Login

लहान घर, मोठे स्वप्नं भाग - २

आई–बाबांच्या विश्वासावर मुलाचं स्वप्न उभं राहतं. मेहनत केली तर लहान घरातूनही मोठं भविष्य घडतं.
लहान घर, मोठे स्वप्नं भाग - २


अमोलचा निकाल लागायचा दिवस जवळ येत होता. शाळेच्या नोटीस बोर्डवर निकालाची तारीख लागली होती आणि त्या दिवसापासूनच अमोलच्या मनात एक वेगळीच धाकधूक सुरू झाली होती. अभ्यास त्याने मनापासून केला होता, पण तरीही मनुष्याचं मन कधी पूर्णपणे शांत राहत नाही.

सकाळी शाळेला निघताना सविताने नेहमीसारखाच त्याच्या डब्यात पोळी–भाजी ठेवली. “आज लवकर ये,” ती म्हणाली, “निकाल पाहायचा आहे.” अमोल फक्त मान हलवून निघून गेला.

रमेश ऑफिसला जाताना नेहमीसारखा बस पकडत होता. बसमध्ये उभा राहून प्रवास करताना त्याच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार घोळत होते.
“अमोल मोठा होतोय… पुढचं शिक्षण… फी… सगळं कसं जमणार?” हा प्रश्न त्याला गेल्या काही महिन्यांपासून सतावत होता.

ऑफिसमध्ये काम करतानाही त्याचं लक्ष लागत नव्हतं. कागदांवर सही करतानाही तो थांबून विचार करत होता.
त्याला माहित होतं, अमोल हुशार आहे. त्याला चांगल्या शाळेत, पुढे कॉलेजमध्ये घालायचं आहे. पण त्यासाठी लागणारे पैसे… ते कुठून आणायचे?

दुपारी शाळेत निकाल जाहीर झाला. अमोल नोटीस बोर्डसमोर उभा होता. आसपास मुलांची गर्दी होती. प्रत्येक जण आपलं नाव शोधत होता, कोणी आनंदाने ओरडत होतं, तर कोणी शांतपणे बाजूला निघून जात होतं.

अमोलचं नाव त्याला दिसलं, “७९%”

क्षणभर त्याला काहीच सुचलं नाही. वाईट नव्हतं. पण त्याच्या मनात असलेल्या अपेक्षांइतकंही नव्हतं.

त्याचे काही मित्र ८५–९० टक्क्यांवर होते. त्यांना शिक्षक कौतुकाने थोपटत होते. अमोल मात्र शांतपणे बॅग उचलून बाहेर पडला.

घरी आल्यावर सविता दारातच उभी होती. “काय झालं?” तिने विचारलं.

अमोलने निकालाचं कागदपत्र तिच्या हातात दिलं.
सविताने पाहिलं आणि हलकं हसली. “छान आहे रे!”

“पण टॉप नाही,” अमोल हळू आवाजात म्हणाला.

तेवढ्यात रमेशही घरी आला. त्याने कागद पाहिला, आणि मुलाला जवळ घेतलं.‌ “हे बघ,” तो म्हणाला, “गुण म्हणजे सगळं नाही. तुझा प्रयत्न दिसतोय, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.”

त्या रात्री जेवताना घरात शांतता होती. नंतर रमेश आणि सविता एकमेकांशी हळू आवाजात बोलू लागले.

“आता पुढचं काय?” सविता विचारत होती,
"नववी–दहावी महत्त्वाची आहेत. ट्युशन लावावं लागेल.”

रमेशने मान खाली घातली. “मला माहित आहे… पण पगार…”

सविता काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली,
“मी जास्त शिवणकाम घेईन. रात्री उशिरापर्यंत काम करीन.”

रमेशने तिच्याकडे पाहिलं. “तू आधीच खूप करतेस.”

“मुलासाठी आहे,” ती ठामपणे म्हणाली.

दुसऱ्या दिवसापासून घरात बदल जाणवू लागले.
सविता शेजाऱ्यांची कपड्यांची ऑर्डर घ्यायला लागली. सकाळी घरकाम, दुपारी शिवणकाम, रात्री पुन्हा मशीनसमोर बसणं, तिचा दिवस संपतच नव्हता.

रमेश ऑफिसमधून परतल्यावरही थोडंफार अतिरिक्त काम करू लागला. कधी फाइल्स घरी आणायचा, कधी सुट्टीच्या दिवशी ओव्हरटाइम.

अमोल हे सगळं पाहत होता. आईचे डोळे थकलेले दिसत होते.‌ वडिलांच्या हातांवर कष्टाच्या रेषा अधिक गडद झाल्या होत्या.

एक दिवस अमोलने धीर करून विचारलं, “आई… बाबा… मला ट्युशन नको. मी स्वतः अभ्यास करीन.”

सविता थबकली. “असं का म्हणतोस?”

“तुम्ही माझ्यासाठी खूप करता. मला तुमच्यावर ओझं नको व्हायला.”

रमेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “ओझं? तू आमचं स्वप्न आहेस, अमोल.”

त्या शब्दांनी अमोलच्या डोळ्यात पाणी आणलं. पण त्याच रात्री, खिडकीजवळ बसून तो विचार करत होता,
“स्वप्न असणं पुरेसं नाही… त्यासाठी काहीतरी करायला हवं.”

पुढच्या आठवड्यात शाळेत एक सूचना लागली, “शहरस्तरीय विज्ञान स्पर्धा.” विषय होता, “शहरी जीवन आणि भविष्यातील उपाय.”

अमोलचं मन तिथेच अडकलं. त्याला आठवलं—चाळ, पाणीटंचाई, गर्दी, कचरा, प्रदूषण…हे सगळं तो रोज पाहत होता.

त्या दिवशी घरी येऊन त्याने वही उघडली. पहिल्यांदाच त्याने अभ्यासासाठी नव्हे, तर स्वतःच्या विचारांसाठी लिहायला सुरुवात केली.

आई मशीनवर शिवत होती. बाबा पेपर वाचत होते आणि त्या छोट्या खोलीत, एक नवं स्वप्न आकार घेऊ लागलं.