Login

लेक भाग १

Daughter And Daughter In Law
लेक भाग १

विषय - परकी

©® सौ.हेमा पाटील.


"केदार, आई पप्पांच्या फोटोची पूजा करून घे. फ्रीजमध्ये हार, फुले ठेवली आहेत ती काढून घे." अनुचे हे बोलणे ऐकून केदार बुचकळ्यात पडला. आज अक्षय्य तृतीया! ही आपल्याला का पूजा करायला सांगतेय? आईपप्पांना जाऊन चार वर्षे झाली. सहा महिन्यांच्या अंतराने दोघेही हे जग सोडून गेले. तेव्हापासून आजपर्यंत पितृश्राद्ध असो की वर्षश्राद्ध सगळी तयारी, पूजा अनुच करायची. केदार फक्त पिंड पाडण्यापुरता आणि नैवेद्य दाखवण्यापुरता...बाकी सगळे तीच करायची, तेही मनोभावे!
मग आजच असे काय झाले? असा मनात आलेला विचार झटकून टाकत तो आत आला. अनु किचनकट्ट्यापाशी उभी होती. केदारने मुकाट्याने फ्रीज उघडून हाराची पिशवी बाहेर काढली व तो फोटो समोर पूजा करण्यासाठी बसला.

त्याची पूजा करून झाली की तिने नैवेद्याचे ताट बाजूला आणून ठेवले.
" अगं पाणी दिले नाहीस." असे तो म्हणाला.
" ऊठ आणि घे तुझे तू. तुझ्या आईवडिलांसाठी तेवढे तरी कर." असे अनु म्हणाली.
हे तिचे चमत्कारिक उत्तर ऐकून त्याला आश्चर्य वाटले, पण तिला काही न बोलता त्याने स्वतः उठून पाणी घेतले. डोळ्याच्या कोपऱ्यातून अनु त्याच्याकडे पहात होती.
अनुचे नक्की काहीतरी बिनसलेय हे त्याला समजले, पण काय हे लक्षात येईना. तो नैवेद्य दाखवून बाजूला झाला. अनुने फोटो समोर येऊन माथा टेकवला व नमस्कार केला. त्यानंतर ती परत किचनकट्ट्यापाशी जाऊन उभी राहिली.

संपदा आणि भाऊजींची तो वाट पहात होता. आज अक्षय्य तृतीया गुरुवारी आली होती. सगळे आटोपून ऑफीसला जायचे होते त्यामुळे तो त्या दोघांची वाट पहात होता. संपदा ही त्याची बहीण होती आणि भूषण भावोजी...त्यासोबतच तो त्याचा मेहुणाही होता. अनुचा सख्खा भाऊ.

ते दोघे आले तसे आत येऊन केदारने पाण्याचा तांब्या भरून घेतला व अनुला सांगितले,
" ताई आली आहे. ताटे करायला घे."
केदारने दोघांना पाणी दिले व त्यांची चौकशी केली.
"आई कशा आहेत?" हेही विचारले.
"बऱ्या आहेत. अनु आली होती की आईंना भेटायला परवाच ! तिने सांगितले नाही का?" संपदा म्हणाली.

केदार बुचकळ्यात पडला.' अनु तिच्या आईला भेटायला कधी गेली होती? आपल्याला काहीच सांगितले नाही तिने.'
संपदा व भूषणने फोटोसमोर उभे राहून नमस्कार केला. हळदी कुंकू, फुले वाहीली.
तेवढ्यात अनुने तीन ताटे करुन आणली. संपदा व भाऊजी यांना पाय धुवून कपाळावर कुंकुमतिलक लावून बसवले.

दोघांनी जेवायला सुरुवात केल्यावर तिने केदारच्या पुढ्यात ताट ठेवले. तिघेही गप्पा मारत जेवणाचा आस्वाद घेत होते.

आईपप्पा गेल्यापासून केदार श्राद्धाच्या दिवशी तसेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संपदा व भाऊजींना मेहूण म्हणून जेवायला बोलावत असे. यामागे हाच हेतू असे की, सगळे कुटुंब काहीवेळ एकत्र येत असे. परक्या कुणाला बोलावण्यापेक्षा यांना बोलावणे सोयीचे होते. कारण त्यामुळे केदारला सुट्टी काढावी लागायची नाही. सकाळी कितीही लवकर बोलावले तरीही ते दोघे ॲडजस्ट करुन येत असत. त्यांनाही नोकरीवर जायचे असायचे. अनुही त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत असे. आज मात्र अनु फक्त हवे नको बघण्यापुरतीच बाहेर येत होती.

अनुचे तुटक वागणे संपदाच्या लक्षात आले नाही तरी भूषणच्या लक्षात आले. त्याने अनुला विचारले,
"काय झाले आहे गं तुला? अशी गप्प गप्प का आहेस?"
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

🎭 Series Post

View all