Login

लक्ष्मी भाग 2

Gosht Mulichya Aagamanachi

उमाबाई स्वयंपाकघरात आल्या. इथे सगळं कसं नीट सुरू होतं. थोडं शिणल्यासारखे वाटले म्हणून त्या पुन्हा आपल्या दालनात आल्या. पलंगावर आडव्या झाल्या. 

'जेमतेम दहा वर्ष वय असावे आमचे. लग्न करून या घरात आलो. खेळलो, बागडलो आणि नंतर संसारात रमलो. सासुबाईंनी आईसारखी माया लावली. नाही म्हणायला त्यांची शिस्त थोडी कडक आहेच. पण तेवढे असावेच. 

तसं पाहायला गेलं तर आमचं लग्न झालं ते तलवारीशी. केव्हा बघावे तेव्हा स्वारी मोहिमेवर! इथे आम्हाला करमत नाही असे नाही. सगळी जीवाला जीव देणारी माणसे आहेत. त्यांची आठवण अस्वस्थ करते हे मात्र खरं. पण उघडपणे हे बोलता येत नाही ना!'

विचार करता करता उमाबाईंना झोप लागली. 

थोड्या वेळाने त्यांना जाग आली. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने त्या तशाच पडून राहिल्या. दुपारी उमाबाई भोजनाला आल्या नाहीत म्हणून लक्ष्मीबाई स्वतः त्यांच्या दालनात आल्या.

"तुम्हाला फारशी दगदग सोसवत नाही. खरंतर देवदर्शनाला जायची गरज काय होती? तुमची इच्छा होती म्हणून आम्ही परवानगी दिली. आता स्वतःला सांभाळायला हवे. विनाकारण दगदग करून चालायचे नाही." लक्ष्मीबाई उमाबाईंच्या जवळ बसल्या होत्या. 

"खरंतर या पहिल्या बाळंतपणात तुम्हाला माहेरी धाडायची आमची इच्छा होती. मात्र कसले वितुष्ट आले नि तुमचे माहेरचे सगळे संबंध संपले. देव करो आणि आज ना उद्या हे संबंध पुन्हा पूर्ववत होवोत हीच इच्छा आहे." 

बराच वेळाने सेविकेला सूचना देऊन लक्ष्मीबाई आपल्या दालनात परत गेल्या.

रात्री केशवराव उमाबाईंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले. "या अशा अवस्थेत धावपळ करणे बरं नव्हे. तिकडे आम्ही मोहिमेवर असताना आमचे मन इथे तुमच्यापाशी लागून राहिलेले असते. कर्तव्यात आमच्याकडून कुठलीही कसूर होत नाही. मात्र सतत तुम्ही आमच्याबरोबर असल्यासारखे वाटते. मग एक वेगळाच हुरूप येतो. या अवस्थेतून एकदा का तुमची सुखरूप सुटका झाली की आमचं मन शांत होईल."

रात्र उलटून गेली आणि उमाबाईंच्या प्रकृतीला थोडा आराम पडला. त्यांना शांत झोप लागली. 

दिवस सरत होते. उमाबाई आणखीनच अवघडल्या. लक्ष्मीबाई त्यांची काळजी घेत होत्या. आता त्यांना वाड्याबाहेर पडण्यास सक्त मनाई केली होती. उमाबाईंच्या पोटी कन्या की पुत्ररत्न जन्माला येईल? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती.

अशातच मोहीम चालून आली. उमाबाई अस्वस्थ झाल्या. या अशा वेळी केशवरावांनी इथे असायला हवे होते असे वाटू लागले त्यांना. पण त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. त्यांची अवस्था आईसाहेबांनी जाणली. 

"आम्ही आहोत ना इथे? मग काळजीच कारणच काय? स्वराज्याच्या रक्षकांना घर, संसार, आपली माणसं हे सारं मागं सारावं लागतं. त्याविना कर्तव्य कसे पुरे व्हायचे? 

केशवरावांना हसतमुखाने निरोप द्या. सांगा त्यांना, मोहीम फत्ते करून लवकर घरी या. या मोहिमा आता तुमच्यासाठी काही नवीन नाहीत. तरीही इतकं मनाला लावून घेण्याचं कारण काय? इथला सारा कारभार आता आपल्यालाच पाहणं भाग आहे. मग तुम्ही अशा खचलात तर आम्ही काय करावे?" 

तेही खरेच होते. मोहिमेवर जाणाऱ्या पुरुषापाठीमागे घरचा कारभार स्त्रिया सांभाळत. शिवाय तो पुरुष मोठ्या, जबाबदारीच्या पदावर कार्य करत असेल तर त्याच्या माघारी जनतेचे प्रश्न सोडवावे लागत. मग प्रसंगी डगमगून न जाता धीराने कारभार हाती घेऊन न्यायनिवाडा करावा लागे. यासाठी बऱ्याचदा स्त्रियांना तसे शिक्षण दिले जाई.

उमाबाईंनी आपल्या पतीला हसतमुखाने निरोप दिला. " काळजी करू नका. सगळं नीट होईल." केशवराव डोळ्यांनीच निरोप घेत म्हणाले. 

केशवराव गेले आणि कारभार लक्ष्मीबाईंनी हाती घेतला. लक्ष्मीबाईंचे पती दुसऱ्या नगरात वास्तव्यास होते. त्यांचे क्वचितच इकडे येणे होई. त्यामुळे लक्ष्मीबाईंना आपसूकच कारभाराचे धडे मिळत गेले. त्यांच्या मदतीसाठी इतर स्त्रियां, मार्गदर्शकही होते.