केशवरावांची समज, उमज आपल्या पित्याप्रमाणेच उत्तम होती. लवकरच त्यांनी सारा कारभार हाती घेतला आणि उत्तमरित्या सांभाळला देखील.
लक्ष्मीबाईंना आणखी दोन मुली होत्या, सगुणा आणि रमा. दोघी आपापल्या संसारात मग्न होत्या. लक्ष्मीबाईंनी त्यांनाही लिहिण्या -वाचण्याचे, युद्धशास्त्राचे थोडेफार ज्ञान दिले होते. या दोघींचे पती केशवरावांच्या सोबत मोहिमेवर जात असत.
केशवराव मोहिमेवर जात तेव्हा माघारी लक्ष्मीबाई सारा कारभार सांभाळत. त्यांना आपल्या पित्याकडून आणि पतीकडून याचे धडे मिळाले होते.
उमाबाईंना समज येऊ लागली तसे हळूहळू लक्ष्मीबाईंनी उमाबाईंना कारभाराचे धडे देण्यास सुरुवात केली. मात्र उमाबाई अतिशय हळव्या मनाच्या होत्या. त्या व्यवहारिकदृष्ट्या न्यायनिवाडा करू शकत नसत. आपल्या माघारी हे सारे कसे निभावेल? याची चिंता लक्ष्मीबाईंना लागून राहिली होती.
या कारभाराला वारस हवा..लक्ष्मीबाईंची इच्छा रास्त होती. बरेच उपास, तापास, नवस, उपाय झाले आणि उमाबाईंना दिवस गेले.
नऊ महिने जसे भरले तसा उमाबाईंना त्रास होऊ लागला. कुळंबीणी, सुईणी वाड्यावर दाखल झाल्या. बाळंतपणाची तयारी झाली.
अखेर उमाबाई थकल्या. त्यांनी सर्व काही गजाननावर सोडून दिले.
बाहेर लक्ष्मीबाईंनी गजाननाला साकडे घातले. उमेची सुखरूप कर म्हणून.
बऱ्याच वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि आतून काय बातमी येते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले.
कन्यारत्न जन्मास आले..मुलगी झाली!" उमाबाईंनी एका नाजूक पण लोभसवाण्या मुलीला जन्म दिला होता.
कन्या म्हणजेच साक्षात लक्ष्मी! लक्ष्मीबाईंना खूप खूप आनंद झाला.
काही वेळाने लक्ष्मीबाई आत आल्या. उमाबाई खूप थकल्या होत्या. त्यांनी उमाबाईंच्या प्रकृतीची विचारपूस केली.
आपल्या इवल्याश्या नातीला कुशीत घेतलं. "आईसाहेब.. आपण नाराज तर नाही ना झालात?" उमाबाई ग्लानीत म्हणाल्या.
"उमाबाई, आम्ही नाराज व्हायचे कारण काय? घरी लक्ष्मी आली..आमच्यासाठी पुत्र आणि कन्या दोन्ही सारखेच. तुमच्या पोटी पुत्र जन्माला आला असता तरी आम्हाला इतकाच आनंद झाला असता, जितका आत्ताच्या घडीला झाला आहे! तुम्ही आईसाहेब झालात आणि केशवराव आबासाहेब. याहून अधिक आनंद कोणता? स्त्री असह्य कळा सोसून एक जीव जन्माला घालते. त्यासाठी नाराज का व्हावे?
कन्या म्हणजे, ऐश्वर्य, कीर्ती, सौभाग्य, सुख -संपत्ती आणखी काय हवे? "
हे ऐकून उमाबाईंची सारी चिंता दूर झाली. लक्ष्मीबाईंनी लेकीला उमाबाईंच्या अगदी जवळ दिले. मनोमन त्यांनी ठरवले, 'आपल्या नातीला व्यवहाराचे सगळे धडे द्यायचे. तिच्यावर उत्तम संस्कार करायचे.'
या आनंदाच्या प्रसंगी साऱ्या नगरात हत्तीवरून साखर वाटली गेली. केशवरावांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी दूत धाडला गेला. तशीच ही बातमी उमाबाईंच्या माहेरी दिली गेली. "या आनंदाच्या प्रसंगी हेवे-दावे विसरून अवश्य यावे."
लक्ष्मीबाईंनी उमाबाईंच्या आईसाहेबांना आग्रहाचे निमंत्रण पाठवले. आपल्या पतीला ही बातमी कळवली.
लवकरच उमाबाईंच्या आईसाहेब अनुसुया बाई भांडण -तंटा विसरून आपल्या नातीला पाहायला आल्या. मोहीम आटोपून, विजयी होऊन केशवरावही पुन्हा घरी परतले.
वाड्यात सर्वत्र उत्साह पसरला होता. या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे बोबडे बोल ऐकायला आता सर्व जण उत्सुक होते.
मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रूप! मुलगी झाली म्हणून नाराज होण्यापेक्षा तिच्या जन्माचे आनंदाने स्वागत व्हायला हवे. यासाठी या काल्पनिक कथेद्वारे छोटासा प्रयत्न केला आहे. आवडल्यास नक्की लाईक करा.
समाप्त.
©️®️सायली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा