Login

वंशाचा दिवा की दुसऱ्याचे धन?

मुलगा की मुलगी कोण आई वडिलांना सांभाळत?
*वंशाचा दिवा की दुसऱ्याचं धन ?*

"मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे दुसऱ्याचं धन."
हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. संस्कृती, परंपरा, सामाजिक व्यवस्था याने ते मनावर इतकं खोलवर बिंबवलं आहे की अनेकदा आपण त्याच्या सत्यतेचा विचारही करत नाही. पण आजच्या बदलत्या काळात या विधानाकडे नव्याने पाहण्याची गरज आहे.

आपण जरा विचार करू या खरंच हे विधान आजही तितकंच लागू आहे का?

अपत्य म्हणजे अपत्य, मग ते कोणतंही असो!...मुलगा असो वा मुलगी हे दोघेही आपलेच रक्त, आपलेच श्वास, आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. आई-बाबांसाठी त्यांच्या लेकराचा चेहरा, त्याचं हसू, त्याची वाढ, सगळंच तितकंच प्रिय असतं. मग त्यात भेदभाव कशासाठी? मुलगा झाला की घरात आनंदाचा स्फोट होतो, वंशवृद्धीचा जल्लोष होतो, आणि मुलगी झाली की एक हलकंसं समाधान दाखवलं जातं ....का ? . ही मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे. कारण आपलं अपत्य हे फक्त "वंशवृद्धीचं साधन" नसून, आयुष्यभराचं आधारस्तंभ असतं.

मुलींचं प्रेम, हक्क आणि जबाबदारी काय? आजच्या शिक्षित, विचारशील पिढीत मुली सगळ्याच क्षेत्रात यशस्वी होत आहेत. त्या आईवडिलांवर प्रेम करतात, काळजी घेतात, त्यांच्यासाठी झुरतात. कित्येक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेत जिथे मुलीच त्यांच्या आईवडिलांचा उतारवयात खंबीर आधार बनल्या आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की प्रेम, जबाबदारी आणि आपुलकी याला लिंग नसतो.
या गोष्टी माणसाच्या मनात खोलवर रुजलेल्या असाव्या लागतात कारण ते संस्कारातून येतं, भावना आणि जाणीवेच्या पातळीवर तयार होतं.

मुलगा हे कर्तव्य समजतो पण मुलगी पण तेच प्रेम मनापासून करते. मग काय फरक उरतो हो ?

वृद्धाश्रम हे प्रश्नचिन्ह का ठरतं आहे आज ? आज देशभरात वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे.
का? आईवडिलांनी जीवाचं रान करून, आपल्या मुलांना लहानाचं मोठं केलं. शिक्षण दिलं, संस्कार दिले, जीवनात उभं केलं. आणि हेच मुलं, त्यांच्या जीवनाच्या संध्याकाळी त्यांना वृद्धाश्रमात पोहोचवतात?

का? माहित आहे ?

"लग्न झाल्यावर मुलगा बदलतो" असं म्हणतात.
खरंच का तो स्वतः बदलतो?
की कोणीतरी त्याला बदलायला भाग पाडतं बरर ?...पत्नीसाठी तिचे आईवडील, भाऊ, बहिणी सगळे हवेत.
पण तिच्या नवऱ्याचे आईवडील मात्र तिला ‘झेपत’ नाहीत. हेच ते दुभंगलेलं नात्याचं वास्तव, जे घराघरांत "तू-तू, मै-मै" चे वाद वाढवतं. आणि परिणामी, वृद्ध आईवडिलांना एकटं पाडतं.

आईच्या काळजाची वेदना....मुलांनी लग्न झाल्यावर आपल्या आईवडिलांना दुर्लक्ष केलं, स्वतःच्या संसारात इतके गुंतून गेले की ज्यांनी आयुष्यभर त्यांच्यासाठी सर्वस्व दिलं, त्या माणसांची आठवणही ठेवली नाही…

...मग ती आई, जिने रात्र रात्र जागून मुलाचा ताप बघितला , जेवणाचा घास त्याला खाऊ घातला, ती आज एकटी पडलेली असते…ही वेदना शब्दांत मावणारी नाही...ही वेदना मन पोखरते… आणि प्रश्न विचारते की "वंशाचा दिवा" म्हणून जन्माला घातलेल्या मुलाने हे अंधार का आणले?

मुलींचे संस्कार अधिक ठोस का वाटतात? तर कित्येकदा वाटतं, की मुलीच्या आईवडिलांनी तिला दिलेले संस्कार अधिक मजबूत, अधिक संवेदनशील असतात.
कारण ती तिच्या सासरच्या आईवडिलांनाही आपल्या जन्मदात्यांसारखीच सेवा करते, त्यांचं म्हणणं ऐकते, त्यांचं औषध पाणी करत राहते.

मुलगी हे नातं आपल्या मनाशी जोडते व ती हृदयाने जगते.

शहरातला त्रास आणि गावातली माणुसकी शहरीकरण, गगनचुंबी इमारती, मोठी घरं, हायटेक सोयी…पण सगळं असूनही एक गोष्ट हरवली ती माणुसकी ! शहरात प्रत्येक जण आपल्या आयुष्यात गुंतलेला, आपल्या "स्पेस" मध्ये बंद असतो. नातं जपण्यापेक्षा 'स्वातंत्र्य' जपण्याकडे झुकतो. म्हणूनच कदाचित वृद्ध आईवडिल"जोड" न वाटता "ओझं" वाटू लागतं...याच्या विरुद्ध, गावाकडं अजूनही माणसं एकमेकांना धरून असतात.
घर लहान असलं तरी मनं मोठी असतात.
वृद्धाश्रम म्हणजे काय हे तिथल्या लहानग्यांनाही माहित नसतं ते, कारण त्यांच्यासाठी आजोबा-आजी हीच शाळा असते, तीच संस्कारांची पाठशाळा असते.


एकत्र कुटुंब संस्कारांची शिदोरी आहे कायम...जिथं एकत्र कुटुंब असतं, तिथं वडीलधाऱ्यांचा सल्ला असतो, आजीआजोबांची गोष्ट असते, त्यांच्या चेहऱ्यावरचे सुरकुतलेले अनुभव असतात.
ही शिदोरीच पुढच्या पिढीला माणूस घडवत असते...आजच्या मुलांना कितीही आधुनिक शिक्षण दिलं, तरी जे संस्कार एकत्र कुटुंबात मिळतात, त्याची सर कुठेच नाही.

नव्या विचारांची सुरुवात मुलगा की मुलगी नव्हे, तर आधार कोण?

आजच्या पालकांनी, नवदांपत्यांनी, आणि नव्या पिढीने विचार करायला हवा..
वंशाचा दिवा की दुसऱ्याचं धन या जुनाट विचारात काही अर्थ उरला आहे का? आपलं अपत्य ते कोणतंही असो ते आपलं आधारस्तंभ आहे, आपल्या जीवनाचा कणा आहे. त्याने आपल्या उतारवयात साथ दिली पाहिजे, प्रेमाने विचार केला पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे "आपल्या अस्तित्वाला स्थान दिलं पाहिजे."

माणुसकीवर विश्वास ठेवा,
जग कितीही पुढं गेलं, तंत्रज्ञानाने प्रगती केली, तरी माणुसकी, आपुलकी, कृतज्ञता आणि प्रेम या गोष्टी हृदयातून जपाव्या लागतात.

मुलगा असो वा मुलगी...नातं हीच खरी संपत्ती आहे.

त्या नात्याच्या शेवटच्या टोकाला जर आज आपल्या आईवडिलांची एकटी, थकलेली नजर असेल…
तर आपण यशस्वी आहोत का?
हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा.