Login

लग्नगाठ भाग 48

About Love And Marriage
विनयने गिफ्ट दिलेला ड्रेस विद्याला खूप आवडला. तिच्या आवडत्या अबोली कलरचा अनारकली ड्रेस घालून ती खूप छान दिसत होती. हलकासा मेकअप करून विद्या छान तयार झाली. विद्याला इतके छान तयार झालेले पाहत व तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या नजरेने टिपत मीनलने विद्याला विचारले,

"जिजाजी आले आहेत का वाढदिवसाच्या खास शुभेच्छा द्यायला?"

"हो आले आहेत ना; पण तुला कसे कळले?"

विद्या लाजतच मीनलला म्हणाली.

"जिजाजींच्या प्रेमाचा रंग तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो आहे. तुझा चेहरा सर्व सांगतोय. बरं आता आमची काही ओळख वगैरे होईल का जिजाजींसोबत?"

विद्याची मस्करी करत मीनल म्हणाली.

"अगं मी तुझी ओळख करून देणारच होती तू सांगितले नसते तरी. चल ते बाहेर बेंचवर बसले आहेत."

असे म्हणत विद्या मीनलला बाहेर घेऊन गेली व विनयसोबत तिची तिने ओळख करून दिली.

आपल्या स्वभावाप्रमाणे बिनधास्त व मोकळेपणाने मीनल बोलत होती. पण विनय मोजकेच बोलत होता. त्याच्या बोलण्यात मोकळेपणा जाणवत नव्हता.

थोडा वेळ गप्पा झाल्यावर, मीनलचा आनंदाने निरोप घेऊन विद्या व विनय बाहेर फिरायला गेले.

थोडे पुढे गेल्यावर, विद्या गणपती बाप्पाच्या मंदिरात विनयला घेऊन गेली. ती या मंदिरात नेहमी जायची.
दोघांनी जोडीने मनोभावे देवाला नमस्कार केला. आजच्या मिळालेल्या आनंदासाठी विद्याने देवाचे मनापासून आभार मानले. विद्याचा चेहऱ्यावरील आनंद पाहत, विनयने देवाला प्रार्थना केली की, 'विद्याला नेहमी असेच सुखात ठेव.'

मंदिरात थोडा वेळ बसल्यानंतर,


"आपण मूव्ही पाहायला जायचे का?"

विनयने विद्याला विचारले.

थोडा वेळ विचार करत विद्या विनयला म्हणाली,

"मुव्हीला जाण्यापेक्षा आपण गप्पा मारू. चालेल का तुम्हांला?"

"चालेल, आज तुझा वाढदिवस त्यामुळे सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे..."

विनय मिस्किलपणे म्हणाला.

हॉटेलमध्ये जेवण करण्याचे दोघांनी एकमताने ठरवले, पण त्यापूर्वी ते दोघेजण एका सुंदर गार्डनमध्ये एका निवांत ठिकाणी बसले.

दोघांच्या छान गप्पा सुरू होत्या, तेवढ्यात विद्याला शिंका येऊ लागल्या. ती आपल्या पर्समध्ये हातरुमाल शोधत होती. हातरूमाल शोधत असताना, पर्समधील सर्व सामान ती बाहेर काढत होती. तिला हातरुमाल मिळाला आणि विनयला तिच्या पर्समधील सामानात एक ओळखीचा फोटो दिसला.

तो फोटो विद्याच्या पर्समध्ये पाहून, विनयला आश्चर्य वाटले आणि त्याने विद्याला विचारले,

"तुझ्याकडे हा फोटो कसा? तू ओळखते या व्यक्तिला?"


विद्या त्या फोटोकडे व विनयच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहत होती.


क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all