Login

#जलद कथा लेखन स्पर्धा#मे #लग्नाची बेडी#लक्ष्मी भाग ४

धनुच्या दादाच्या एका महत्वाच्या निर्णयाने कुटुंब झाले सुखी

झाल्या प्रकाराने नाही म्हटलं तरी माई आबा हिरमुसलेच होते. काय करावं काहीच कळत नव्हतं. पण दादाचं आयुष्य मार्गी लावणं गरजेचं होतं. याच विषयावर त्यांची चर्चा सुरू होती तितक्यात बेल वाजली. धनु दार उघडायला गेली. दार उघडते तो समोर काय...?   दादा आणि एक भरजरी साडी नेसलेली गोरी गोमटी मुलगी गळ्यात हार घालून उभे होते. आश्चर्य मिश्रित आनंदाने तिने माई आबांना बोलावले. त्यांना आधी थोडं आश्चर्य वाटलं पण नंतर अत्यानंद झाला. त्यांचा प्रश्न चुटकी सरशी सुटला होता.
माईंनी माप ओलांडून सुनेला घरात घेतलं. सगळीकडे आनंदी आनंद झाला. धनु जाऊन पेढ्याचा बॉक्स घेऊन आली. माईंनी खायला गरमा गरम शिरही केला. दोघांनी एकमेकांना पेढे भरवले. माईंनी दोघांना ओवाळले. तिला स्वतःच्या गळ्यातली बोरमाळ घातली. मस्त एक फोटो सेशन झालं.
पण हे सगळं घडलं कसं काय याचा उलगडा होईना. माई आबांशी लग्नाचा विषय बोलल्या नंतर दादाने ठरवलं की एखाद्या विधवेशी किंवा परित्यक्तेशीच विवाह करावा जेणे करून तिचेही आयुष्य मार्गी लागेल. पण अशी मुलगी मिळावी कशी ते त्याला कळत नव्हतं.
एकदा त्याच्या ऑफिस मधल्या अविनाशशी बोलता बोलता त्याला कळलं की त्याच्या बहिणीला दोन वर्षापूर्वी तिच्या लहान मुला सकट तिच्या नवऱ्याने निर्दयी पणाने हाकलून दिलं. हे ऐकल्या पासून तिला भेटावं असं त्याला वाटायच. पण अविनशशी कसं बोलावं हे त्याला कळत नव्हतं.  शेवटी मनाचा हिय्या करून एकदा अविनाशशी बोलला. मग त्याच्या बहिणीशी आणि तिच्या मुलाशीही भेटला. तिचे आणि त्याचे विचार जुळतात हे बघून त्याने तिच्याशी लग्नाचा निर्णय घेतला. तिचा रीतसर घटस्फोट होईपर्यंत अधून मधून तिच्या मुलाला भेटून त्याला आपलंसं केलं. एवढंच नाही तर तिच्या मुलाची जबाबदारीही स्वीकारली. त्याला दत्तक घेऊन स्वतःच नावही लाऊन घेतलं. अविनाशशी बोलून दोघांनी कोर्टात लग्न केलं. माई आबांना आता कुठलाच त्रास होऊ नये म्हणून सगळं होईपर्यंत त्यांना काहीच सांगितलं नाही. माई आबा मुलाला स्वीकारतील की नाही याची भीती होती पण माईंनी त्या लेकराला मांडीवर बसवून शिरा भरवला तेव्हाच त्यांनी त्याला सहज स्वीकारलं होतं.
मुलीचा होकार, तिच्या मनाची तयारी हेही तितकच महत्वाचं होतं. एकदा होरपळल्यावर तिलाही जरा धाकधुकच होती. तिच्या मनाची तयारी झाल्यावरच लग्नाचा निर्णय त्यांनी घेतला. त्याने गाजावाजा न करता परित्यक्तेशी विवाह करून आपली गृहलक्ष्मीच आणली होती. तिच्या मुला सकट तिला स्वीकारलं होतं. ती सोज्वळ मुलगी या घराला घरपण नक्की देणार याची सर्वांना खात्री होती. घर पुन्हा एकदा आनंदाने न्हाऊन निघालं होतं.

सौ. मंजुषा गारखेडकर