"माझे आयुष्य साधे सरळ आहे. आयुष्यात विशेष असे काही सांगण्यासारखे नाही."
विनयला आपल्याकडून काय जाणून घ्यायचे आहे? हे विद्याला कळलेले होते, तरी ती विनयला असे म्हणाली.
"अगं, म्हणजे प्रेम वगैरे काही? असे म्हणायचे आहे मला."
विनय गंमतीने म्हणाला.
"मी माझ्या आयुष्यातील काही सांगितले तर तुम्हांला ते खरे वाटणार नाही."
विनयने आता प्रेमाविषयी सरळ विचारले आहे, त्यावर
विद्या म्हणाली.
"असे काय सांगणार आहे तू तुझ्या आयुष्याबद्दल?"
विनयने प्रश्नार्थक मुद्रेने विचारले.
"माझा स्वभाव म्हणा किंवा माझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार, मी प्रेम, अफेअर या गोष्टीत कधी पडले नाही. अभ्यास, करिअर हेच माझे ध्येय होते. पण आत्याच्या मुलीच्या लग्नात तुम्ही मला जेव्हा दिसलात, तेव्हा तुमच्याविषयी एक वेगळीच भावना माझ्या मनात निर्माण झाली. तुमच्यात आणि माझ्यात एक अतूट नाते असावे. असे वाटू लागले होते. स्वप्नात देखील तुम्हीच दिसत होतात. प्रेमाचा कधीही विचार न करणारी मी तुमच्या प्रेमात पडले होते. पण जेव्हा कळले की, स्मिता तुम्हांला आवडली आहे. आणि तिच्याबरोबर तुमचे लग्न ठरले आहे, तेव्हा स्मिताचे सुख व तुमच्याही सुखाचा विचार करून मी माझ्या मनातील तुमच्याविषयी असलेल्या प्रेमाचे दरवाजे कायमचे बंद केलेत."
विद्याने भावनेच्या भरात आपल्या मनातील सर्व विनयला सांगितले.
विद्याने सांगितलेलं ऐकून, विनयला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो विद्याला म्हणाला,
" म्हणजे तू स्मिताचा व माझा विचार करून तुझे प्रेम व्यक्त केले नाही. कोणाला सांगितले नाही. जर तू तुझे प्रेम माझ्याजवळ व्यक्त केले असते किंवा तुझ्या घरात सांगितले असते.. तर कदाचित माझे व स्मिताचे लग्न ठरलेच नसते. आणि पुढे झालेला त्रास हा झालाच नसता."
"पण या सर्व जर तरच्या गोष्टी ना? तुम्ही मला आवडत होतात. मी तुमच्यावर प्रेम करत होते ; पण तुम्हांला मी आवडली असती का? तुम्ही म्हणता तसे झालेच असते. हे कशावरून? काही वेगळेही घडू शकले असते ना?"
विद्या म्हणाली.
"आता जे झाले ते झाले. पण देवाच्या मनात काय होते बघ ना.. तू तुझे प्रेम व्यक्त केले नाही, तरी तुला तुझे प्रेम मिळाले. यालाच म्हणतात खरे प्रेम!"
विनय आनंदाने म्हणाला.
"हो, मला माझे प्रेम मिळाले. याचा आनंद आहे. पण तुम्हांला तुमचे प्रेम मिळाले नाही आणि त्यामुळे तुम्ही खूप दुःखी आहेत. माझ्याबरोबर लग्न केले तेही तुम्ही आई-वडिलांच्या इच्छेसाठी केले. हे ऐकून मला वाईट वाटले."
विद्या म्हणाली.
"विद्या, रीना व स्मिताच्या वागण्यामुळे मी खरंच खूप दु:खी झालो होतो. पण आईबाबांनी तुझ्याशी माझे लग्न करण्याचा घेतलेला निर्णय खूप चांगला होता. हे तुझ्या सहवासात मला कळायला लागले. तू रीना व स्मिता या दोघींपेक्षा वेगळी आहेस. त्या दोघी फक्त स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या होत्या. आपल्यामुळे इतरांना त्रास होतो? याचा त्यांनी कधी विचारही केला नाही. पण तू नेहमी इतरांच्या सुखाचा विचार करते. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये. याची काळजी घेते. रीना व स्मिता दिसायला खूप सुंदर होत्या. त्यांच्या सौंदर्याच्या प्रेमात मी पडलो आणि फसलो. बाह्य सौंदर्य पाहून प्रेमात पडणे. याचा कटू अनुभव घेतला मी."
विनय भावनिक होत म्हणाला.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा