गोष्ट छोटी शिकवण मोठी

ग्राहक जागृती
"आई आज मला श्रीखंड पोळी खायची आहे. आणू का मी श्रीखंड"मी विचिरले.
आठवड्यात ना किमान दोनदा तरी, मला श्रीखंड पोळी खायचा मूड यायचा,म्हणजे अजूनही येतो.पण आता डायबिटिसमुळे कंट्रोल ठेवावा लागतो.
श्रीखंडाचा तो छोटासा डबा आणि पोळ्या असं मिळालं की मी खुश.
आठवी दहावीत होते मी त्या वेळेला. आई कधी हो म्हणायची, एखाद वेळेस नाहीही.
त्यादिवशी आईचा मूड चांगला होता. त्यामुळे आईने लगेच मला," ठीक आहे जा आज तू एकटीच , घेऊन ये श्रीखंड ."असं म्हणून पाठवलं सोबतच तिला इतरही काही वस्तू हव्या होत्या ,त्याची यादी दिली.
त्या वेळेला पहिल्यांदाच मी एकटी, जाऊन सामान आणणार होते.मला भारी वाटलं. त्याप्रमाणे मी आमच्या घराजवळच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेले. तिथे आईने सांगितलेल्या इतर वस्तू आणि श्रीखंडाचे छोटे छोटे चार डबे घेतले .चार का? अहो !घरात आई ,बाबा ,भाऊ आणि मी. म्हणून चार. आणि ऐटीत घरी आले.
जेवायला बसताना श्रीखंडाचा छोटासा डबा उघडला आणि बघते, तर काय त्याच्यामध्ये दूध आणि श्रीखंड वेगवेगळे झालेलं. जवळपास नसल्यासारखाच दिसत होतं.
"अगं काय झालं हे आई! मी आईला विचारायला लागले .आई म्हणाली," अगं बघून नाही आणला का तू डबा त्याच्यावरती पॅकिंग डेट पहा बरं."
तोपर्यंत असं काही पॅकिंग डेट एक्सपायरी डेट वगैरे बघायचं असतं हे माहितीच नव्हतं. पहिली शिकवण मिळाली, कुठलीही वस्तू खरेदी करताना त्या पॅकवर लिहिलेलं बघायला पाहिजे. आतापर्यंत आईसोबत खरेदी असल्यामुळे असं बघण्याची वेळ येत नसे.
पण आता ही शिकवण मिळाली.
बघितलं तर त्याच्यावर चार-पाच महिने जुनी डेट होती. म्हणजे ते एक्सपायर झालेलं होतं. आता काय करायचं? बाकीचे डबे ठीकठाक होते, मग आईने त्यातलाच एक डबा दिला आणि माझ्या जेवण आटोपलं.
मग आई मला म्हणाली," जा आणि हा डबा दुकानदाराला दाखवा आणि बदलून आण."
खरतर त्या काळामधली चार-पाच रुपयाची वस्तू होती ती. मला संकोच वाटायला लागला, की दुकानदाराला असं बदलून कसं मागायचं ?त्यापेक्षा ,"जाऊ दे ना आई" असं मी म्हटलं .
पण आई मला म्हणाली," कितीही कमी किमतीची वस्तू असली, तरी पण, आपली फसवणूक झाली आहे ना. तू जाऊन तर बघ. दुकानदाराने नाही बदलून दिलं ,तर ठिक आहे. पण जाऊन विचार तर खरं"
मग दुनियाभरचा असा संकोच गोळा करून, मी गेले. शेवटी त्या दुकानात.
दुकानदाराला ते दाखवलं आणि कालच घेऊन गेले होते आणि ते खराब निघालं असं सांगितलं.तो डबा, त्याने मागे पुढे बघितला आणि म्हणाला," घेतानाच का नाही बेबी तू ते बघून घेतला आणि त्याच्यावर काय डेट होती ते.आता मी कसा परत घेऊ."
मग मीही तोऱ्यात म्हटलं," अहो एवढा मोठा दुकान आहे तुमचं. तुम्ही एक्सपायर झालेल्या वस्तू ठेवताच कशा? तुमच्या विश्वासावर असतो आम्ही. इथून मला घेऊन जातो ना तुम्ही वस्तू विकायला ठेवतांना त्याच्यावरच्या तारखा बघून ठेवायला हव्या होत्या ना."कसं सुचलं माहित नाही,पण बोलले बाई.
तो बदलून देण्यासाठी का कू, करत होता, म्हणून मग मीही हट्टालाच पेटले .आता आईने एवढं शिकवून पाठवलं होतं ना. मग त्याला म्हटलं," मला मॅनेजरला भेटायचं तुमच्या, आणि तुम्ही नाही बदलून दिलं तर, मी अमूल कंपनीला पत्र लिहिन बघा ."त्याकाळी तक्रारीची पत्रे लिहिली जात.
शेवटी तो मला मॅनेजर कडे घेऊन गेला. मॅनेजरने शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं
,णि मग त्या सेल्समनला झापलं, "माल चेक करून रॅकवर ठेवता येत नाही का तुम्हाला? बदलून द्या डबा आणि बाकी आपल्या रॅकवरचा सगळा माल चेक करत जा."
शेवटी मला तो डबा बदलून मिळाला.
या एकाच प्रसंगात मला जीवनातल्या काही शिकवणी मिळाल्या .
पहिल्यावहिल्या शिकवणी मिळाल्या.
त्यामध्ये फसवणूक झाली तर, त्याची तक्रार करायला शिकलं पाहिजे.
कोणतीही पॅकबंद वस्तू विकत घेताना, त्यावर लिहिलेली किंमत ,एक्सपायरी डेट बघितली पाहिजे.
आणि रक्कम क्षुल्लक असली तरी, पण त्याला महत्त्व असतंच.


भाग्यश्री मुधोळकर