्या तंद्रीतून बाहेर आली.


"तुम्ही इथे?"

विद्याने तिथे खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला म्हणजेच विनयला आश्चर्याने विचारले.

विद्याच्या या प्रश्नावर काय बोलावे? हे विनयला सूचत नव्हते. त्याची मनस्थिती ओळखत, काहीतरी बोलावे म्हणून विद्याने हॉस्टेलच्या वॉर्डनशी विनयची ओळख करून दिली आणि 'आम्ही बाहेर जाऊन बसतो.' असे मॅडमला सांगितले.

मॅडमने होकार दिल्यावर, विद्या व विनय दोघेजण हॉस्टेलच्या बाहेरील एका बेंचवर जाऊन बसले.

तिच्या बर्थडेसाठी विनय आला आणि ते ही अगोदर काही न सांगता आला. हे तिच्यासाठी खूप मोठे आश्चर्य होते. सकाळपासून तिच्या मनाला जी हुरहुर लागली होती, ती जाऊन आता तिचे मन आनंदाने भरून गेले होते.


"मला वाटले होते, तुम्ही मला शुभेच्छा देण्यासाठी फोन करणार."

शांत बसलेल्या विनयला बोलते करण्यासाठी विद्या विनयला म्हणाली.

"प्रत्यक्ष येऊन भेटणार होतो. मग फोन कशाला करू आणि सरप्राईज देण्यात एक वेगळीच मजा असते. आवडले का माझे सरप्राईज?"

विनय विद्याकडे पाहत म्हणाला.

"सरप्राईज खूप आवडले पण समजा मी कॉलेजला गेले असते किंवा कुठे बाहेर गेले असते तर.."

विद्याने शंका विचारली.

"तर मी वाट पाहत बसलो असतो. तू येईपर्यंत." विनय हसत म्हणाला.

विनयच्या या बोलण्यावर विद्याही हसली.

"विद्या, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

प्रेमभरल्या नजरेने विद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विनयने तिला एक छानसे गिफ्टही दिले.

विद्यानेही तितक्याच प्रेमाने विनयच्या शुभेच्छांचा स्वीकार केला व त्याने दिलेले गिफ्ट पाहून म्हणाली,

"तुम्ही मला भेटायला आलात, हेच माझ्यासाठी खूप मोठे गिफ्ट आहे."

"तू कथा, कादंबऱ्या जास्त वाचते का गं?"

विनयने विद्याच्या बोलण्यावर तिला विचारले.

"हो, वाचते ना. मला वाचन करायला खूप आवडते. पण तुम्हांला कसे समजले?"

विद्या विनयच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाली.

"तू बोलते खूप छान, तुझे विचारही खूप चांगले आहेत. आणि कथा, कादंबरीत जसे नायिका आपल्या नायकाशी बोलते तसेच तू बोलते आहे. म्हणून तुला विचारले."

विनयने आपण विचारलेल्या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले.

"हो, का!" आपल्याला समजले असे दाखवत विद्या म्हणाली.

"विद्या, तू मॅडमकडून परमिशन घे. आपण थोडे बाहेर फिरायला जाऊ. आणि मी आता गिफ्ट केलेला ड्रेस घाल."

विनय विद्याला म्हणाला.

विनय अगदी आपल्या मनातलेच बोलला. असे विद्याला वाटले आणि ती त्याला पटकन हो म्हणाली.

विद्याने मॅडमकडून जाण्यासाठी परमिशन घेतली, रजिस्टरमध्ये एन्ट्रीही केली आणि तयार होण्यासाठी रूममध्ये गेली.


क्रमश:
नलिनी बहाळकर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all