Login

लग्नगाठ अंतिम भाग

About Love And Marriage
"तुम्ही माझे असेच कौतुक करत माझी भूक भागवणार आहात का? मला खूप भूक लागली आहे. जेवायला जाऊ या ना."

विद्या विनयला म्हणाली.

"तुझ्याशी गप्पा मारताना खूप छान वाटत होते. त्यात कसा वेळ गेला कळलेच नाही. चल एखाद्या छान हॉटेलमध्ये जेवायला जाऊ."

विद्याच्या बोलण्याला होकार देत विनय म्हणाला.

दोघेजण एका हॉटेलमध्ये जेवायला गेले. दोघांनी छान गप्पा मारत जेवण केले. दोघांचे स्वादिष्ट जेवणाने पोट भरले होते व मनसोक्त गप्पांनी मनही भरले होते.

विद्याला दिलेल्या वेळेत हॉस्टेलला परत जायचे होते. त्यामुळे विद्याला हॉस्टेलला सोडून,
जड अंत:करणाने विद्याचा निरोप घेत विनय घरी जाण्यासाठी निघाला.

एकीकडे आजचा दिवस खूप छान गेला. याचा विद्याला आनंद होता तर दुसरीकडे विनयला निरोप देताना तिचे मन रडत होते.


आईने सांगितले म्हणून विनय विद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला होता आणि त्याने गिफ्ट पण आणले होते.

आईच्या सांगण्यानुसार जरी तो आला होता; पण त्याच्या मनातही तिला भेटण्याची ओढ होतीच.
फक्त मनात भावभावनांचे वेगवेगळे तरंग उठत होते. त्यामुळे विद्याशी काय बोलावे? कसे वागावे? हे समजत नव्हते.

'आपल्याला पाहताच विद्याला किती आनंद झाला! आपल्यावर असलेले तिचे प्रेम तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.
आई म्हणते ते खरेच आहे.
'विद्या मला सून म्हणून भेटली हे खूप चांगले झाले आणि विद्या तुला बायको म्हणून भेटली. हे खरंच तुझे भाग्य आहे.'

विद्याचे मन निर्मळ व सुंदर आहे. तिचे विचार व संस्कार चांगले आहेत. स्वभाव खूप मनमिळावू आहे. सर्वांना आपलेसे करून घेणारी आहे विद्या.
देवाने तिचे प्रेम तिला दिले. तिच्या आयुष्यात आनंद दिला.
देवाने माझी व तिची लग्नगाठ अगोदरच बांधलेली असेल, म्हणूनच रीना व स्मिता यांच्याशी माझे लग्न झाले नाही. माझ्या जीवनातील दुःखाचे क्षण जाऊन आता सुखाचे क्षण आले आहेत. यासाठी देवाचे मी मनापासून आभार मानतो.'

या विचारातच विनय आनंदाने घरी पोहोचला. त्याचा आनंदी चेहरा पाहून त्याच्या आईला समाधान वाटले. आपल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. याचा त्यांना आनंद झाला होता.


अभ्यासात लक्ष देणारी विद्या व कामात गुंग असलेला विनय अधूनमधून फोनवर एकमेकांशी बोलायचे. कॉलेजला दोन-तीन दिवस सुट्टी असली की, विद्या कधी सासरी तर कधी माहेरी जायची.

विद्या व विनयमध्ये फुलत जाणार, खुलत जाणार नातं पाहून दोघी घरी आनंद होत होता.

विद्याची इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमची परीक्षा संपली व ती काही दिवस माहेरी राहिली. नंतर सासरी आली.

विद्याच्या सासूबाईंनी पुढचा प्लॅन अगोदरच ठरवलेला होता.

" विनय, तू आणि विद्या लग्न झाल्यानंतर कुठे फिरायला गेले नाही. आता जाऊन या फिरायला."

विनयची आई त्याला म्हणाली.


"आई, पण आता खूप काम आहेत. बघू नंतर."

नेहमीप्रमाणे नकार देत विनय म्हणाला.

" पण नाही आणि काही नाही. काम वगैरे सर्व नंतर. तुम्ही फिरायला जायचे म्हणजे जायचेच. "

आईचे हे बोलणे विनयला ऑर्डरप्रमाणे वाटले.

आईची ऑर्डर मान्य करत विनय व विद्या दोघेजण मनालीला फिरायला गेले.

विद्या तर खूप खुश होती. हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

आयुष्यात दोन वेळा आपले प्रेम अयशस्वी झालेला विनय आता लग्नानंतर आपल्या बायकोच्या प्रेमात पडला होता.


अपघाताने लग्न झालेले दोघेजण लग्नानंतर आपल्या खऱ्या .प्रेमाचा आनंद घेऊ लागले. देवाने बांधून दिलेली त्यांची लग्नगाठ त्यांच्यातील प्रेमाने व विश्वासाने अजून घट्ट होत गेली.


समाप्त
नलिनी बहाळकर


माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
0

🎭 Series Post

View all