"लेक : परकं धन!" भाग - १
मोरेंच्या घरात लगबग सुरु होती. अंगणात दरवाजा बाहेर सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. दरवाजाला तोरण लावले होते आणि त्यावर छान झेंडूच्या फुलांची माळ लावली होती.
दिनकर मोरेंचे गावात किराणा दुकान होते आणि घरची काही शेतीदेखील होती. गडगंज श्रीमंती नसली तरी कुटुंबाचा उदार निर्वाह चांगला होऊ शकतो एवढी लक्ष्मी नक्कीच मोरेंच्या घरात येत होती. मोरेंच्या घरातही लक्ष्मी होती आणि नशिबातही. पण त्यांना नशिबातली लक्ष्मी सांभाळत नव्हती. मोरेंना पाच मुली होत्या.
घराण्याला वंश पाहिजे म्हणून एका मागून एक पाच मुली मोरेंनी होऊन दिल्या. त्यात एखाद्या दुसऱ्या वेळेस त्यांच्या पत्नीचा ( वंदना ) गर्भपात पण केला होता. पण मोरेंना काही त्यांना हवा असणारा वंशाचा दिवा भेटला नाही.
मोरेंना त्यांना हवा असणारा वंशाचा दिवा भेटला नाही आणि त्या पाच दुर्भाग्यशाली मुलींना घरात आईचे सोडून इतर कोणाचेही प्रेम भेटले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मोरेंची मोठी मुलगी मीना हिला बघण्यासाठी आज पाहुणे येणार होते.
मीना दहावीत जाणारी एक हुशार मुलगी. पण जगाचे अनुभव, व्यवहार ज्ञान, इतर गोष्टींची समज मात्र कमी होती.
सोळा वर्षाचे वय म्हणजे नवीन झेप घेऊ बघणारे, मोठे स्वप्न बघण्याचे वय. परंतु मीनाला या सर्वांचा अधिकार नव्हता.
सोळा वर्षाचे वय म्हणजे नवीन झेप घेऊ बघणारे, मोठे स्वप्न बघण्याचे वय. परंतु मीनाला या सर्वांचा अधिकार नव्हता.
एवढ्या लहान वयातच दिनकर मोरे त्यांच्या मुलीचे लग्न करत होते कारण यामुळे घरातील एक निरर्थक व्यक्ती घराबाहेर जाईल असे दिनकर मोरे यांना वाटत होते. त्यामुळे त्यांना काही करून मीनाचे लग्न करून तिला घराबाहेर पाठवायचे होते.
मीनाला तिची आत्या कुसुम तयार करत होती. मीनाने नेसलेली पैठणी तिच्या अंगावर थोडी सैलच होत होती. तिच्या डोळ्यात असंख्य प्रश्न होते पण त्यांची उत्तरे काही नव्हते.
कुसुम आत्या मीनाला तयार करून बाहेर जाते. मीनाजवळ तिची दुसऱ्या क्रमांकाची छोटी बहीण कल्पना आणि मीनाची मैत्रीण दिव्या होती. आत्या गेल्यावर मीना खुर्चीवर बसून घेते. दुनियादारीची समज कमी असली तरी तिच्या सोबत काय चालू आहे हे मात्र मीनाला कळत होते. आत्या गेल्यावर मीना आणि दिव्या बोलू लागतात.
"मीना, तुला नसेल करायचे लग्न तर नको करू."
"दिव्या तुला माहितच आहे आम्हाला आमच्या घरात वर बघण्याची परवानगी नाहीये. तर मग लग्न करायचे नाही हे आमचे कोण ऐकूण घेईल?"
"मला मान्य आहे. पण मग तू तुझ्या आईला सांगना."
"आमच्या आईची व्यथा तर आमच्या पेक्षाही बिकट आहे. आई फक्त घरात काम करणारी एक मोलकरीण आणि मुलं जन्माला घालणारी मशीन एवढंच आहे यांच्यासाठी." मीनाच्या शब्दांत एक विद्रोह होता.
"मीना खरं सांगू का, मला यात तुझ्या आईचीच चूक वाटते. काकूंनी आयुष्यभर फक्त सहन केले आहे आणि म्हणून तुम्हालाही सहन करावे लागते."
"दिव्या मुलगी जेव्हा बापाच्या घरी असते तेव्हा तिला म्हणतात, नवऱ्याचे घर तुझे आहे. नवऱ्याच्या घरी असते तेव्हा तिला बोलता, तुझ्या बापाचं घर नाहीये. दोन घरात राहूनही मुलगी मात्र बेघर राहते. कुठेच तिला अधिकार नसतो. या अशा परिस्थितीमुळे आई सारख्या महिलांना सहन करण्या पलीकडे कोणता पर्याय नसतोच."
"मीना तू बोलायला लागली की ऐकत रहावे असे वाटते. तू आपल्या शाळेची टॉपर आहे. तू आपल्या सरांना का नाही सांगत? त्यांनी कुठल्या NGO वैगरेची मदत घेतली तर!"
"दिव्या तस केले तर आई सोबत आम्ही सर्व बहिणी घराबाहेर असू. आम्हा पाच बहिणींना घेऊन आई कुठे जाईल!"
मिना आणि दिव्याचे बोलणे चालूच असते. अंगणामध्ये दिनकर पाहुण्यांची वाट बघत येरझाऱ्या मारत होता. ओट्यावर खुर्ची टाकून चंद्रकला ( दिनकरची आई ) बसली होती.
"अरे दिनकर किती फेऱ्या मारशील. एवढ्या वेळात सगळ्या गावाला गरका झाला असता. येतील पाहुणे जरा दम टाक."
"आई, मला पहिल्या या पाच पोरींचे लग्न करून टाकायचे आहे. ही दरिद्री मला माझ्या पोरावर नाही पडून द्यायची."
"दिनकर तू दगदग केल्याने काही होणार आहे का? त्यावेळेस तुला म्हणले होते की दुसर लग्न कर रे बाबा. पण तू काही ऐकले नाही आणि मग या कपाळकरंठ्या आपल्या घरात आल्या."
"आता मला काय माहित होतं, या एवढ्या येतील!"
चंद्रकला आणि दिनकर बोलत असतानाच पाहुण्यांची गाडी येते. दिनकर त्यांचे जय्यत स्वागत करतो. नवरा मुलगा, त्याचे वडील, काका, मध्यस्थी आणि अजून एक-दोन अशी चार-पाच माणसे आलेली असतात.
मुलगा वयाने मीना पेक्षा खूपच मोठा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर उर्मठपणा सरळ सरळ दिसत होता.
सर्वजण घरातील पुढच्या खोलीत बसतात. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगतात. सुरवातीला शेती, पाऊसपाणी, राजकारण अशा गप्पा रंगत जातात. थोड्यावेळाने मीनाला घेऊन कुसुम आत्या येते. मीनाच्या हातात पोह्यांचा ट्रे होता.
मीनाची हलकीशी नजर नवऱ्या मुलावर पडते आणि तिला धक्काच बसतो. मुलगा कमीतकमी सत्तावीस-अठ्ठावीस वर्षाचा वाटत होता. दाढी एकदम वाढलेली, केस एकदम भली मोठी, शरीराने एकदम सुटलेला.
थोडावेळ गेल्यावर मीनाला पुन्हा बोलवले जाते. मीनाला पाटावर बसण्यास सांगितले जाते. प्रश्न विचारण्यासाठी मुलाचे काका पुढे येतात.
"मुली नाव काय तुझे?"
"मीना दिनकर मोरे!"
"शिक्षण किती झाले?"
"नऊवी पास आहे. आता दहावीला आहे."
"घरकाम, स्वयंपाक, शेतीचे कामे येतात का?"
"घरातील, बाहेरील सर्व कामे येतात."
मीनाला प्रश्न विचारून झालेले असतात. मीना आतल्या खोलीत निघून जाते. बाहेर सर्वजण मीनाचे कौतुक करत होते. पण मीना आणि दिव्या यांची वेगळीच चर्चा चालू होती.
"मीना तू या मुलाशी लग्न करणार आहे? कसा आहे तो! त्याच्या पाठीमागे तुझ्या सारख्या तीन-चार मुली झाकल्या जातील."
"दिव्या बाहेर कोणी ऐकले तर अडचण होईल. हळू बोल जरा."
"मीना तू सरळ त्या मुलाला, मुलगा कसला काका आहे काका. त्या काकाला नाही म्हणून टाक."
"दिव्या, हो किंवा नाही सांगण्याचा मला अधिकार नाहीये. बाबा घेतील तोच अंतिम निर्णय असेल. मला विचारणार सुद्धा नाही."
बाहेर छान गप्पा रंगलेल्या असतात. तेवढ्यात मुलाचे काका दिनकरला विचारतात, "दिनकरराव, मुलीची आई दिसत नाही."
"ती माहेरी गेली आहे."
"दिनकरराव मुलीसाठी एवढा मोठा दिवस आहे आणि तिची आई माहेरी गेली. हे काही मनाला पटत नाही."
"आमच्या सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडली म्हणून तिला जावं लागलं. बाकी काही नाही आणि म्हणूनच माझी बहिण इथं आली."
"बरं, बर... काही अडचण नाही. आता सबंध होणार आहे आपले. गाठीभेटी होतच राहतील."
पाहुण्यांच्या गप्पा चालूच असतात तितक्यात शेजारची बाई मोरेंच्या घरी येते. आलेले पाहुणे कोण आहे? कशासाठी आले आहे? हे तिला काहीच माहित नव्हते. त्यांच्यासमोरच शेजारीण बोलते, "दिनकर भाऊ, वंदनाचा काही निरोप आला का नाही?"
"वहिनी तुम्ही कशाबद्दल बोलतय? एक काम करा, नंतर या."
"कशाबद्दल काय विचारताय दादा! वंदनाने काही गोड बातमी दिली का नाही?" शेजारीण बाई टिचकुली पाडत होती.
"कोणती गोड बातमी? आम्हालपण सांगा." मुलीचे काका मध्येच बोलतात.
"अहो पाहुणे, वंदनाला दिवस गेले आहे. नऊ महिने झाले आता दवाखान्यात आहे." शेजारीण बोलते.
शेजारीण बोलल्या बरोबर मुलाकडची मंडळी सर्व उठून उभी राहतात. मुलाचे वडील रागाने बोलतात, "दिनकरराव आमची चेष्टा करताय का! घरात लग्नाची मुलगी आहे आणि तुमची बायको गरोदर आहे. या वयात हे शोभते का तुम्हांला?"
"पाहुणे गैरसमज करून घेऊ नका."
"गैरसमज झाला होता आता तो दूर झाला आहे. आम्हाला तुमच्या बरोबर कुठलेही सबंध नको आहे."
"असं नका करू. मी कुणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही." दिनकर पाहुण्याचे पाय पकडून बोलतो.
दिनकर पाहुण्यांना खूप विनवणी करतो पण पाहुणे काहीही ऐकत नाही. पाहुणे घरातून निघून जातात.
पाहुणे घरातून गेल्यावर घरात एकच शांतता पसरते. दिनकर, चंद्रकला, कुसुम तिघांचेही चेहरे पडलेले असतात. मीनाला ना आनंद झालेला असतो नाही दुःख झालेले असते.
बराच वेळ घरात शांतता पसरली होती. थोड्यावेळाने दिनकरला वंदनाच्या भावाचा फोन येतो की, "वंदनाला दवाखान्यात ऍडमिट केले आहे. तिची परिस्थिती एकदम नाजूक आहे."
असे ऐकल्यावर दिनकर ताबडतोड दवाखान्यात जायला निघतो...
क्रमशः
ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजाव. कथेचे भाग नियमित पोस्ट होत राहतील त्यामुळे भाग चुकू नये यासाठी फॉलो करा. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा, कमेंट करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा