जलद लेखन स्पर्धा (ऑक्टोबर -२०२५)
शीर्षक:- लपवलेली साडी
विषय:- ननंदबाई येती घरा
भाग -१
'पटकन नवीन घेतलेल्या या साड्या लपवून ठेवते.' मनाशी पुटपुटत प्राजक्ताने नवीन आणलेल्या साड्यांची पिशवी कपाटात एका कप्प्यात लपवून ठेवली.
"चला बाबा, झालं आता हे महत्त्वाचं काम. मी ह्या साड्या अशा ठिकाणी ठेवल्या की त्या महामाया ताईंच्या नजरेला पडणारच नाही." ती हात झटकत कपाट बंद करत म्हणाली.
तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पसरला होता की जणू तिने कोणतं तरी किमती खजाना व्यवस्थित लपवून ठेवला होता.
पण तिला हे माहिती नव्हतं की तिचा नवरा योगेश तिला तसं करताना पाहत होता. त्याला तिचं तसं करणं थोडं विचित्र वाटलं.
त्याने कपाळाला आठ्या पाडत तिला विचारले,"काय गं प्राजू, काय ठेवलेस कपाटात? आणि काय ताईंच्या नजरेला पडणारच नाही?"
त्याच्या आवाजाने ती दचकली. नंतर सावरत म्हणाली, "काही नाही ओ? आणि मी कशाला ताईंचं नाव घेऊ? तुमचे कान वाजत आहेत. सरका, व्हा बाजूला. मला किचनमध्ये काम आहे."
तिने बोलताना नजर चोरली आणि बाकी काही जास्त न बोलता तिथून निसटली.
"अजबच आहे ही. नक्कीच हिने काहीतरी लपवून ठेवले आहे, ते ही ताईच्या भीती पोटी. पण काय?" जाणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तो कमरेवर हात ठेवत हाताची मूठ ओठावर हळूवार आपटत विचार करत म्हणाला.
एक क्षण त्याच्या मनात आलं की कपाट उचकून पाहावं पण तिचा दुर्गादेवीचा अवतार डोळ्यांसमोरून चमकून गेला तसा तो शांत राहत मनात म्हणाला,"नको योग्या, तिला जर हे कळलं ना की मी तिला न विचारताच कपाट उचकले तर ती तांडव करेल ते करेलच पण त्या बदल्यात उन्हात माझं मांडव घालायला ही कमी करणार नाही."
"अबे, मांडव उन्हात बांधल तरी मला सावली भेटलंच की. काय पण विचार करतोस तू? ते जाऊ दे. पण ताईशी हिला काय प्राॅब्लेम आहे? नेहमी तर तिच्याशी व्यवस्थित वागते, बोलते. मग आता काय झालं हिला? ताई काही बोलली का हिला? संध्याकाळी आल्यावर विचारतो." योगेश मनाशी संवाद साधत विचार करत ऑफिसला जाण्यासाठी तयार होता.
नंतर तो ऑफिसला गेला आणि प्राजक्ता पुन्हा आपल्या रूममध्ये आली. तिने कपाट उघडून ती पिशवी तिथेच आहे का पाहिली. ती तिथेच आहे हे पाहून तिचं समाधान झाले. तिने छातीवर हात ठेवून सुस्कारा सोडला.
"हुश्श ! आहे त्या ठिकाणी आहे ही पिशवी. मला वाटलं हे उचकून बघतात की काय? पण मी जे करतेय ते योग्य करतेय काय?" ती मनात विचार करू लागली.
प्राजक्ताची ननंद जानकी जेव्हा कधी माहेरी यायची तेव्हा तिला धडकीच भरायची. खाण्या - पिण्यापासून तिचे नखरे असायचे. माहेर म्हणजे तिला आराम करण्यासाठीच हक्काचे ठिकाण वाटायचे. (ते तर प्रत्येकीला वाटते.)
नवीन लग्न झाल्यावर तिच्याशी प्राजक्ता छान वागायची. तिला हवं नको ते सर्व अगदी मनापासून करायची. पण जानकीच्या मागण्या आणि ऑर्डरही वाढत गेल्या.
प्राजक्ताने स्वतःच्या आवडीची साडी घेतली तर तिच साडी जानकालाही आवडायची.
"प्राजू, हा रंग तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावर सूट होईल. तर ही साडी मला राहू दे. तू माझी घे. नाही तर मला घेतलेली साडी राहू दे मलाच. मला तर दोन्हीही खूप आवडलेत. तुझ्यासाठी तू दुसरी घे." असे म्हणत प्राजक्ताला काय वाटेल याचा विचार न करता जानकीने दोन्ही साड्या स्वतःसाठी ठेवून घेतल्या होत्या.
क्रमशः
काय होईल पुढे? वाचा पुढील भागात..
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा