Login

ललित लेख सांग तु आहेस ना?

It's a question about the existence of divine power in an each and every thing in Nature.
# सांग तु आहेस ना...

"या फुलांच्या गंधकोषी,
सांग तु आहेस ना?"

कुंद पाऊस धारा झाकोळलं आभाळ अख्खा दिवस...
सकाळं सकाळं पावसाळी गारवा ओढलेलं पिवळं धम्मक चकाकतं ऊन...
मागमुस ही न उरलेला पावसाचा..
प्रसन्न वातावरण आनंदी मन...
जाणवत राहतं " त्याचं" अस्तित्व...
सांग तु आहेस का?

उदास दिवसांतला चेहरा लांब करून बसलेलं असतानाच चिमण्यांचा पाठशिवणीचा खेळ बघत कधी सगळं विसरून जातो आपण कळतही नाही...
या मनाची तुटपुंज्या सुख दुःख घेवून
अविरत चालणार्या सृष्टी चक्रापुढं अगदी कणभर उरतो आपण.
सृजनाच्या सहस्त्र बाहूंनी कवेत घेतांनाचं जाणवत राहतं त्याचं अस्तित्व...
सांग तु आहेस का?

शुभ्र रानफुलांवरले दवबिंदू...
मोकळ्या रस्त्यावले पाण ओघळ अन् मधेच थुई थुई नाचून जाणारी खारुताई...
पिवळसर पोपटी ते गर्द हिरवाईत बदलत जाणारं पानांचं रूप जणू नवथर तारूण्यानं जाणतेपणात हळूहळू स्वतः ला मुरवत जाणं.
शाश्वता कडून अशाश्वताच्या प्रवासात हात धरून कुणी नेतय असं वाटतानाच त्याचं अस्तित्व जाणवत राहतं.
सांग तु आहेस ना?

दैनंदिन रटाळ कामांतली मरगळ झटकून टाकतांना विसाव्याचे काही क्षण अलगद ओंजळीत कुणी ठेवून जातं
निरागस हसू पाहून मनापासून हसणारे डोळे...

यातलं सुख किती अन् कसं मोजावे कुणी याचं परिमाण शोधूच नये कुणी...
मग जाणवत राहतं त्याचं अस्तीत्व
जगणं शिकवणारं...

निरागस उजळ हास्याला साक्षीस ठेवून खरंच विचारावसं वाटतं...
सांग तु आहेस का???

© सौ.स्वाती विवेक कुंभार