Login

लेक: परकं धन!

स्त्री जन्माची व्यथा मांडणारी कथा.
"लेक : परकं धन!" भाग - २

मिनाचे लग्न मोडलेले असते. दिनकरला हॉस्पिटलमध्ये वंदनाला ऍडमिट केलेले असते याचा फोन येतो. दिनकर आणि चंद्रकला लगेच हॉस्पिटलच्या दिशेने निघतात.
ते हॉलस्पिटला गेल्यावर दिव्या आणि मीना बोलत असतात.

"मीना, तुझ्या चेहऱ्यावर लग्न मोडण्याचा आनंद दिसत नाही. तुला करायचे होते का लग्न?"

"दिव्या त्या क्षणिक आनंदाचा काय उपयोग आहे. जे आज झाले नाही ते उद्या होणारच आहे मग कशाचा आनंद कशाचा साजरा करायचा."

"ते ही बरोबरच आहे. मला असे वाटते तुझ्या आईला आता मुलगा झाला पाहिजे म्हणजे कदाचित तुझे बाबा बदलतील."

"दिव्या माझे बाबा कधीच बदलणार नाही. त्यांना बदलू शकेल असे कोणी जन्माला आले नाहीये आणि येणार देखील नाही."

इकडे हॉस्पिटल मध्ये दिनकर आणि चंद्रकल पोहचले होते.
वंदनाचा भाऊ प्रसूतिगृहाच्या बाहेर येरझाऱ्या मारत होता. दिनकर त्याला विचारतो, "काय झाले? डॉक्टर काय म्हणाले?"

"दाजी, डॉक्टर म्हणताय का परिस्थिती नाजूक आहे."

"परिस्थिती नाजूक आहे म्हणजे नेमके काय?"

"डॉक्टर येतीलच इतक्यात सविस्तर मग तेच तुम्हाला सविस्तर सांगतील."

दिनकर कॉरिडॉर मध्ये येरझाऱ्या मारू लागतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न होते. लक्ष फक्त आत लागून होते.

"आरे दिनकर किती दगदग करशील. डॉक्टर आल्यावर सांगतील काय आहे." चंद्रकला बोलते.

"आई जीव टांगणीला लागलंय. परत जर मुलगी झालीना माझ्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही."

"अरे आपल्याला टेकडी वरच्या बाबाने सांगितले आहेना मुलगा होईल. बाबावर विश्वास ठेव, सगळे नीट होईल."

थोडावेळ जातो. दिनकरच्या चेहऱ्यावर चिंता तशीच होती. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात. डॉक्टरला बघताच दिनकर बोलतो, "डॉक्टर काय झाले? डिलिव्हरी झाली ना? मुलगा झाला ना?"

"दिनकरराव शांत राहा. पेशंटचा बीपी वाढल्याने परिस्थिती बिघडली आहे. बाळाची पोझिशन बदलली आहे."

दिनकरचा चेहरा पडतो. तो दबक्या आवाजात बोलतो, "डॉक्टर नक्की काय झाले आहे?"

"आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत पण वेळ आली तर आई किंवा बाळ यापैकी एकालाच वाचवता येईल. अशी वेळ आली तर कोणाला वाचवायचे, आईला की बाळाला. आम्हाला तुमचा निर्णय हवा आहे."

दिनकर क्षणाचाही विचार न करता बोलतो, "डॉक्टर मुलाला वाचवा."

दिनकर कडून हे ऐकल्यावर क्षणभर डॉक्टरांनाही धक्का बसतो. डॉक्टर दिनकर कडून पेपरवर सही घेतात आणि पुन्हा प्रसुतीगृहात जातात.

एक जिवंत व्यक्तीपेक्षा, त्याच्या पत्नीपेक्षा दिनकरला जन्माला न आलेल्या मुलाची जास्त किंमत होती.

प्रसूती गृहात वंदनाची डिलिवरी चालू होती. चंद्रकलाची जपमाळ चालू होती. दिनकरची मनाामध्ये देवाला प्रार्थना चालू होती, "मुलगा होऊ दे रे देवा, तुझं मंदिर बांधेल."

दिनकर आणि चंद्रकला या दोघांच्याही चेहऱ्यावर वंदनासाठी जराही काळजी नव्हती. जी वंदना आयुष्यभर त्यांच्यासाठी घरासाठी झिजली, घरासाठी स्वतःला वाहून घेतले आज तिच्या जीवाचा एक क्षणही विचार या मायलेकाच्या मनात आला नाही.

अखेर प्रसूती गृहाची लाईट बंद झाली. यावेळी एक नर्स बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते.

"दिनकर मोरे कोण आहे?" नर्सने आवाज दिला.

दिनकर, चंद्रकला, वंदनाचा भाऊ लगेच नर्स जवळ धावत जातात.

"मुलगा झाला ना सिस्टर? मुलगा कसा आहे?" दिनकर बोलतो.

"मोरे चमत्कार झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहे." नर्स बोलते.

दिनकरच्या जीवात जीव आला. नर्सचे बोलणे पूर्ण ऐकण्याच्या आतच दिनकर उत्साहाने बोलू लागतो, "ऐ मुलगा झाला रे झाला. माझा वाघ जन्माला आला. माझा वंशाचा दिवा आला!"

नर्सला थोडे आश्चर्य वाटते पण तिला तिचे काम करायचे होते. नर्स दिनकरला बोलते, "तुमच्या घरात वाघ नाही, लक्ष्मी आली आहे. मुलगी झाली आहे. अगदी गोड, गोजिरी, सुंदर मुलगी आहे."

दिनकर आणि चंद्रकला यांचे चेहरे क्षणार्धात बदलून जातात. काही क्षणापूर्वीचा आनंद, उत्साह नाहीसा होतो.

"काय? मुलगी!" असे बोलून दिनकर त्याच्या आईकडे बघतो.

चंद्रकला आणि दिनकर मागे वळून लगेच हॉस्पिटल मधून चालू पडतात. वंदना आणि बाळ कसे आहे याची साधी चौकशी देखील त्यांना करावी वाटत नाही.

नर्सला देखील आश्चर्य वाटते. पण वंशाचा दिवाच पाहिजे यासाठी आलेले यासाठी असे हॉस्पिटल मध्ये आलेले भरपूर बाप तिने आजवरच्या तिच्या सर्व्हिस मध्ये बघितले होते.

दिनकर आणि चंद्रकला गेल्यावर वंदनाचा भाऊ नर्सला विचारतो, "आई आणि बाळ कसे आहेत?"

"दोघेही एकदम सुखरूप आहे. पण काही गोष्टींची काळजी घ्यावी लागील त्या डॉक्टर तुम्हांला सविस्तर सांगतीलच."

"काही काळजी करण्यासारखे आहे का?"

"नाही... नाही... काळजी करण्यासारखे नाही. काळजी घेण्यासारखे आहे."

"मी ताईला आणि बाळाला बघू शकतो का?"

"अजून थोडावेळ आहे. मी सांगेन तुम्हांला. मी आता फक्त आनंदाची बातमी देण्यासाठी आली होती." असे बोलून नर्स पुन्हा प्रसूती गृहात जाते.

दिनकर आणि चंद्रकला रिक्षाने घरी येत होते. दिनकर रागाने लालबुंद होऊन घरी चालला होता. त्यात चंद्रकला अजून त्याच्या रागाला खतपाणी घालत होती.

"तुला म्हणत होते दुसर लग्न कर, पण माझं मेलीचं कोण ऐकतय. ती औदासा घरात ठेवली आणि तिनं या कपाळकरंठ्या पोरींना जन्म दिला."

"आता मला काय माहित होतं! माझच नशीब फुटक निघालं."

"नशिबाचा दोष नाहीये हा. तुझ्या बायकोलाच देवानं मूल दिलं नाही."

दिनकर आणि चंद्रकला बोलत बोलत घरी येतात. घरात सर्व मुली त्यांची आतुरतेने वाट बघत होत्या. दिनकर घरात येताच त्याला रागात बघून सर्व मुली घाबरून एकमेकींकडे बघायला लागतात.

कल्पना किचन मधून आजी आणि वडलांसाठी पाणी घेऊन येते. चंद्रकला पाणी पिऊ लागते पण दिनकर पाण्याचा ग्लास हातात घेऊन तेच पाणी कल्पनांच्या तोंडावर जोरात मारतो. कल्पनांचा चेहरा, केस, कपडे ओले होतात.

कल्पना आतल्या खोलीत जाऊन रडायला लागते. मीनाला बाबांना विचारायचे होते की "काय झाले? आई कशी आहे? बाळ कसे आहे?" पण तिची हिंमत होत होत नव्हती.

मीना स्वतःची सर्व शक्ती एक करून, हिंमत दाखवून विचारते, "बाबा, काय झाले? आई कशी आहे?"

मीनाने असे विचारताच दिनकरची राग एकदम अनावर होतो. तो शेजारीच पडलेली पायातील चप्पल हातात घेऊन जोरात फेकून मीनाला मारतो. ती चप्पल मीनाच्या तोंडावर लागते.

"मेली तुझी आई! तुम्ही पण जा सगळ्या तिच्या बरोबर मरा. तुम्हांला माझंच घर दिसलं का जन्माला यायला!" दिनकर मुलींना बोलतो.

मीना बाकीच्या सर्व बहिणींना घेऊन आतमध्ये जाते. सर्व बहिणी एकमेकांना मिठीत येऊन रडत होत्या. मीना स्वतःचे अश्रू लपवत स्वतःला सावरते. कारण तिला माहीत होते आता या बहिणींना तिलाच आधार द्यायचा आहे.

"ताई, आपण यांना सांगितले होते का आम्हाला जन्म द्या. यांना मुलगा पाहिजे होता म्हणून एका मागून एक मुलगी जन्माला घातली. यात आपली काय चूक आहे?" कल्पना बोलते.

"कल्पना कधी कधी आपल्याकडे काही प्रश्नांची उत्तरं नसतात. अशावेळेस सर्वकाही नशिबावर सोडून द्यायचे." मीना बोलते.

"ताई आपल्याला भाऊ झाला का?" छोटी अंजली विचारते.

"झाला असता तर बाबांनी आतापर्यंत संपूर्ण गाव डोक्यावर घेतला असता." मीना बोलते.

सर्व मुली खूप घाबरलेल्या असतात. पण त्यांना एक प्रश्न पडला होता की या सर्वात त्यांची काय चूक आहे? मीनाला तर वाटत होते, "मुलगी असणे म्हणजे पाप तर नाहीना."

मीना देवाला प्रार्थना करत होती की, "पुढचा जन्म कोणताही दे, नाही दिला तरी चालेल पण मुलगी म्हणून जन्म देऊ नको. "
इकडे हॉस्पिटल मध्ये वंदनाला शुद्ध आली होती. तिचा भाऊ तिच्या बाजूलाच मान खाली घालून उभा होता.

"दादा..." एकदम बारीक आवाजात वंदना बोलते.

भाऊ जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतो," आराम कर, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला आहे."

"दादा, माझे बाळ कुठे आहे." असे वंदना बोलत असते तोच नर्स बाळाला घेऊन येते. नर्स बाळाला वंदनाकडे देते. बाळाला बघताच वंदनाच्या लक्षात येते की तिला मुलगी झाली आहे.

वंदनाच्या डोळ्यातून अश्रु येतात. हे अश्रू आनंदाचे होते की पुढील होणाऱ्या छळाचे हे सांगणे कठीण होते.

"वंदना दाजी आले होते पण.... "

"काहीही बोलू नको दादा, माझ्या लक्षात आले आहे." वंदना बोलते.

वंदना त्या इवल्याश्या जीवनाकडे ममत्वाने बघू लागली. दिनकरला वंशाचा दिवा पाहिजे होता पण त्याला माहित नव्हते त्याच्या घरात वंशाची पणती जन्माला आली आहे. एक दिवस याच मुलीच्या नावाने दिनकर समाजात ओळखला जाणार होता. हिच मुलगी त्याचे नाव मोठे करणार होती, त्याचे जगात प्रसिद्ध करणार होती.

त्या बिचाऱ्या जिवाला आईची माया तर भेटत होती पण तिला बापाचे प्रेम भेटेल....!

क्रमशः
0

🎭 Series Post

View all