Login

लग्नगाठ भाग 50

About Love And Marriage
'तो फोटो कोणाचा आहे? हे जाणून घेण्याची मला उत्सुकता होती. पण विनयला विचारण्याची तशी संधी मिळाली नाही. विनय जर्मनीला गेले आणि मी पण नंतर हॉस्टेलला आली. आता पर्समधील सामानात विनयला तो फोटो दिसला आणि त्यांनी स्वतःहून त्याबद्दल सर्व सांगितले. विनय त्या फोटोबद्दल दुसरे काही सांगू शकले असते; पण त्यांनी आपल्या जीवनातील सत्य मला सांगितले. नक्कीच माझ्याबद्दल त्यांना काहीतरी वाटत असणार. मला ते आपले मानत असणार, म्हणून त्यांनी मनमोकळेपणाने व काही न लपवता सर्व सांगितले.'

या विचारात विद्या विनयकडे पाहतच राहिली.

"काय झाले विद्या? तुला मी जे हे सर्व सांगितले, त्यात माझे काही चुकले का?"

विद्याचा चेहरा पाहत विनयने तिला विचारले.

"नाही हो, तुमचे काही नाही चुकले. उलट तुम्ही सर्व मनमोकळेपणाने सांगितले. ते ऐकून बरे वाटले. तुमची यात काही चूक नाही;पण रीना तुमच्याशी अशी वागली. याबद्दल वाईट वाटतेय. रीनासारख्या मुली असे का वागतात? हा प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो."

विद्याने आपले मत व्यक्त केले.


"या प्रसंगातून सावरत पुढे मी माझे शिक्षण पूर्ण केले. मला चांगली नोकरी मिळाली. सर्व काही सुरळीत झाल्यावर, पुढे काही वर्षात आई-बाबांनी घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू केला. मुली शोधण्याची जबाबदारी मी आई-बाबांना दिली. आणि ते मुली शोधतही होते.

त्या दिवशी लग्नात स्मिता त्यांच्या नजरेत आली. मलाही ती आवडली होती. पण तीही तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मी माझ्या नशिबाला दोष दिला. माझ्या बाबतीत असे का घडते आहे? याचा खूप विचार करू लागलो. प्रेम, लग्न व संसार हे सर्व आता नकोच. असे वाटायला लागले. आई-बाबांनी मला खूप समजावून सांगितले. त्यांची इच्छा म्हणून मी तुझ्याशी लग्न करायला तयार झालो. अगोदरच्या दोन प्रसंगांमुळे मला मुलींचा खूप राग येऊ लागला होता. त्या आपल्या आनंदासाठी इतरांच्या मनाचा विचार करत नाही. मुली स्वार्थी असतात. असा मुलींकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन होत गेला. म्हणून मी पण तुझ्याशी तटस्थपणे वागू लागलो. तुझी काही चूक नसताना तुला माझ्या वागण्याचा त्रास होतोय. हे दिसत होते मला. तुला माझ्या अशा वागण्याचा राग येत असेल ना?"

विनयने आपल्या मनातील विद्याला सांगितले.

"राग नाही यायचा; पण वाईट वाटायचे. तुमच्या मनस्थितीचा विचार करून मी समजून घेतले सर्व."

विद्या म्हणाली.

"विद्या, मी तुला माझ्या आयुष्यातील सर्व सांगितले. स्मिताचे तर तुला माहित होते आणि या फोटोमुळे रीनाविषयी सांगितले. तुझ्या आयुष्याबद्दल तू काही सांग ना."

विनय विद्याला म्हणाला.


क्रमश:
नलिनी बहाळकर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all