ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५
लघुकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- लक्ष्मणची लक्ष्मी
"काय रे, सारखे ते मुलींचे कपडे बघत बसतोस. मुलगा आहेस ना, मग मुलासारखे कपडे बघ. " कपड्यांच्या दुकानात खरेदी करायला गेलेल्या लक्ष्मणला त्याचे वडील श्रीधर म्हणाले.
तो केविलवाण्या नजरेने त्याची आई मीराकडे पाहू लागला.
त्याला काय म्हणायचे ते तिने ओळखले. ती हळू आवाजात त्यांच्या कानाशी कुजबुजली,"अहो, चार लोकांत कशाला बोलता? त्याला वाईट वाटतं ना."
"तू तर बोलूच नकोस. ह्याच काय चालू आहे तेच समजत नाही. सारखं आपलं ते पोरीसारखं थेर चालू असतात. मला तर वेगळाच संशय येते की हा.." ते रागात बोलता बोलता थांबले.
आजूबाजूची लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहेत हे पाहून ते गप्प बसले.
त्यांच्या बोलण्याचा ओघ मीराला समजला. तर लक्ष्मणने मान खाली घातली. त्याचे डोळे आसवांनी काठोकाठ भरून गेले.
मीराने त्याला जवळ घेत मायेने कुरवाळले. त्याला हुंदका दाटून आला.
"झालं सुरू याचं मुलीसारखं मुळूमुळू रडणं. कसली औलाद जन्माला आली कोणास ठाऊक? ए मीरे, तुमचं झालं की या तुम्ही. मला काम आहे, जातो मी." असे म्हणत श्रीधर त्या दोघा मायलेकरांवर रागाचा कटाक्ष टाकून निघून गेले.
लक्ष्मणचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. त्याला फॅशन वर्ल्डमध्ये करीयर करायचे होते. पण श्रीधर यांना ते आवडतं नव्हते.
पण मीराला आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करायची होती. त्याच्या कलागुणांना वाव मिळावा असे तिला नेहमी वाटायचे. त्यासाठी तिची नेहमी धडपड असायची. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे त्याला मुलीसारखं राहायला, कपडे घालायला खूप आवडायचे. त्यावरून श्रीधर नेहमीच त्याला पाण्यात पाहायचे.
त्याच्या बाबतची खरी गोष्ट फक्त मीराला माहिती होती. ती म्हणजे त्याचे किन्नर असणे. तिला जेव्हा ते कळली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
आपल्या पोटाच्या गोळ्याचे हे सत्य तिने श्रीधरपासून लपवून ठेवलं होतं. पण किती केले तरी सत्य जास्त काळ लपून राहत नाही असे म्हणतात ना तसेच झाले.
एक दिवस श्रीधर यांना लक्ष्मणचे कटू सत्य समजले तेव्हा ते खूप चिडले.
"तो हिजडा आहे, ही गोष्ट तुला आधीच माहिती होती ना. का लपवेस तू ही गोष्ट माझ्यापासून? तरीच मला संशय येत होती की का तो पोरीसारखे कपडे बघतो, चालतो, बोलतो? काय तोंड दाखवू समाजाला मी आता? एका हिजड्याचा बाप म्हणून हिणवतील मला. समाजात काय मान राहिला आपला? " ते चिडत तुच्छ नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाले.
"बाबा, मी असा आहे यात माझा काय दोष?" लक्ष्मण दाटत्या कंठाने म्हणाला.
"ए, खबरदार! मला जर बाबा म्हणशील तर. मी तुझा कोणीही नाही समजलं. आजपासून तुझे माझे संबंध संपले." श्रीधर रागाने गरजले.
मीरा रडत त्यांना समजावत म्हणाली, "अहो असे का म्हणता? हा आपला पोटचा गोळा आहे. खरं आहे की हा असा जन्माला आला, त्यात त्याचा काय दोष? "
"हा असा जन्माला आला यातच दोष आहे. जन्माला आल्यावर तो मेला असता तर बरं झालं असतं." श्रीधर कातर आवाजात म्हणाले.
त्यांच्या अशा बोलण्याने लक्ष्मण मटकन खालीच बसला. त्यांचे बोलणे गरम शिसे कानात ओतावे असे वाटू लागले. जमीन फाटावी आणि त्यात आपण बुजून जावं असं त्याला वाटू लागले. बाहेरचे लोक तुच्छ नजरेने पाहतात हे एक वेळ तो सहन करू शकत होता पण आज त्याच्या जन्मदात्यानेच त्याला झिडकारले, तिरस्कार केला ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली.
"तू अजून इथेच आहेस? दूर हो तू माझ्या नजरेपासून." ते त्याच्याकडे पाठ फिरवून उभे राहिले.
"ठीक आहे, बाबा. जातो मी. पुन्हा कधीच माझं तोंड दाखवणार नाही तुम्हाला. पण एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला माझा अभिमान वाटेल. आई, तू माझी काळजी करू नकोस, तू तुझी काळजी घे. येतो मी." डोळ्यातील पाणी पुसत लक्ष्मण मनात एक निर्धार करत आधी श्रीधरकडे व नंतर मीराकडे पाहत म्हणाला.
"थांब लक्ष्मण, तुला माझी शपथ आहे. तू हे घर सोडून कोठेही जाणार नाहीस." मीरा त्याला जाण्यापासून रोखत म्हणाली.
"अहो, आपणच जर त्याला झिडकारले तर हा समाज त्याला कसा स्वीकारेल? त्याला आपण आधार द्यायला हवा ना. मग का तुम्ही असे वागता तेही पोटच्या पोराशी? हे घर जेवढे तुमचे आहे तेवढेच त्याचेही आहे." मीरा धाडस करत म्हणाली.
ती असे म्हणताच श्रीधर तिच्याकडे चमकून प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. त्यांच्या नजरेतील प्रश्न पाहून ती त्यांना म्हणाली,"मी माझ्या मुलाच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन. त्याला काय करायचे ते तो ठरवेल. मी त्याची साथ देणार. मामांनी दिलेली अर्धी प्राॅपर्टी त्याच्या भविष्यासाठी वापरेन. राहिला ह्या घराचा प्रश्न तर त्याचाही अर्धा वाटा माझ्या नावे आहे हे तुम्हाला वेगळे सांगायला नको."
श्रीधरच्या वडिलांनी मृत्यूच्या आधीच मीरालाही संपत्तीत समान वाटा दिला होता. ह्याचे कारण म्हणजे श्रीधरला जेव्हा लक्ष्मणबद्दल समजेल तेव्हा ते त्याचा स्वीकार करणार नाहीत हे त्यांना माहिती होते. त्यांनाही आधी लक्ष्मणचे सत्य कळल्यावर वाईट वाटले होते. मीराने त्यांना समजावले होते. त्यांची विचारसरणीही वेगळी होती. त्याने त्याची भविष्याची तरतूद अशाप्रकारे केली होती. ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना कळले होते.
मीराचे बोलणे ऐकून श्रीधर मनात धुमसत राहिले.
मीराने लक्ष्मणला फॅशन डिझाईनमध्ये करिअर करण्यास प्रोत्साहन दिले. तिच्या प्रोत्साहनाने त्याला नवी उभारी मिळाली. त्याच्या अंगात वेगळेच बळ संचारले. त्याने समाजाच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याने स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष दिले.
काही वर्षाने तो लक्ष्मणचा लक्ष्मी बनून फॅशन वर्ल्डमधला एक चमकता तारा बनला. अर्थात हा प्रवास त्याच्यासाठी इतका सोपा नक्कीच नव्हता. या खडतर प्रवासात मीराने त्याला खंबीर साथ दिली. हळूहळू श्रीधरलाही त्यांची चूक लक्षात आली. तेही त्याच्याशी नीट वागू लागले. ज्या मुलाला त्यांनी झिडकारले होते. त्याच मुलामुळे आज समाजात त्यांना मान मिळत होता.
लक्ष्मणची लक्ष्मी होणे त्याच्यासाठी अभिमानाची बाब होती.
समाप्त -
आजही किन्नर/ तृतीयपंथींना खूप तुच्छ व हिन वागणूक दिली जाते. त्यांना बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. ती वागणूक आणि बदलाची सुरुवात त्यांच्या घरापासून झाली तर सुखाची नांदी होईल.
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा