जलद लेखन स्पर्धा (ऑक्टोबर-२०२५)
शीर्षक:- लपवलेली साडी
विषय:- ननंदबाई येती घरा
भाग:-२
प्राजक्ताचा चेहरा हिरमुसला. ते तिच्या सासूच्या नजरेतून सुटले नाही.
सासूने जानकीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण प्राजक्ताने जाऊ दे म्हणून विषय तिथेच संपवला. योगेशला यात रस नव्हता.
दर रक्षाबंधन आणि दिवाळीला योगेश जानकीला किमती साड्या किंवा महागडे गिफ्ट घेऊन द्यायचा ; पण तरी तिला प्राजक्ताच्या माहेरहून आणलेल्या साड्या आवडायच्या. एवढेच नाही तर तिचे सोन्याचे दागिनेही तिला आवडायचे. तेही ती एकदा घातले की परत द्यायची नाही.
तिची दुसरी एक सवय म्हणजे कधीही कोणताही बहाणा करून माहेरी येणे आणि प्राजक्ताकडून तोंडाने स्वतःची खातीरदारी करून घेणे. प्राजक्ता म्हणजे तिच्यासाठी हक्काची रोबोट वाटायची. पाहिजे तेव्हा पाहिजे ते तिने करून दिले पाहिजे असा तिचा अट्टाहास असायचा.
प्राजक्ताच्या सासूला आपल्या लेकीचे वागणे आवडायचे नाही.
"जानू, असे उठसूठ माहेरी येणे बरं दिसत नाही. त्यात तू प्राजूला किती त्रास देतेस. ती म्हणून समजून घेते. तिच्या जागी दुसरी तिसरी कोणी असती तर तिने तुला दारातही उभे केले नसते. अजूनही वेळ गेलेली नाही. सुधर गं बाई. असे नको व्हायला की तू यायची म्हणाली तरी तुझ्याविषयी कोणाला अप्रूप तर वाटणारच नाहीच शिवाय तुझी कोणती किंमत ही राहणार नाही." तिच्या आईने तिला चांगलेच खडसावले.
"ए आई, तू शांत बस्स गं. सुनेचा तुला भारीच पुळका आहे, बाई. उगीच तुझ्या तोंडाचा पट्टा चालवू नकोस. तिला काही प्राॅब्लेम नाही तर तुला काय प्राॅब्लेम आहे गं?." असे उत्तर देऊन जानकी तिला गप्प बसवायची.
"अगं थोडं तरी विचार करत जा तिच्या मनाचा." त्यावर पुन्हा तिची आई तिला म्हणाली.
"मी बापडी, सारखी येते म्हणून तू इतके सुनावतेस. तेही तुझ्या सुने समोर. तूच किंमत ठेवत नाहीस तर ही काय माझी किंमत ठेवेल." असे म्हणून ती प्राजक्ताकडे एक कटाक्ष टाकत रडू लागली.
तेव्हा कसे बसे प्राजक्ताने समजून घेत सासूंची समजूत काढली.
हळूहळू प्राजक्ताला जानकीचे वागणे खटकू लागले. ती समोर काही बोलत नव्हती पण मात्र मनात तिला खूप काही बाही बोलून जायची. पण नंतर तिलाच कसे तरी वाटायचे.
आताही तिने दिवाळीची खरेदी केली होती. तिच्या आवडीच्या साड्या खरेदी केल्या होत्या. सासू व नंदेसाठी खरेदी केलेल्या साड्या बाजूला काढून ठेवून बाकी साडी त्या पिशवीत ठेवून त्यावर 'खास माझ्यासाठी' असे लिहून तिने लपवून ठेवली होती. तेही एका मैत्रिणीच्या सांगण्यावरून तिने तसे पहिल्यांदा केले होते. त्यामुळे आपण योग्य करतो का? हा प्रश्न तिला मनाला सतावत होता.
शेवटी बघू जे होईल ते होईल असा विचार करून ती शांत राहिली. योगेशलाही नंतर ऑफिसच्या कामात त्या पिशवी बद्दल तिला विचारायचे लक्षात राहिले नाही.
दिवाळीचा सण आला. पण नेहमीसाखी मुलांसह आठ दिवस आधीच येऊन ठाण मांडून राहणारी जानकी यावेळी डायरेक्ट भाऊबीजेच्या दिवशी आली. याचं सगळ्यांनाच नवल वाटले. त्याचबरोबर प्रत्येक कामात ती मदत करत होती. या वेळी प्राजक्ताला तिने कोणताही त्रास दिला नव्हता.
भाऊबीजेला योगेशने दिलेली साडी कोणतीही कुरकुर न करता गुपचूप घेतली होती.
नेहमी प्राजक्ताला तिने कोणती साडी घेतली दाखवं म्हणून तगादा लावणारी जानकीने या वेळी एकदाही विचारले नाही. याचे प्राजक्तालाही विशेष वाटले.
दिवाळीचा उत्सव संपून दोन दिवस झाले. घरातील दिवे अजूनही टिमटिमत होते, पण प्राजक्ताच्या मनात एक प्रश्न सतत टिमटिमत होता, “ही जानकी एवढी शांत व बदलली कशी ?”
क्रमशः
काय कारण असेल जानकीच्या बदल्यामागे की ती नाटक करतेय?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा