मरणानंतरचे अस्तित्व

मरणोत्तर अवयवदान
मीना ची तब्येत खालावत होती ,कालच तिचे पोटाचे ऑपरेशन झाले होते .ऑपरेशन रिस्की आहे ,आणि जीवाला धोका आहे हे ही कल्पना डॉक्टरांनी आधीच दिलेली असल्यामुळे मीनाचे आई बाबा आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी खंबीर झालेले होते. पण शेवटी आई-बापांच काळीज ते ,आपली पदवीधर झालेली सुंदर ,सुशील, गुणी मुलगी आणि असा अचानक उद्भवलेला आजार सावरायचे तरी कसे ?
खरेतर वर्षा-दोन वर्षात मीनाचे लग्न होईल ,आपल्याला जावई येईल, पुढे नातवंड आणि अशा असंख्य स्वप्नांमध्ये असणाऱ्या असणाऱ्या महेश आणि मेघा साठी मीनाचा हे आजारपण म्हणजे खूप मोठा धक्का होता मेघाची बहीण ,आणि महेशचा भाऊ हे दोघेही सहकुटुंब अशा परिस्थितीत धीर देण्यासाठी उपस्थित होते .
पण म्हणतात ना शेवटी प्रत्येकाला स्वतःला धीर स्वतः गोळा करावा लागतो .
सकाळ झाली. मेघाच्या मनात सतत देवाचा धावा चालू होता, पण शेवटी तिची हाक देवापर्यंत पोचलीच नाही आणि मीना ची प्राणज्योत मावळली .
रेवा ही तिथे काम करणारी नर्स. दवाखान्या मधल्या पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी ती लाडकी होती, कारण ती सर्वांची प्रेमाने आणि स्नेहाने काळजी घ्यायची, पेशंट सोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही धीर द्यायची .मेघाला शोक अनिवार झाला .मीनाची प्राणज्योत मावळली होती ,आता पुढच्या सोपस्कर करणे गरजेचे होते .
त्यावेळी रेवा समोर आली आणि मेघाला म्हणाली,
" ताई तुमच्या दुःखाला सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीत पण तरी एक सुचवू का ?"
"बोला ना सिस्टर तुम्ही आम्हाला मीनाच्या आजारपणा मध्ये जो धीर दिला आहे त्यासाठी खरं तर आम्ही तुमचे खूप आभारी आहोत." मेघा अश्रू पुसत म्हणाली
"ताई मीनाला पोटाचा आजार होता, पण तिचे डोळे आणि हृदय खूप मजबूत आहे तुम्ही ते गरजूला दान कराल का ?त्या गरजूला या डोळ्यांनी सारं जग बघता येईल ,हृदयाने श्वास घेता येईल आणि या रूपाने तुमची मीना या जगात अस्तित्वात राहील "
प्रसंग कठीण होता. काही श्रद्धांचा पगडा हि मनावर होता पण मेघाने महेशला बोलावले आणि विचारले
"सिस्टर म्हणत आहेत त्याप्रमाणे आपण मीनाचे नेत्र आणि रुदय दान करायचे का?"
महेशला अशा परिस्थितीत अचूक असा सल्ला देणाऱ्या रेवा सिस्टरचे कौतुक वाटलं ,आणि त्याने क्षणभरही विचार न करता लगेच तो हो ,म्हणाला.," अगं ह्या रूपाने आपली मीना जगात अस्तित्वात राहील आपण नक्कीच असं करू शकतो. "
पुढच्या हालचाली वेगाने घडल्या .मीनानेही, एकदा बोलता बोलता, "माझ्या मरणानंतरही मी कोणाच्या उपयोगी पडू शकले तर किती बरे होईल ",असे विचार मांडले होते .पण अशा परिस्थितीत ,त्याचे विस्मरण झाले ,हेही महेशला आठवले आणि त्यांनी तिचे हृदय नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.
घरातल्या एका तरुणाचा किंवा ज्यांचे डोळे रुदय सुस्थितीत आहे अशा कोणाचाही मृत्यू होतो ,त्या वेळेला खरंतर या नेत्रदान, हृदयदान, अवयवदान या रूपाने ती व्यक्ती काहीना जीवनदान देऊ शकते, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे .त्यावेळी त्यांना असे करण्यासाठी सुचवणारी रेवा नर्स असेलच असं नाही, त्यावेळी त्यांच्याजवळ असणारे नातेवाईक, मित्रमंडळी अशाप्रकारे सुजाणपणे विचार करून, असा सल्ला जर त्या मृताच्या जवळच्या नातेवाईकांना देऊ शकले आणि त्याचा परिणाम झाला, तर आज कितीतरी लोकांना नवीन जीवनदान मिळेल आणि गेलेली व्यक्ती ही त्या रुपाने अस्तित्वात राहील .
आज समाजामध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात जागृती होण्याची आवश्यकता आहे .आपण प्रयत्न करुया.माझी आजी ,माझे बाबा यांनी नेत्रदान केले होते. आज जगाच्या पाठीवर नेत्ररुपाने ते कुठेतरी अस्तित्वात आहेत याचे खूप मोठे समाधान आम्हा भावंडांना आहे.


भाग्यश्री मुधोळकर