लाटेवर स्वार मी (आत्मचरित्र)

It is an autobiography of me. Working at sea and day to day life as well as until now how I got to be where I am. My life at sea taught me the most survival techniques while living. How to enjoy the moments

शीर्षक वाचून नक्की काय? असे वाटले असेल ना?

''समुद्रासाठी जन्म, जेथे साहस खोलवर चालते. भरती आणि ताऱ्यांमधील क्षण टिपणे. प्रत्येक सूर्योदय आणि अँकर लिफ्टसह आनंद लुटणे. " स्वतःचे आत्मचरित्र लिहिणे म्हणजे भूतकाळातील घटना लिहीत वर्तमानात येऊन भविष्यकाळापर्यत जाणे.

माझे नाव पूजा. जन्म तेलंगणा, तेव्हाचे आंध्रप्रदेश. जन्म तेलंगणा मधला आणि लहानाची मोठी झाले ते पुण्यात. नाव पूजा आहे पण, मी देवाची पुजा करत नाही. नव्याने आलेल्या देवपूजेतील सामग्री सोडल्यास बाकी गोष्टी माहिती आहेत. मी मनातूनच नामस्मरण करून देवाला नमस्कार करते. मी नास्तिक नाही आणि श्रद्धाळू नाही. तरीही मला देवपूजा येते आणि देवासाठी फुलांचा हार सुद्धा बनविता येतो. फारच म्हणजे फारच क्वचित मी देवपूजा केलेली लक्षात आहे. असो.

आईच्या माहेरी पहिलेच आलेले छोटेसे बाळ. भरपूर लाड, कौतुक झाले. लहानपणी दिसायला गोरीपान आणि तब्येतीने सुद्धा गुटगुटीत असल्याने सगळ्यांच्या खांद्यावरच असायचे. आई सांगते की एकदा लाइट नव्हती म्हणून मोठ्या मामाने रात्रभर हातपंख्यांने हवा दिली. ह्याच मोठ्या मामाने माझा फोटो एका मिठाई बॉक्स साठी काढला होता.

आईवडिलांची पहिलेच अपत्य. लहान बहीण आणि आणि भाऊ येई पर्यंत प्रचंड लाड केले वडिलांनी. परिस्तिथी तशी अगदीच बेताची, तरीही त्यांनी महिन्याला 2 नवीन ड्रेस आणायचे माझ्यासाठी असे कधीतरी गप्पांमधून समजले होते. साधारण सहा-सात महिन्यांची असेल मी आणि सुदृढ बालक स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. बक्षीस म्हणून एक खेळण्यातले विमान मिळाले होते.

आई साधी गृहिणी आणि नाना शिवणकाम करायचे. कालांतराने बहिणीचे आगमन झाले आणि बाबांना कार्पोरेशन मध्ये नोकरी लागली. यथावकाश भावाचे आगमन झाले. घरात मुलगा किंवा मुलगी म्हणून भेदभाव कधीच केला गेला नाही. स्वातंत्र्य सगळ्या भावंडांना समान. मुलींना आमच्या घरात किंबहुना थोडे जास्त स्वातंत्र्य होते. परिस्तिथी बेताची म्हणून आमच्यापैकी कोणीच कधी कुठला हट्ट करत नसू. कारण नाना डय़ुटी करून यायचे आणि घरी आल्यावर शिवणकाम सुद्धा करायचे. बदलत्या काळानुसार आईने सुद्धा शिवणकाम शिकून घेतले होते.

माझे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. आम्हा तिघांच्या शिक्षणाचा खर्च, त्या सोबत लागणारी पुस्तके, गणवेश एकमेकांना देत आम्ही शिक्षण पूर्ण करत गेलो. शाळेत जाताना कधी कधी डब्बा नसे. पावसाळ्यात रेनकोट असणे सुद्धा चैनची गोष्ट होती. त्यावेळी एक संस्था होती. मिड डे पौष्टिक जेवण, पावसाळ्यात रेनकोट, हिवाळ्यात स्वेटर, कलाकृती, स्पर्धा अश्या अनेक गोष्टी असत. तोच रेनकोट फाटेपर्यंत आणि फाटल्यावर सुद्धा चिकटवून वापरायचो. हिवाळ्यात सुद्धा स्वेटरची हीच अवस्था असे. पुढच्यावर्षी सुद्धा वापराता येईल अश्या प्रकारे जपून वापरायचो.

टि. व्ही वर त्यावेळी एक कार्यक्रम लागे. त्यात पत्रे वाचून दाखविली जात. त्यावेळी मीही बघूयात आपले पत्र वाचले जाईल का करून पत्र पाठविले. पाहिल्या दोन आठवड्यात माझे पत्र काही आले नाही. जेव्हा माझे पत्र नावासह वाचले गेले तो आनंद अविस्मरणीय होता. आई नानांना खूपच आनंद झालेला पहिला होता. मी सायकलसाठी एकदा हट्ट केला होता. पण ती जवळपास दीड वर्षांनी मिळाली. त्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. कारण हट्ट करून विसरून जाणे आणि ते मिळणे, मग आठवावे की ह्याचा हट्ट केला होता.

शालेय जीवनात मला गोष्टी अधिक जास्त समजू लागल्या पासून मला वैमानिक व्हावे असे वाटू लागले होते. पण मार्गदर्शन करणारे कोणीच नाही. त्यावेळी वृत्तपत्रात करीअर साठी आठवड्यातून एकदा मार्गदर्शनपर पुरवणी येत असे. वैमानिक होण्यासाठी लागणारा खर्च पाहून निर्णय बदलला. अजून थोडे सर्च केले आणि हवाईसुंदरी ह्या वर नजर गेली. मनात पक्के केले की आपण हेच बनायचे.

बारावीत असताना एक स्पर्धा होती पुस्तक समीक्षणाची. 2-3 पाने भरून माझे समीक्षण दिले आणि माझा पहिला नंबर आला. बारावी होताच मी एका इन्स्टिटय़ूट मध्ये प्रवेश घेतला. हवाईसुंदरी होण्याचे स्वप्नं उराशी बाळगून होते. असे म्हणतात की, स्वप्नं एवढे मोठे पहा की ते दुसर्‍यांना स्वतःचे स्वप्नं वाटेल. नानांनी पैश्यांची जमवाजमव करून भरले.

कोर्स पूर्ण झाला तसे मी वरचेवर आजारी पडू लागले होते. डॉक्टर कडे गेलो तर फुप्फुसात पाणी असून लास्ट स्टेजला आहे सांगितले. ऐन दिवाळीत मी हॉस्पिटलमध्ये. मला पटकन बरे होऊन कामाला लागायचे आहे. मला एक प्रकारचा गिल्ट निर्माण झाला. नानांनी एवढे पैसे भरले. 'माझे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि मी गेले तर कसे होईल? हे स्वप्नं फक्त माझे एकटीचे राहिले नव्हते. माझ्या परिवाराचे सुद्धा होते. ' त्यात औषधांचा खर्च पाहून तणावात गेले होते. कारण पुढचे दोन-अडीच वर्ष औषधे चालूच होती. हा तणाव माझ्या हसर्‍या चेहर्‍याने झाकून टाकला. पुढे पुढे मी काहीशी अबोल जास्त झाले. कोर्स झाला तसं एका छोट्याश्या हॉटेल मध्ये मी हाऊसकिपिंग सुपरवायझर म्हणून तीन महिने काम केले. तिथून पंचतारांकित हॉटेल मध्ये मुलाखत दिली आणि फूड अॅन्ड बेवरेज मध्ये कामाला लागले. ह्या मुलाखती मध्ये मला कामाचे स्वरुप सांगून विचार करण्यास वेळ दिला होता. जिथे मी पटकन होकारार्थी उत्तर दिले होते. पण मला ज्या कामाचे स्वरुप सांगितले त्याच्या अगदी विरुद्ध माझे काम होते.

आयुष्यात लोकांचा सामना करण्याची वेळ ती पाहिलीच. आत्मविश्वास कमीच म्हणजे काहीसा बुजरेपणा. कारण मुलाखतीमध्ये सांगितले गेले एक आणि मला उभे केले ते रेस्टॉरंट होस्ट म्हणून. रोजचा बस प्रवास, 10-12 तास उभे राहूनच काम. काही प्रसंगी 13-14 तास सुद्धा उभे राहून काढलेत. ही अशी जागा जिथे सुरुवातीचे काही दिवस माझी धांदल उडाली. कारण सगळेच नवीन असले तरीही शिकण्याची जिद्द मला रोज प्रोत्साहित करत होती. एकदा एका प्रतिष्ठित नावाजलेल्या व्यक्तीला मी नंबर विचारला रेकॉर्डसाठी तर अस्सा चिडला होता. म्हणजे त्या व्यक्तीच नाव ऐकून होते पण बघितले नव्हते कधीच. अशे बरेच किस्से झाले जिथे मॅनेजरने सर्वांसमोर काही बोलण्यापेक्षा एकट्या मधेच चुकीची जाणीव करून देत असे. प्रत्येकाच्या बाबतीत त्यांचा हा स्टॅन्ड पाहून मलाही एका लीडर मध्ये असणार्‍या गोष्टींची आपोआपच शिकवणूक मिळत गेली.

ह्या कामा सोबतच मला वृत्तपत्रात विचारलेल्या प्रश्नांना मत लिहून पाठवायचा छंद लागला. दर आठवड्याला एक प्रश्न येत. सोबतच मागच्या आठवड्याच्या प्रश्नाचे मत फोटो सहित येत. त्यामुळे हॉटेल मध्ये बरेचजण ओळखत की ती पूजा म्हणजे रेस्टॉरंट होस्ट. माझ्या भावंडांचा सुद्धा फोन येत. मैत्रिणीचे मेसेज येत त्यामुळे खूप छान वाटे.

ह्या कामामुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. सोबतच पायांनी सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला नाजूक असणारे पोटरी दगडासारखे कडक झाले होते. जीव नकोसा होयचा कारण, रोज तास-दीडतास बसने प्रवास करावा लागत असे. मिळाली तर सीट नाही तर उभ्यानेच प्रवास करावा लागत असे. ह्या सगळ्यात नातेवाईकांचे टोमणे होतेच सोबतीला. त्यामुळे मी कुठेही जाणे बंद केले. पण देवाच्या कृपेने माझ्यासोबत काम करणारे सहकारी आणि मॅनेजर समजूतदार मिळाले. कारण त्यांना जाणीव होती की मी पहिल्यांदाच अश्या ठिकाणी काम करत आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कामाची लाज आता वाटत नाही. कारण मॅनेजर स्वतः सुद्धा टेबल साफ करून अरेंज करत असेल तर तिथे मी तर नवीनच. होता नव्हता तेवढा सगळा इगो तिथेच गळून पडला तो पुन्हा कधी न येण्यासाठी. ह्या दरम्यान मी हवाईसुंदरीसाठी मुलाखत सुद्धा देणे चालू ठेवले होते.

बी. काॅमच्या पाहिले वर्ष सुरू झाले आणि त्याच वर्षापासून कामाला लागले. कॉलेज मध्ये जमेल तसे जाणे. परीक्षेच्या दिवसात फक्त परीक्षेपुरते सुट्ट्या मिळत. कारण माझा जॉब पूर्ण वेळ होता. इथे कमाला लागून सुद्धा मी मोबाईल घेतला नव्हता. मॅनेजर रोज ओरडत असे. त्यावर माझेही उत्तर तयार असे. कारण मोबाईलची अजिबात गरज नव्हती. घरी आईवडिलांच्या मोबाइल वरुन माझे कामे होऊन जात. तरीही काळाची गरज म्हणून जवळपास चार महिन्यांनी स्वकमाईतून पहिला मोबाईल घेतला.

बारावीच्या दिवसात कॉलेज बाहेर एका कपड्यांच्या शो रूम साठी एक प्रसिद्ध सेलेब्रिटी आला होता. तेव्हा माझ्या मैत्रिणींना पहायचे होते म्हणून मीही दूर त्या गर्दीतून उन्हात डोळे किलकिले करत थोडे वैतागून पाहिले. पण काळ कसा असतो पहा. त्याच सेलेब्रिटीला मी अगदी जवळून पाहिले. माझ्या हॉटेल मधल्या दीड वर्षाच्या काळात मी अनेक प्रसिद्ध व्यक्तिंना पाहिले. मला ह्या गोष्टीचे समाधान आहे की मी माझ्या परिवाराला पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्याकरिता बोलावू शकले. त्यांनाही माझ्या कामाचा थोडा भाग दाखविता आला.

साधारण दीड वर्षांनी मी हा जॉब सोडला. शेवटचे वर्ष होते आणि त्यात तडजोड नको व्यवस्थित सगळे विषय पास होऊन पदवीधर होऊन मग पुन्हा कामाला लागावे असा विचार केला. जॉब सोडल्याच्या दोन महिन्यांनी पाय प्रचंड दुखून येऊ लागले. कारण पायांवर आलेला ताण अचानक कमी होऊ लागल्याने पाय खूप दुखून यायचे. पाय इतके ठणकायचे की मी रडू लागायचे. तेव्हा आई जवळ घेऊन बसे. पायाला स्प्रे मारे, बाम लावूनही फारसा फरक नसे. त्यामुळे बाहेर जाणे अजून कमी झाले.

पुढची दीड वर्ष विना जॉब काढले. त्याच काळात प्रचंड नैराश्य आले. नातेवाईकांचे टोमणे, प्रश्न आणि खोचक बोलणे अशे अनेक गोष्टींमुळे कोणाच्या घरी किंवा कुठल्याही समारंभाला जाण्याची इच्छा राहिली नाही. ह्यामुळे घरातही वातावरण काहीसे नकारात्मक झाले. सहसा करून जवळपास प्रत्येक घरात एक विचार असतो. घरातील मुलगा किंवा मुलगी ने त्यांचे ध्येय साध्य करण्यात अपयशी झाले तर लग्न करून टाका. ह्यामुळे आजुबाजुला बोलणार्‍या लोकांची तोंडे बंद होतील असा गोड गैरसमज असतो. असे खरेच होत नाहीच. उलट अजून जास्त खोचकपणे बोलले जाणारे शब्द ऐकावे लागतात. जवळ असलेली जमापुंजी शिक्षणासाठी खर्च केली. पदवीधर झाले आणि जॉबची संधी आली.

एअरलाईन्स ग्राऊंड सिक्युरिटी म्हणून विमानतळावर जॉबला लागले. अनुभव पाठीशी काहीच नाही. त्यातही चार पदांमध्ये एक जागा फिमेलसाठी होती. आता हॉटेल आणि एअरलाईन्सचा दूरदूर पर्यंत एकमेकांशी साधर्म्य नाही. पुन्हा एकदा नव्याने सगळे शिकून घेण्यास सज्ज झाले. अभ्यास करून परीक्षा दिली. ही परीक्षा म्हणजे 100 पैकी फक्त 16 प्रश्नांची उत्तरे चुकीची देऊ शकतो. कारण एका चुकीच्या उत्तराला मार्क कट आणि पास होण्यासाठी 80 पाहिजे. परीक्षा ऑनलाईन आणि निकाल सुद्धा ऑनलाईन. पुन्हा एकदा सुरू झाला माझा बस प्रवास. ह्यावेळी एकाच ठिकाणी उभे राहण्याचे काम नव्हते. बर्‍याच ठिकाणी काम असे. नवीन शिकण्याची जिद्द खूप असल्याने भरपूर गोष्टी शिकत गेले. चुका झाल्याच तर त्या भविष्यात घडू नये ह्यासाठी चर्चा करत. एकदा तर मी सलग दोन दिवस फक्त बॅग स्कॅन करायची एक्स-रे मशीन वरच होते. पूर्ण 8 तासात फक्त 30 मिनिटे खाण्यासाठी सोडले तर सतत मॉनिटर पाहून डोळ्यांना त्रास झाला आणि मेंदूवर सुद्धा. कारण रोटेशन करायला स्टाफ नव्हता. त्यानंतर स्वप्नातही मला एक्स-रे मशीन दिसू लागली. एकदा असे झाले एअरक्राफ्टच्या दरवाजा जवळ ड्युटी होती नेहमीचीच. अगदी 5 मिनिटे अगोदर मला समजले की दोन आय. पी. एल. च्या टीम येणार आहेत. मला फोटो काढायचे होते पण माझी ड्युटी फर्स्ट. सगळ्या क्रिकेटमधील खेळाडूंना एकदमच पाहिल्याने थोडीशी थरथर जाणवली माझ्यात. तरीही स्वतःला खूप शांत ठेवत बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण केली.

माझ्या आयुष्यातली सर्वात अनमोल क्षण ज्या दिवशी मी आई नानांचे विमान प्रवासाच तिकीट काढलं. आधी आईने एकटीने प्रवास केला तेव्हा तिच्या शेजारी प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यामुळे आईचा पहिला विमानप्रवास प्रचंड अविस्मरणीय झाला. नानांचा पहिला विमानप्रवास विंडो सीट आणि आईचा अनुभवी प्रवास होता म्हणून मी अगदी निश्चिंत झाले होते. आमच्या तिघांचा सोबत विमानप्रवास सुद्धा अविस्मरणीय अनुभव होता.

कामाला लागून जवळपास 2.5 वर्षांनी मी माझी स्वतःची पहिली स्कूटर घेतली. त्यामुळे बराच वेळ वाचू लागला होता. बर्‍याच वेळा शांत राहण्याचा स्वभाव दुसर्‍यांना काहीही बोलण्याची परवानगी देत होता. पण ऐकून घ्यायचे आणि एकदाच उत्तर द्यायचे हा माझा स्वभाव होता. इथे मला खूप छान मैत्रिणी मिळाल्या. कधीही आम्ही एकत्र शिफ्ट मध्ये असलो तर खूप मज्जा करायचो. त्यामुळेच आम्ही सगळ्या खूप स्ट्राँग होतो. अजूनही ही मैत्री टिकून आहे.

आता मी अशी, जिला पोहता सुद्धा येत नाही. म्हणजे शिकले होते आणि विसरून गेले त्यात आत्मविश्वास कमीच पोहण्याच्या बाबतीत. मी जेव्हा हॉटेल मध्ये कामाला होते त्यावेळी माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले कलीग सांगायचे की अजून एक वर्ष करेन मग क्रुज मध्ये जाईन. तेव्हा ते ऐकूनच भीती वाटली होती. एवढे मोठे जहाज बुडले तर? त्यात मी लहानपणापासून अगणित वेळा टायटॅनिक सिनेमा पाहिला होता. त्यात मला पोहता येत नाही. म्हणून तेव्हा मी मी माझ्या त्या वेळेच्या वयाप्रमाने विचार करून नको असा फक्त विचार केला. पण नशिब कसे असते पहा, जे नको म्हंटले अनावधानाने कधी काळी ते तिथेच नेऊन जाते. कदाचित हे विधिलिखित असावे.

मुंबई मध्ये ये -जा सुरू झाली. मुलाखतीसाठी वारंवार येणे -जाणे सुरू झाले. त्यात खर्च सुद्धा बराच होत होता. अखेर एका ठिकाणी झाले. मुलाखत झाली आणि फोन करून सांगू करून सांगितले खरे, पण फोन करून मला पलीकडून ओरडा मिळाला. पुन्हा एकदा मुलाखत साठी येण्यास सांगून ह्यावेळी नीट उत्तर दे सांगितले. ह्यावेळी संधीने स्वतः माझ्यासाठी दार ठोठावले म्हणेन. मुलाखत झाली आणि तिथेच मला सांगितले गेले की सिलेक्शन झाले आहे. आता डॉक्युमेंट्स आणि बर्‍याच गोष्टींसाठी धावपळ होती. सिलेक्शन झाल्या झाल्या तिथेच ऑनलाईन इंग्लिश टेस्ट घेतली गेली. ऑनलाईन फायनल मुलाखतीच्या वेळी नेटवर्क इश्यू खूप झाला. त्यामुळे आता ही संधी जाते की काय वाटून गेले. पण दुसर्‍या दिवशीसाठी लगेचच शेड्यूल केल्याने जिवाला थोडी शांतता मिळाली. फेस टू फेस ऑनलाईन इंटरव्ह्यू यशस्वीपणे पार पडली. मेडिकल आणि इतर गोष्टींची माहिती दिली गेली.

सगळ्यात आधी STCW (Standards of Training, Certification, and Watchkeeping) कोर्स पूर्ण केला. ह्या कोर्ससाठी साधारणपणे 14 दिवस लागतात. ह्यामध्ये बेसिक सरव्हायवल टेक्निक शिकविले जातात. ज्यासाठी परीक्षा ऑनलाईन असून सर्टिफिकेट दिले जाते. सर्टिफिकेट दिल्यावर एक ऑनलाईन पोर्टल वर जाऊन CDC (Continuous Discharge Certificate) साठी भारतसरकारची वेबसाइट DG शिपिंग वर जाऊन रजिस्टर करणे. ही प्रक्रिया काहीशी क्लिष्ट आणि त्यात ठराविक एक्सप्लोरर मधेच ही वेबसाईट खुले.

त्यानंतर अमेरिकेच्या व्हिसासाठी धावपळ. सगळ्या सुचना लक्षात ठेवून त्या करत गेले. साधारणपणे दोन दिवस लागतात ह्या व्हिसासाठी. इंटरव्ह्यू होता त्या दिवशी धडधड झाली. कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स आतमध्ये न्यायला परवानगी नव्हती. फक्त आपले फोल्डर ज्यात डॉक्युमेंट्स असतील. आत मध्ये नेमून दिलेल्या विंडोवर जाऊन बाकीच्यांना इंटरव्ह्यू देताना पाहून माझे मन नकळतपणे स्वतःला तयार करू लागले. पण स्वतःला हेही सांगितले की कोणाचेही इंटरव्ह्यू निरीक्षण करायचे नाही. कारण मला नेमून दिलेल्या विंडोच्या शेजारील विंडोवर एकामागे एक व्हिसा नाकारला गेला. आपण आपले बेस्ट द्यायचे शांतपणे समोरच्याला ऐकू जाईल एवढाच आवाज ठेवायचा. मुलाखत घेणार्‍या व्यक्तीने एकच प्रश्न जवळपास 6-7 वेळा विचारला. त्याला मी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे उत्तरे देत होते. अखेर त्याने एक छोटासा कागद दिला. हा कागद म्हणजे तुम्हाला व्हिसा अप्रुव झाला. जर पासपोर्ट परत दिला म्हणजे व्हिसा नाकारला गेला. ती सुद्धा एक अचिव्हमेंट होती. माझ्यासोबतच सिलेक्ट झालेली एक मैत्रीण दोघींनी मिळून बाहेर आल्यावर उद्या मारल्या होत्या.

सोबत फिलिपिन्स देशाचा व्हिसा लागला. मेडिकल करून सुट्ट्या घेऊन ट्रेनिंगसाठी मनिलाला गेले. परक्या देशात जिथे चिकन, पोर्क आणि बीफ ह्या शिवाय दुसरे अन्न नाही असे मानणार्‍या देशात आमचे ट्रेनिंग एखाद्या समुद्रात सोडून दिलेल्या लहान बोटी सारखी होती. इथे मुंबई सारखेच वातावरण, उष्ण आणि दमट. 200 मीटरवर असलेल्या मॉल मध्ये जाताना हॉटेल मधील रिसेप्शनीस्टने भरपूर सूचना दिल्या. दुसर्‍या दिवशी आम्हा सगळ्यांना ट्रेनिंग सेंटर मध्ये नेले. तिथे आम्ही आणलेले खाण्याचे सर्व सामान जप्त केल्याने आम्ही सगळ्या उदास झालो. युनिफॉर्म, लॅपटॉप आणि शेड्यूल दिले गेले.

जिथे मी शाळा संपल्यावर कधीही पळाले नाही आणि कसरत केली नाही तिथे रोजच्या रोज 30-45 मिनिटे कसरत चाले. त्यानंतर 45 मिनिटात आवरून ब्रेकफास्ट करून ट्रेनिंग रूममध्ये हजर होणे. ब्रेकफास्ट म्हणजे फक्त फिलिपिनो फूड. ब्रेकफास्ट, कॉफी ब्रेक, लंच, टि टाइम आणि संध्याकाळी सहा वाजताच डिनर, तसेच रात्री आठ-नऊच्या सुमारास ट्रेनिंग सेंटर मधेच असलेल्या शॉप मधून एखादे चीप्सचे पाकीट प्रत्येकाला दिवसाला नेमून दिलेल्या 25 peso मध्ये घेता येत असे. राइस आणि फक्त ती बेचव करी खाऊन आम्हा मुलींचे हाल हाल झाले.

चुकून एकीकडे लोणचे आणि फरसाण राहिले होते बॅगमध्ये तर आम्ही दरवाजा बंद करून दोन- दोन घास खाऊन लोणच्याची फोड चोखून टॉयलेट मध्ये फ्लश रूम फ्रेशनर मारायचो. सकाळी 05:30 एकजण येऊन रूम मधला AC बंद करून जायचा. दरवाजा लॉक असेल तर शिक्षा मिळे. १४ दिवसांच्या ह्या ट्रेनिंग मध्ये एक आठवड्यानंतर डाळ भात, टोमॅटो चटणी आणि रबरासारखा असलेला मिनी डोसा मिळू लागल्यावर जिवाला थोडे बरे वाटले. काहीच नसण्यापेक्षा हेच सही करत तेही खाऊ लागलो.

ट्रेनिंग तर छानच सुरू होती खरे. तिथेही देशभेदाचा सामना करावा लागला. 1 जपान, 3 चीन, ७ भारतीय आणि १६ फिलिपीनो. सोप्पे नाही बाहेरच्या देशात सरव्हायव करणे. तेव्हा मी माझ्या सोबतच्या मैत्रिणींना बोलले सुद्धा की, बाहेरच्या देशात येऊनच समजते की का आपला देश अविश्वसनीय आणि मौल्यवान आहे. एका रविवार फक्त बाहेर फिरायला सगळ्यांना नेले होते. त्यात मी सुद्धा काराओके मनसोक्त एन्जॉय केला.

परत निघालो ते भरपूर आंबट गोड आठवणी सोबत. आल्यावरही अजून बरेच काम बाकी होते. मी असलेल्या कंपनीमध्ये राजीनामा द्यायचा बाकी होता. तिथे कोणालाही काहीही कल्पना दिली नाही. कोणाला जाणून सुद्धा घ्यायचे नव्हते मग मी सुद्धा दुर्लक्ष करून, माझी दिलेली नोटिस पिरीअड संपविली आणि सुरू केले बॅग भरायला.

एक नवे विश्व. हो माझ्यासाठी विश्वच. कारण पाण्यावरच जग मी पुढचे आठ महिने जगणार होते. घर, कुटुंब, मित्र-मैत्रीणी ह्या पासुन कोसो दूर. पाहिल्या फ्लाइट मधेच मी रडायला सुरुवात केली तशी केबिन क्रुने जवळ येऊन प्रेमाने चौकशी केली. मला धीर दिला आणि अबुधाबी पर्यंत असलेल्या फ्लाइट मध्ये माझी खूप काळजी घेतली. पुढच्या फ्लाइट साठी माझ्या शेजारी बसलेल्या सह प्रवाशाने सांगितले की काय असेल. तत्पूर्वी त्या ड्युटी-फ्री झोन मधून जाताना सगळ्याच गोष्टींचे निरीक्षण करत जात होते. पुढच्या फ्लाइटसाठी परवानगी द्यायला इमिग्रेशनने जवळपास 35 मिनिटे घेतली. फक्त अमेरिकेत जाणार्‍या प्रवाशांसाठी जास्तीचे वेगळा अजून एक स्क्रीनिंग एरीया होता. तिथे माझ्यासारखे बरेच प्रवासी वेटिंग कक्षात बसले होते. त्या एरिया च्या आधीच लोकांनी खरेदी केलेल्या बाटल्या कचर्‍याच्या डब्यात टाकायला सांगत होते ते पाहून मला असंख्य प्रश्न पडले होते. पुढे लगेचच त्या प्रश्नांची आपोआपच उत्तरे मिळाली.

झाले एकदाचे क्लिअर आणि पुढच्या विमानासाठी उत्साहाने गेले. गेल्या गेल्या लगेचच झोपी गेले. कारण प्रचंड थकवा आलेला होता. प्रवास १४ तासांचा होता. पण शिकागोमध्ये वातावरण खराब असल्याने १६ तास लागले. तिथे मी छानपैकी फ्रेश होऊन खासकरून त्या वॉशबेसिनला येणार्‍या कोमट-गरम पाण्याने प्रचंड सुखावले. आता पुन्हा एका विमानप्रवास. माझे पहिलेवहिले होम पोर्ट 'अँकरेज,सीवर्ड'. माझी एक बॅग नाही आली तेव्हा मला थोडे रडू आले. पण रडून चालणार नव्हते कारण बॅगेज् मिसिंग रीपोर्ट द्यायची होती. त्याची कॉपी ऑन बोर्ड गेल्यावर क्रु ऑफिस मध्ये द्यावी लागणार होती. विमानतळावर कामाला असताना लोकांच्या हरविलेल्या बॅगा पाहिल्यात आणि आज माझी आली नाही हे आठवून मला त्याही परिस्थितीत हसायला आले. प्रक्रिया पूर्ण करून हॉटेलच्या दिशेने रवाना झाले.

एवढे सुंदर हॉटेल आणि हॉटेल च्या रूम मध्ये मन काही लागेना. कारण पाहिलाच प्रवास आणि असे झाले. उद्याचे काय हेही डोक्यात होते. त्यानुसार तयारी करून सकाळी रेडी होऊन निघायचे आणि थेट शिप मध्ये एंट्री असे मला वाटलेलं पण निघालो ते एका बस मध्ये ज्यात शिप पॅसेंजर सुद्धा होते. ती अद्ययावत बस पहिल्यांदा पाहिली ज्यात टॉयलेटची सुविधा सुद्धा होती. साडे तीन तासाच्या प्रवासात ड्रायवर कम गाईड असलेल्या व्यक्तीने वळणागणिक माहिती द्यायला सुरुवात केली. समुद्राच्या कडेने होणारा हा प्रवास फारच सुखावह होता.

प्रवास संपला आणि दिसू लागले माझे पाण्यावरचे भले मोठे जहाज. गम्मत म्हणजे मी फोटो घ्यायला सुद्धा विसरून जावी आत जाता जाता. आता सुरू झाली खरी परीक्षा माझी. सगळेच पुन्हा नवीन, मागच्या अनुभवाचा 10% भाग वगळता बाकी सगळेच नवीन. रहायची जागा, काम करण्याची जागा आणि जगभरातून आलेल्या देशातील लोकांसोबत काम करणे.

'जहाज सुरक्षा रक्षक' म्हणून काम करणे म्हणजे डोक्यावर नेहमी टांगती तलवार असणे. माझ्यासोबत असलेल्या भारतीय कलीगने जाता जाता मोलाचा सल्ला दिला की कोणालाही पैसे द्यायचे नाहीत. बर्‍याचदा मी एखादे काम करत असताना कोणीतरी येऊन माझ्या हातातील काम घ्यायचे. तेही सुपरवायझर किंवा सिक्युरिटी ऑफिसर येण्याच्या आधी. ह्यामुळे माझी चिडचिड होत कारण ते काम करत आहेत आणि मी नाही असे दिसायचे तरीही शांतपणे काम करायचे आणि शिकून घ्यायचे असे ठरवले. पूर्ण शिप फिरून लक्षात ठेवणे सोप्पे नव्हते. तरीही शिपवर असलेल्या शिप मॅप्सच्या आधारे थोडे थोडे समजून घेऊ लागले.

तिथे काही महिनेच झाले आणि सोबतच्या कलीग्सनी माझी श्रीमंती काढायला सुरुवात केली. लग्न न झालेली मुलगी इथे येऊन एवढा पैसा कमावते म्हणजे तिला काही गरज नाही. आपण मागायला पाहिजे तिने दिल्यावर परत द्यायची गरजच नाही कारण लग्न झालेले नाही. हे अशे विचार ऐकून मी मग माझ्याच भाषेत उत्तर देऊन टाकले. म्हणजे ह्या लोकांनी लग्न करून पोरं जन्माला घातली आणि बिचारे म्हणून चेहरा करायचे. ३ दिवसांनी माझी बॅग एजंट घेऊन आला. ती बॅग पाहून मला अतिशय आनंद झाला.

माझे लग्न झाले नाही ह्याचा अर्थ असा अजिबात नव्हता की मला जबाबदार्‍या नाहीत किंवा खर्च नाहीत. फक्त कोणाला सांगायचे नाही किंवा कुठल्याही प्रकारचे तोंड नाही बनवायचे कारण मागच्या कामावर असतानाचा अनुभव गाठीशी होता. कोणाला समजले की तुमचे लोन आहे तर प्रचंड त्रास देऊन जीव नकोसा करून सोडतात. त्रास देणार्‍या व्यक्तिंना एखाद्याने लोन घेतले असेल तर ते जॉब सोडणार नाहीत हे माहिती असते. पण इथे हा प्रकार उलट होता. इथे बाकीचे काम करणारे कलीग्स माझे अमुकतमुक लोन आहे, एवढी मुले आहेत वैगरे करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत. इथे कोणी त्रास दिला तर ए.आर. हाकेच्या अंतरावर असत.

माझ्यासाठी इथल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे म्हणजे डोकेदुखी होती. कारण तेच तेच प्रश्न सतत विचारले जाई मग मीही व्यंग्यात्मक उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपल्या देशावर सुद्धा बोट उचलगिरी सुरू केली तेव्हा तर त्यांना आमच्या देशात काय आहे आणि नाही ह्याचा अत्यंत कमी शब्दात लेखाजोगा मांडल्यानंतर माझ्याकडे पुन्हा प्रश्न कोणी विचारले नाहीत. नवीन असल्यामुळे बर्‍याच वेळा मला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला तरीही ठामपणे राहून ऐकणारा कान झाले.

राजकारण इथेही होतेच. आमचा देश म्हणजे सगळ्यात भारी वैगरे सारखे प्रकार चालत. मी आपल्या देशाबद्दल काही सांगायची गरजच नव्हती. कारण जगभरात आपल्या देशाची कीर्ती आपोआपच पसरलेली होती. कामाच्या बाबतीत सुद्धा केलेले राजकारण असो किंवा भेदभाव असो, ह्या गोष्टींमुळे मी थोडीफार नैराश्यात गेले होते. कारण ह्या गोष्टी वेळीच नाही हाताळल्या तर प्रचंड मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. ह्यावर उपाय म्हणून मी फक्त कृतीतून बोलू लागले. काम दिलेले सगळे व्यवस्थित करायचे.

माझे काम म्हणजे दुरून डोंगर साजरे. मी ' जहाज सुरक्षा रक्षक ' म्हणून काम करताना भरपूर गोष्टी शिकत गेले. खूप वेळा लोकांना फक्त फिरायला मिळते दिसते. पण असे अजिबात नाहिये. रोजच असतो सोमवार, त्यामुळे कोणी ' मंडे ब्लू' म्हंटल्यावर हसू येते थोडेसे. कुठल्याही परिस्थितीत शांत राहून दिलेल्या सूचनांचे पालन करणे. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेणे आणि त्याची नोंद करणे. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे घड्याळ, पेन आणि पेपर. नाइट डय़ुटी म्हणजे रोजचे साधारण ९ कि.मी. चालणे होत. झोपेचा त्याग करून फिरायला बाहेर जाऊन येत. पण त्यामुळे रात्रीच्या चालण्यावर परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे आधी ताळमेळ बसवला. कारण 14 दिवसांची ही नाइट डय़ुटी ६ व्या दिवशीच जीव काढून टाके. ही डय़ुटी म्हणजे दिवसा पोर्ट किंवा एॅट सी काम करतो त्यापेक्षा वेगळी. कारण सगळ्याच गोष्टींचा लेखाजोगा लिहावे लागे. ट्रेनिंग सुद्धा भरपूर असत.

माझी प्रामुख्याने डय़ुटी गॅन्ग वे पाशी असत. स्क्रीनिंगचा एक सेटअप पोर्ट डे मध्ये करावे लागे. त्यात कनेक्शन जोडण्या पासून मशीन कॅलिब्रेट करणे, लॅपटॉप चालू करणे, नोंद करणे अश्या अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागे. गॅन्ग वे म्हणजे अशी जागा जिथे लोकांची आत- बाहेर ये-जा चालू असते. येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे कार्ड स्कॅन करताना सिस्टम मध्ये दिसणारी व्यक्तीच बाहेर जात आहे ना आणि परत येत आहे ना पाहणे. गर्दीच्या वेळेस कार्ड स्कॅन करताना डोके शांत ठेवून स्कॅन करणे. कारण एक मिस स्कॅन प्रचंड त्रासदायक ठरते. त्यामुळे शिपचे डिपार्चर डिले होते त्यामुळे प्रचंड मानसिक दबावाखाली पूर्ण टीम असते. कारण एकाची चूक आणि सगळ्यांना बोलणी म्हणजे नकोसे वाटते. ज्याने चूक केली त्याला एकांतात समज दिली जातेच. जेव्हा समुद्रात शिप असते तेव्हा सेफ्टी जाॅब करायला जावे लागते. सेफ्टी जॉब ज्यात फायर एस्टींग्युशर चेक करणे, फायर हायड्रान्ट, लाइफबुओय, ओवर बोर्ड लाईट चेक करणे, फायर डोर चेक, त्यासाठी असलेले स्विच काम करत आहे ना आणि किती वेळ लागतोय बंद होण्यास अशी अनेक कामे पटापट शिकून घेतली. त्यात कधी कधी गरम- जोरदार हवा असलेल्या इंजिन रूम मध्ये कानात नाॅइज कॅन्सलिंग बडस् टाकून जायचे. तिथे पाऊल ठेवल्या बरोबर घामाने अंग काही क्षणात भिजून जायचे.

रोजच मोकळ्या समुद्रात कुठेतरी अंधारात असलेले जहाज आणि आकाश भरून तारे पाहताना मनाला एक प्रकारचा सुकून मिळे. त्यातही कधीतरी दिसे तुटता तारा डोळे बंद करून पटकन विश मागायची असते हेही विसरले. कारण त्याचे सौंदर्य बघण्यात पुन्हा पुन्हा येणे नाही. सूर्यास्त आणि सूर्योदय सगळ्यात जास्त आवडीचे होते. कधी हवा खूप वाहती असेल तर खारट झालेली त्वचा माझ्यासाठी चर्चेचा विषय होती. आठवडय़ातून एकदा होणारे ड्रिल आणि त्या नंतर असणारे ट्रेनिंग म्हणजे मला डोक्याला ताप वाटायचे.

माझ्या रिकाम्या वेळा मध्ये मी ईरा वरच्या कथा वाचू लागले होते, कधी लोकर विणत, कधी पेंटिंग करत नाहीतर ब्रेक चांगला असेल तर बाहेर जाऊन फिरून यायचे. एव्हाना सगळ्यांना कळून गेले की मी छोट्याश्या ब्रेक मध्ये सुद्धा बाहेर जाऊन वेळेत येणारच. आता कोणाला सोबत यायचे तर येतील पण कोणी स्वतःहून सांगून आले नाही तरी माझे बाहेर जाणे कधी चुकले नाही. सुरुवातीला मला अंदाज नसल्याने शिप नजरेत असेल अश्याप्रकारे मी आजुबाजूला फिरत. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला की मी एकटी दूर जाऊ शकते आणि वेळेत परतू शकते. बर्‍याचदा आम्हाला सुचना दिलेल्या असत कुठल्या पोर्ट वर असुरक्षित असेल तर काय सावधगिरी बाळगावी. अश्याच एका आदिवासी पोर्ट वर आम्ही होतो. मी शिपपासून 15-20 मीटर दूर नाही जाऊ शकले. मला प्रचंड असुरक्षित वाटले तिथे एकटीने बाहेर जायला. ह्याला कारण म्हणजे पोर्टवर असलेली दोन गटांमध्ये विभागलेली आदिवासी जमात. मी फिजी आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशात पाणीपुरी मस्ट म्हणत ताव मारला. कारण 'मैं ठहरी पाणीपुरी प्रेमी', शिवाय अजून भारतीय पक्वान्ने सुद्धा छान चवीची होती. खूप महिन्यानंतर भारतीय पदार्थ खाऊन जिवाला प्रचंड तृप्ती मिळाली.

बर्‍याच ठिकाणी फिरताना आलेला अनुभव म्हणजे पूर्ण माहितीनिशी जाणे, सोबत डेटा नेटवर्क, शिप टाइम सोबत अपडेटेड आणि चलो. कारण एकदा शिप ऑल अबोर्ड टाइमला फक्त १५ मिनिटे असताना शिप मध्ये पाय ठेवला. त्यावेळी ऑस्ट्रेलिया सारख्या देशात 3-3 ट्रेन बदलून प्रवास केला. गूगल मॅप्सच्या आधारे मी पुढची ट्रेन पाहून ठेवत होते. जेव्हा शिप मध्ये पाय ठेवला तेव्हाच पाण्याची पूर्ण बॉटल रिकामी केली. एकदा तर शनिवारी म्हणून टॅक्सी मिळण्यास फारच कष्ट लागले. त्यात सिक्युरिटी उशिरा येऊन नाही चालणार. क्रु ऑल अबोर्डला मोजून 3 मिनिटे असताना आम्ही ५ जणांनी वेळेत एंट्री केली. जपान मध्ये तर उशीरच झाला. मी आणि सोबतचे कलीग शिन्कानसेन बुलेट ट्रेन मध्ये चढलो. इथे आम्ही पूर्ण माहिती विचारण्यास चुकलो. ट्रेन कुठेही न थांबता दूर जाते. पुणे -मुंबई एवढे अंतर १ तास 23 मिनिटे लागतील एवढा त्याचा स्पीड. ट्रेन मध्ये wifi होते आणि डेटा नेटवर्क सुद्धा होते त्यामुळे पटकन परिस्तिथीची कल्पना दिली. आमच्या शेजारी असलेल्या जपानीज व्यक्तीचे ज्याला इंग्लिश बर्‍यापैकी समजत होते आणि बोलता येत होते त्याला मी नानाप्रकारे ट्रेन कशी थांबवता येईल विचारून हैराण केले होते तरीही तो न चिडता सगळ्या प्रश्नांची उत्तरे शांतपणे देत पुढची ट्रेन कधी आहे कुठल्या फ्लाफाॅर्मवर आहे सांगितले. ट्रेन थांबली तशी 3 मिनिटांत इकडून साधारण दीड मजला एवढे जिने उतरून परत चढायचे होते. कुठल्याही डब्यात शिरतो न शिरतो ट्रेन सुरू झाली. एक तासाने उशिरा पोहोचलो आणि थोडा ओरडा खाल्ला. त्या दिवशी नशीब बलवत्तर होते कारण शिप ऑल अबोर्ड संध्याकाळी होते.

बर्‍याचदा लोकांनी चुकीच्या वेळा अपडेट केल्याने शिप मिस केली आहे. ते पाहून दुःख होतेच. नेहमीच असे झालेय की, कोणीही असो लवकर यावे अशीच प्रार्थना देवाकडे मनातून केली आहे. कारण शिप मिस होणे म्हणजे स्व खर्चाने पुढच्या पोर्ट वर येणे. मनस्ताप होतो तो वेगळाच आणि हा खर्च चांगला मोठा असतो. माझा पहिला वाहिला अनुभव प्रचंड मिक्स भावनांचा कल्लोळ होता. दुसर्‍या काँट्रॅक्ट मध्ये सहाच महिन्यांत कोरोनाचे सावट पसरू लागले होते.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात शिपवर पॅसेंजर नव्हते आणि फक्त काम करणारे क्रु साठी नियम प्रचंड कडक होते. त्यामुळे सिक्युरिटी म्हणून आम्हाला राऊंड मारावे लागत. घरी काहीही करून सगळ्यांना जायचे होते. कारण पगार नाही तर राहू कशाला ही वृत्ती झाली होती. आम्हाला एका शिप मध्ये पाठवून दिले. जिथे मी दोन महिने फक्त एका बेरोजगारासारखे घालवले. कोणीतरी एकजण आजारी पडले म्हणून आमच्या शिप वरुन आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन केले तेही १४ दिवस. मला वाटले जातील असेच १४ दिवस फटाफट. 6 दिवस झाले आणि मला येऊ लागला एक प्रकारचा मानसिक थकवा. त्या तेवढ्याच रूम कम बाल्कनी मध्ये जीव नकोसा होऊ लागला. मग बाकीच्यां दोस्तांनी सांगितली एक आयडिया, बाओ वर जाणे. बाओ म्हणजे शिप च्या पुढे टायटॅनिक पोज करतात ना ते. ती जागा म्हणजे भली मोठी आणि छान. मीही थोडीशी घाबरत गेले. फक्त बहाणा केला की सिगरेट साठी आलेय, तिथे गेल्यावर दिसले की मी एकटीच असा बहाणा करून आली नाही तेव्हा मनातील घालमेल शांत झाली. कारण तिथे फक्त सिगरेट ओढणाऱ्या व्यक्तिंना आणि ज्यांना बाल्कनी नाही अश्याच लोकांना परवानगी होती. काम काहीच नाही, इन्कम नाही फक्त खर्च होत होता. त्याही परिस्थितीत मी मेडीटेशन करून स्वतःला तटस्थ ठेवण्यात यशस्वी झाले. त्यामुळे कोणाच्याही चिडचिडेपणाला किंवा कुठल्याही प्रकारच्या बोलण्याला माझे सकारात्मक उत्तर होते. क्वारंटाईन संपेपर्यंत बाओ वरच्या मोकळ्या वातावरणात आणि लोकांना पाहून छान वाटू लागले. घरी येण्यापूर्वी सुद्धा ७ दिवस क्वारंटाईन मध्ये काढले. तो ९ तासांचा विमान प्रवासात म्हणजे शब्दात मांडणे थोडे कठीणच. कारण त्यात ना टीव्ही होता ना अजून अतिरिक्त सर्विस. त्यात येणारे खडखड आवाज प्रचंड चिडचिड निर्माण करत होते.

घरी आल्यावरसुद्धा चार महिन्याचा सुट्टी नंतर पुन्हा जाण्यासाठी सज्ज झाले. ह्यावेळी सगळीकडे शांतता होती. रस्त्यावर तुरळक वाहतुक, कधीकाळी लोकांची वर्दळीने बिझी असलेला एअरपोर्टवर सुद्धा शांतता होती. कुठेच लाइन नाही पण बोर्डिंग गेट जवळ लाईन दोन फीट पण आत फ्लाइट मध्ये खाचाखच भरलेली लोक. ते पाहून मला हसावे की रडावे समजले नाही. तीन फ्लाइट बदलून शेवटच्या डेस्टिनेशवर पोहोचल्यावर दिसले की अगदी मोजके अत्यावश्यक असलेले क्रु आहेत. शिप मध्ये जाण्यासाठी एका टेंडर बोट (शिप ची एक छोटी बोट ज्यात 150 पर्यंत लोक बसू शकतात) चा वापर करण्यात आला होता. कारण शिप अँकर वर होती.

"समुद्रावर काम करण्याच्या अनुभवाने तुम्हाला वास्तविकतेत अनेक गोष्टी शिकवतात. समुद्राच्या विशाल आश्रयात काम करण्याच्या प्रक्रियेत, तुम्हाला संघर्षांच्या निरनिराकरणातून सामर्थ्य मिळते. तुम्हाला टीका, वादळे पाहायला मिळतात, आणि समुद्राच्या अस्तित्वाच्या सहज बदलांमुळे तुम्ही अनुकूल व्यवस्थापन आणि समस्यांच्या जवळच्या समाधानाच्या क्षमतेत सुधारण करता. या अनुभवातून, तुम्ही आत्मविश्वास वाढवून, विचारशीलता विकसित करून, आणि अनुशासनाच्या मूल्यांकनातून आत्म-प्रगतीसाठी सिद्ध होता."

जेव्हा शिप पूर्णतः कमीत कमी म्हणजेच मिनीमम मॅनिंग् ऑपपरेशन'. फक्त अत्यावश्यक डिपार्टमेंट साठीच चालू होती त्यामध्ये जे काही काम असेल ते करावे लागे. ह्या काळातील माझा कार्यकाळ खूप काही शिकण्यासारखे होते. जे की मी नॉर्मल ऑपरेशन मध्ये कधीच शिकायला मिळाले नसते. जिथे साधारण ३५०० लोकांची वर्दळ असते अश्या शिप वर फक्त १२७ च क्रु मेंबर होतो. तिथे मी पूर्णतः सुरक्षित होते. कारण कोणाचीही ये-जा नव्हती. जी काही ये-जा होती ती फक्त २० दिवसातून एकदाच होई. त्यात मला पूर्णपणे स्वतःला सेफ्टी गिअर मध्ये लपेटून टाकावे लागत. त्यामुळे प्रचंड उकडे कारण बाहेर वातावरण गरम आणि जरी थोडी थंडी असली तरी घाम निघे. रोज मी माझ्या केबिन मधून कधी उगवतीचा सूर्य आणि रोजच सूर्यास्त पाही. मला लागलेला छंद म्हणजे फोन विडिओ मोड वर सेट करून सूर्यास्त पाहणे. रोजची प्रार्थना असे की माझ्या सोबतच्या सगळ्यांना सुरक्षित ठेव. कारण मी खूपच सुरक्षित होते ह्यामुळे मला नक्की काय वाटले हे शब्दात सांगणे थोडे अवघडच. एव्हाना मी ईरावर नियमित समीक्षण करू लागले होते, लेखक मला एक नियमित वाचक म्हणून ओळखू लागले होते आणि लिखाणाला सुद्धा सुरुवात केली हळूच.

तिथेही मोकळा वेळ पेंटिंग, लोकर विणणे आणि एकदा एच.आर. च्या मदतीने क्वीझ नाईट अरेंज केली. त्याला मिळालेला प्रतिसाद म्हणजे खूपच अवर्णनीय होता. मी प्रश्न विचारे आणि त्याचे उत्तर पेपर मध्ये लिहायचे होते. विनर अगदी अनपेक्षित टीम होती हे पाहून सगळ्यांनी टिप्पणी केली आणि स्विकारले सुद्धा. मला लागलेला नवा शोध म्हणजे माझ्या बर्थडे च्या दिवशी असणारा ' वर्ल्ड ओशन डे'. सगळ्यांना सांगितले की हाच माझ्या बर्थडेचा केक. एन्जॉय.

हाही काँट्रॅक्ट संपला आणि घरी येण्या आधी पुन्हा एकदा क्वारंटाईन केले गेले. ह्यावेळी दोन्हीही बॅगा आल्या नाहीत. फक्त हँडबॅग होत्या. पुन्हा एकदा मिसिंग बॅग साठी प्रक्रिया पूर्ण करा. पण ह्यावेळी भारतात करायची असल्याने ती जास्त किचकट ठरली माझ्यासाठी. साधारण आठवड्याभराने दोन्ही बॅग घरी आल्या आणि माझा जीव भांड्यात पडला. ह्या अनुभवाने एक समजले की ४ ते ५ वेळा तरी चेक इन करताना विचारायचेच कारण त्यांच्या धुंदीत ते बोलून जातात आणि आपल्या मनस्ताप होतो. मी मग बोर्डिंग गेटपाशी सुद्धा विचारायला सुरुवात केली. कारण इंटरनॅशनल सिस्टम मध्ये बॅग आली आहे की नाही दिसते करून माहिती होते. हा मनस्ताप भयंकर आहे म्हणून दोन्ही बॅग मध्ये वाटून गोष्टी पॅक करायचे आणि हँड बॅग मध्ये सुद्धा बेसिक समान ठेवायचे करून समजले.

माझे न्यू बिल्ड शिप साठी नाव होते. पण व्हिसा वेळेत आला नाही ते असाईनमेंट आणि बाकीचे असाइनमेंट माझ्याकडून सुटून गेले. त्यामुळे मला पुढचे 6 महिने वाट पहावी लागली. तो काळ खडतर होता. जेवढ्या जास्त सुट्ट्या तेवढा जास्त खर्च होतो म्हणूनच शक्यतो लवकर गेले चांगले असते. ह्यावेळी पनामा कनाल पाहून कंटाळा आला. शिवाय तिथे प्रचंड गरमी. क्रॉसिंग असताना पनामाचे क्रु येत. त्यांच्यावर आणि आजुबाजुला लक्ष देणे गरजेचे असे. कारण कोणीही उडी मारून आत येऊ शकतो किंवा कोणीही बाहेर जायचा प्रयत्न करू शकतो.

कुठल्याही प्रकारच्या घटना असो त्यासाठी खूप शांतपणे गोष्टी हाताळण्यास लागते. काही काही परिस्थितीत मध्ये अशी वेळ येते की एक सेक्युरीटी म्हणून निर्णय घ्यावा लागतो. डायरेक्ट ऑफिसरला अपडेट देत कामाची अमलबजावणी करावी लागते. परिस्तिथी कुठलीही असू शकते जसे की, मिसिंग पर्सन (हरवलेली व्यक्ति), जंप ओवर बोर्ड (समुद्रात उडी), आग, वादळ, भांडण, चोरी, इमर्जन्सी मेडिकल, कोणाचा मृत्यू अश्या अनेक गोष्टी आहेत. बर्‍याच वेळा लोकांचे मृत्यू पाहिले आहेत. त्याही परिस्थितीत मन कमकुवत होऊ न देता काम करणे म्हणजे सुरुवातीला एक मोठे आव्हान होते. काळानुरूप माझ्यामध्ये बदल आपोआपच झाला.

मागच्याच वर्षी मला मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्या मध्ये सगळ्यात जास्त मुलींनी दिलेला फिडबॅक म्हणजे त्यांनाही माझ्यासारखे अचिव्हमेंट करायची आहे. माझ्या सारखे बनायचे आहे. मी त्यांच्यासाठी एक रोल मॉडेल आणि प्रेरणा देणार्‍या व्यक्तींपैकी एक वाटले. हीच माझ्या कामाची पोचपावती. कारण हाय फील्ड मध्ये मुली सहसा करून जास्त काळ काम करत नाहीत. जास्तीत जास्त एक वेळा किंवा दोनदा असाइनमेंट करून सोडून देतात. मला ते क्षण नेहमी प्रोत्साहित करतात. कोणासाठी आपण रोल मॉडेल असणे ही गोष्ट नक्कीच मौल्यवान गोष्ट आहे.

मी आत्तापर्यंत एवढे वर्ष काम करू शकले ते फक्त आणि फक्त घरच्यांच्या पाठिंब्यामुळेच. मी त्यांना कधीही माझे दुःख सांगितले नाहीत आणि त्यांनी सुद्धा मला गरजेचे असलेले सांगितले. त्यांच्या साठी मी जगभर फिरत आहे ही नक्कीच आनंदाची बाब आहे हे त्यांच्या डोळ्यात पाहून जाणवते. आज ज्या लोकांनी टोमणे मारले तेच लोक कौतुक करताना थकत नाहीत. तरीही मी मोजक्याच कौटुंबिक व्यक्तींच्या घरी जाणे पसंद करते. कारण इतर ठिकाणी माझ्या लग्नाची विचारणा करतात पण माझे मिळवलेले यश आणि त्या मागचा संघर्ष कोणीही विचारत नाही. त्याचे मला काही वाटत नाही. कारण आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे हेच माझे सगळ्यात मोठे अचिव्हमेंट आहे.

भविष्यात आई - नाना नां शिप वर घेऊन जाता यावे एवढीच इच्छा उरली आहे.

आणि हो, समुद्रावरील जीवन आणि जमिनीवरील जीवन ह्यात फार फरक आहे. एकदा तुम्हाला seaman, seafarer असा शिक्का बसला की तुम्ही सामान्य राहत नाही.

समाप्त.