Login

लेक : परक धन! भाग - ३

स्त्री जन्माची कथा.
"लेक : परकं धन!" भाग - ३

मुलगी झाली आहे हे कळल्यानंतर दिनकर एक क्षणही हॉस्पिटलमध्ये थांबत नाही. घरी गेल्यावर त्याचा सर्व राग मुलींवर काढतो.

इकडे हॉस्पिटल मध्ये वंदनाचा भाऊ सुहास डिस्चार्जची सर्व प्रक्रिया पार पाडतो. वंदनाला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळतो. मुलगा न झाल्यामुळे माघारी गेलेला नवऱ्याचा विचार करून वंदना हतबल झाली होती.

हतबल झालेली वंदना तिच्या कुशीत चिमुकले बाळ घेऊन माहेरी निघते. वंदनांच्या शरीराची ताकद आणि मन दोन्हीही खचले होते. भावाच्या घरी जाताना तिच्या डोक्यात विचारांचे फक्त चक्र सुरू होते.

"सासरी काय चालू असेल?"
"हे या तानुल्या बाळाला स्वीकारतील का?"
"पुढे काय होईल." असे सगळे विचार वंदनाच्या डोक्यात येत होते.

दिनकरला पुन्हा मुलगी झाली ही बातमी दिनकरच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातल्या पारावर, चहाच्या टपरीवर एकच चर्चा सुरू होती. लोकांच्या तोंडाला जणू कुलूपच नव्हते.

कुणी सहानभूती दाखवत होते तर कुणी उघडउघड चेष्टा करत होते.

"काय दिनकर! आम्ही तर तेव्हाच सांगत होतो, दुसरं लग्न कर. पण आमचं ऐकलं नाही. आता भोग फळं!" एक गावकरी टपरीवर चहाचा घोट घेत बोलला.

"त्यालापण नशीब लागता. वंशाचा दिवा काय बाजारात मिळत नाही. त्यासाठी पुण्य करायला लागत पुण्य." दुसरा बोलला.

"आरे मला माहितच होतं मुलगीच होणार होती. मुळात बाईमध्येच दोष आहे. म्हणून तर एवढ्या पोरी जन्माला घातल्या." तिसरा बोलतो.

दिनकर गावातून चालत असताना ही शब्द त्याच्या कानावर पडत होते. प्रत्येक शब्द त्याला एखाद्या चाबकासारखा बसत होता. त्याची मान लाजेने खाली गेली होती, पण मनात संतापाचा ज्वालामुखी उद्रेक घेत होता.

गावकऱ्यांकडून अपमान गिळून दिनकर थेट दारूच्या अड्ड्यावर गेला. स्वतःहून समज करून घेतलेले दुःख आणि समाजाची बोलणी विसरण्यासाठी त्याने बाटलीचा आधार घेतला. पण दारूने दुःख कमी होण्याऐवजी, त्याच्यातला जनावराला जागे केले.

रात्र झाली होती. मोरेंच्या घरात भयाण शांतता होती. मीना आणि कल्पनाने स्वयंपाक करून घेतला होता. सर्व बहिणी आतल्या खोलीत शांत बसल्या होत्या. तेवढ्यात दरवाजावर जोरात उघडायचा आवाज आला.

दिनकर झिंगत झिंगत घरात आला. त्याचे डोळे लाला होते, शर्टाची बटणे उघडी, हातात दारूची बाटली आणि तोंड्यात फक्त शिव्या.

"मीने ऐ मीने, जेवणायला आन लवकर." दिनकर ओरडला.

मीना थरथरत्या हाताने जेवणाचे ताट घेऊन आली. दिनकरने पहिला घास तोंडांत घातला. "ही भाजी कोणी केली?" दिनकर जोरात ओरडला.

"मी केली आहे बाबा." मीना दबक्या आवाजात बोलते.

"किती तिखट भाजी केलीये! मला मारायचा विचार आहे का? तुझ्या आईची...."

"बाबा चुकून झाली असेल."

"तोंड वर करून, मला उलट उत्तर देते का! तुम्हांला जास्त माज आला आहे. तुमचा माजच जिरवितो." असे बोलून दिनकर स्वयंपाक घरातून मिरचीची बरणी घेऊन येतो.

रागाच्या भरात दिनकर मिरचीची बरणी भाजी मध्ये खाली करतो. साधारण आठ ते नऊ चमचे मिरची पावडर भाजीमध्ये पडते. दिनकरने ते सगळे एकत्र केले.

मीनाची मान पकडून दिनकरने तिला भाजी खाऊ घातली. मीना जोराजोरात किंचाळत होती. "आईsss...आईsss..."
पण त्याचा काही फरक पाषाण हृदयी दिनकरला पडत नव्हता.

"बरंय... बरंय...यांना असेच पाहिजे." चंद्रकला असे बोलून दिनकरला अजून प्रोत्साहन देत होती.

"बाबा तोंड जळते आहे..."
"खूप तिखट आहे..."
"बाबा नकोना...बाबा नकोना" मीना गयावया करत होती. पण तिची हाक ऐकायला मात्र कोणीच नव्हते. बाकीच्या मुली घाबरून एका कोपऱ्यात उभ्या होत्या.

मीनाला ठसका लागला, डोळ्यातून आणि नाकातून पाणी येऊ लागले. तोंड आगीसारखे जळत होते आणि वरतून बापाचा मार थांबत नव्हता. फक्त जेवण थोडे तिखट झाले एवढीच तिची चूक होती.

मीनाचा आरडाओरडा चालू होता. कोणीही तिला वाचवायला येत नाही. शेवटी हिंमत करून कल्पना पुढे येऊन दिनकरचा हात पकडून बोलते, "बाबा चूक झाली ताईची, सोडाणा तिला." तशी एक जोराची चपराक तिच्या तोंडावर बसते. कल्पना बाजूला जाऊन पडते.

थोड्यावेळाने ते भाजीचे ताट दिनकर मीनाच्या समोर ठेवून बोलतो, "एवढी भाजी संपवायची, आणि जर नाही संपली तर माझ्या इतके वाईट कोणीही नाही."

मीना तिखट भाजी खायला सुरुवात करते. डोक्यातून, नाकातून पाण्याच्या धारा चालू होत्या. कानातून जणू धूर निघत होता. पण मीना मात्र भाजी तशीच खात होती. आपल्या ताईला होणारा त्रास बघून मीनाच्या सर्व बहिणी ती भाजी खाऊ लागल्या.

सर्व मुलींना कळत होते की बाबांना मुलगा हवा होता आणि मुलगा झाला नाही म्हणून त्याचा राग ते त्यांच्यावर काढत आहे. पण त्यांना हाही प्रश्न पडला होता की, "यात त्यांचे काय चुकले आहे."

माहेरी वंदना पलंगावर पडली होती. शरीर जरी माहेरी होते तरी तिचे मन मात्र सासरी होते. तिला खात्री होती की मुलगा नाही झाला याचा राग दिनकर मुलींवर काढेल. याच काळजीने तिला रात्रभर झोपच आली नाही.

सकाळी उठल्यानंतर वंदनाने, सुहासला आवाज देऊन बोलवले.

"काय ताई? कशाला बोलावले?"

"सुहास लवकर तुझे आटपून घे आणि मला माझ्या घरी सोड.

"ताई तुला वेडबिड लागले आहे का? या अशा अवस्थेत तू सासरी जाणार आहे. तुझे टाकेपण अजून ओले आहे."

"मला जावंच लागल सुहास."

"मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आणि या अवस्थेत तर त्या नरकात तर अजिबात नाही. त्यात मुलगा झाला नाही म्हटल्यावर तुझा नवरा अजून बिघडला असेल!"

"आरे सुहास म्हणून तर जायचे आहे. मी जर गेले नाही तर तो राक्षस मुलींचे हालहाल करून ठेवेल."

"ताई, मला एक कळत नाही मुलगाच पाहिजे याचा एवढा अट्टहास का? मुलगी आणि मुलगा तर समानच आहे."

"त्यांना त्यांचा वंश वाढवण्यासाठी मुलगा पाहिजे."

"ताई, तुलाही असेच वाटते का मुलगाच वंश वाढवतो?"

"नाही, मला नाही वाटत. पण माझं कोण ऐकणार आहे?"

"ताई तुझ्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार मुलगा वंश वाढवतो तर तुझ्या नवऱ्यालाच सांगना वंश वाढवायला. मग का तुझ्याकडे मुलगा मागतात?

"त्यांना हे सगळं नाही कळणार. तू मला पहिले सासरी सोड."

इकडे मोरेंच्या घरी रात्रीच्या तिखट भाजीमुळे सर्व मुलींच्या पोटात आग होत होती. पण डॉक्टरकडे जा मुलींनो, असे म्हणणारे कोण नव्हते.

तेवढ्यात सुहासची गाडी दिनकरच्या घरासमोर जाऊन थांबते. मुली खिडकीतूनच आईला आणि मामाला बघतात आणि त्यांच्या जीवात जीव येतो.

वंदना कष्टाने गाडीतून उतरली.सुहासने तिला आधार दिला आणि वंदना हळूहळू चालत घरच्या उंबरठ्यापर्यंत आली.

दिनकरने घरातून वंदनाला बघितले आणि लगेच बाहेर आला. वंदनाला आणि तिच्या हातातल्या मुलीला बघून त्याचा संताप पुन्हा वाढला आणि तो गरजला,

"खबरदार! जर एक पाऊल पुढे टाकले तर!

वंदना जागीच थबकली. "अहो...मी..."

"तू काय? तुला सांगितले होते, मुलगा झाला तरच घरात थारा आहे. घरात पाऊल टाकायचं नाही."

हे सगळे ऐकूण वंदना आणि मुलींना धक्काच बसतो.

"अहो, मी कुठं जाणार?" वंदना बोलते.

"कुठपण जा आणि ही ब्याद पण घेऊन जा."

"तुमचंच रक्त आहे. ब्याद कशाला म्हणतात?"

"मुलगा असता तर मान्य केलं असतं माझा आहे. पण ही ब्याद माझी नाही. तुलाच माहिती तू कुठं शेण खाल्ल आहे."

"दाजी, असे का बोलताय? मुली मोठ्या झाल्या आहे. आता तुम्हाला असे बोलणे शोभते का? जनाची नाही निदान मनाची लाज बाळगा." सुहास मध्ये बोलतो.

"ऐ तू नको मला अक्कल शिकवू. हे माझं घर आहे. मला वाटेल ते मी बोलेल, करेल." दिगंबर बोलतो.

"सुहास तू नको मध्ये बोलू. अहो का आस वागताय? देवाने जे आपल्याला दिले आहे ते गोड मानून घ्या की." वंदना बोलते.

"कसला देव, कसलं काय! तुझ्यातच खोट आहे म्हणून तू फक्त मुलींना जन्म घातला. जोपर्यंत तू या घराला वंशाचा दिवा देत नाही तोपर्यंत तुला या घरात जागा नाही." असे बोलून दिनकर धाडकन दरवाजा लावून घेतो.

मीना आणि बाकीच्या मुली खिडकीतून हे बघून रडू लागतात. आपल्या आईला घरात येऊन दिले नाही याचे त्यांना वाईट वाटत होते, पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. त्यांची नजर आईच्या हातातील बाळाला शोधत होती पण त्यांना काही ते बाळ दिसत नव्हते.

वंदना उंबरठ्याबाहेर उभी होती. दुपार झाली होती, वरतून सूर्य आग ओकत होता आणि हातात ते चिमुकले, गोजिरवाणे बाळ होते...

क्रमशः
0

🎭 Series Post

View all