Login

लपवलेली साडी (भाग:-३ अंतिम)

एका लपवलेल्या साडीमुळे प्राजक्ता आणि जानकीच्या आयुष्यात झालेल्या बदलाची कथा

जलद लेखन स्पर्धा (ऑक्टोबर -२०२५)

शीर्षक:- लपवलेली साडी

विषय:- ननंदबाई येती घरा

भाग -३ अंतिम

जानकी कुठल्याही गोष्टीत कुरकुर करत नव्हती, अगदी साड्यांबद्दलही नाही. नेहमीसारखी ताणतणावाची हवा घरात नव्हती, पण प्राजक्ताचं मन शांत नव्हतं.

त्या दिवशी दुपारी तिने रूममधील कपाट उघडून पाहिले आणि ती दचकलीच !

तिच्या लपवलेल्या साड्यांची पिशवी तिथे नव्हती.

“देवा ! कुणी पाहिलं का ते? ह्यांनी की… जानकीने?” असा विचार करून तिची छाती धडधडू लागली.

ती घाईघाईने कपाटातील सगळं सामान उलथापालथ करून तपासू लागली; पण पिशवीचा पत्ताच नव्हता.

तेवढ्यात मागून आवाज आला,“काय गं, काही शोधतेस का?”

प्राजक्ताने फिरून पाहिले. दारात जानकी उभी होती, हातात तीच साडीची पिशवी घेऊन.

क्षणभर दोघींच्या नजरा भिडल्या.

प्राजक्ता आवंढा गिळत अडखळत म्हणाली, “ताई, ही पिशवी तुमच्याकडे कशी?”

जानकी शांतपणे रूममध्ये येत ती पिशवी टेबलावर ठेवली.

“ साॅरी. काल चुकून मी तुझं कपाट उघडलं आणि ही साडी दिसली. आधी तर मला वाटलं, नेहमीसारखी तू माझ्यासाठी ठेवली आहेस. पण पिशवीवर लिहिलं होतं ‘खास माझ्यासाठी’.” जानकी थंड आवाजात तिच्या चेहऱ्याचं निरिक्षण करत म्हणाली.

प्राजक्ताच्या अंगावर काटा आला. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते. ती काही तरी बोलणार तोच जानकी तिला हाताचा पंजा दाखवत थांबवत पुढे म्हणाली,“ थांब प्राजू, आज बोलू दे मला. त्या पिशवी वर ते लिहिलेलं पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. तू पहिल्यांदाच स्वतःसाठी काहीतरी जपून ठेवलं आहेस. आणि मी... मी नेहमीच तुझं सगळं घेत राहिले. तुझ्या मनात किती साचलं असेल ना, प्राजू?”

प्राजक्ताचे डोळे पाणावले. ती काहीच बोलत नव्हती. मान खाली घालून उभी राहिली.

जानकी ती पिशवी तिच्या हातात देत हळव्या स्वरात म्हणाली, “ही घे, प्राजू, तुझी साडी तुलाच राहू दे. मला माझं प्रतिबिंब तुझ्या संयमात दिसलं, म्हणून आता खरंच बदलायचं ठरवलं मी.”

त्या क्षणी प्राजक्ताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.

ती दाटत्या कंठाने म्हणाली, “साॅरी, ताई. मी स्वार्थी विचार केला. मी साडी लपवून ठेवली. पण माझ्या मनात तुमच्या बद्दल रोष नव्हता. मला फक्त स्वतः साठी थोडंस काहीतरी राखायच होतं. मला वाटलं तुम्ही आता पुन्हा काहीतरी म्हणणार. पण तुम्ही माझं मन ओळखलतं.”

जानकीने तिचे डोळे पुसले. तिचा हात धरला.

“अगं वेडा बाई, तू का साॅरी म्हणतेस? साॅरी तर मी म्हणायला हवं. पण बरं झालं या लपवलेल्या साडीमुळे माझे डोळे उघडले. कधी कधी आपल्याला कोणी काही सांगत नाही, पण शांतता सगळं काही सांगते. तुझ्या शांततेने मला माझी चूक दाखवली. असंही माझ्या ननंदबाईनी माझे डोळे उघडले होते आधीच. तिला जेव्हा मी तुला घेतलेली साडी आणली म्हणून सांगत होते तेव्हा तीच साडी तिने मला मागितली आणि त्या साडीचा रंग तुझ्यापेक्षा मला जास्त चांगला दिसेल असे म्हणाली तेव्हा मला तेच आठवले जे मी तुला म्हणायचे. तेव्हा मला जसे वाटले तसेच तुलाही वाटले असेल असा विचार आला. तिने जाणीव करून दिली.”

"थॅंक्यू, ताई. तुम्ही मला समजून घेतलंत." प्राजक्ता तिचा हात हातात घेत हसत म्हणाली.

"अगं, वेडे. वेलकम. बट नो से थॅंक्यू. तू बरोबर तेच केलेस. तुलाही स्वतःसाठी थोडंस राखावास वाटतं असेलच ना. त्यात काय?" जानकी तिला गळ्याशी लावून घेत म्हणाली.

त्या दोघी मनापासून हसल्या.

सासू दुरून त्या दोघींना पाहत होत्या. आपल्या लेकीला उपरती झाली आणि आपल्या सुनेच्या मनाचा विचार केला हे पाहून त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.

योगेश दारातून हे सगळं पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरही समाधान दिसतं होतं.

तो हसत म्हणाला, “या दोघींच्या मनातली दिवाळी आज खऱ्या अर्थाने उजळली.”

त्या तिघी जणी एकत्र बसल्या. जानकी प्राजक्ताकडे पाहून हलकेच हसत म्हणाली,
“कधी वाटलं नव्हतं की ‘लपवलेली साडी’ एवढं काही शिकवेल.”

प्राजक्ताही हसून तिच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाली, “हो, कधी कधी वस्तू नव्हे, तर प्रसंगच आपल्याला जवळ आणतात.”

सगळे समाधानाने हसले.

समाप्त-

कधी कधी एका वस्तूमुळे लोक बदलतात. कारण त्यांना जाणवतं जसे आपल्याला मन आहे तसे दुसऱ्यांनी मन असतं. ते जपलं तर नात्यांची किंमत राहते आणि आनंदही टिकून राहतो.

जयश्री शिंदे

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all