सरत्या वर्षाला निरोप..
दोन हजार पंचवीस हे वर्ष माझ्यासाठी घडामोडींपेक्षा जास्त अंतर्मुखतेचं ठरलं. बाहेर फार काही बदललं नसलं तरी आत खोलवर बरंच काही बदललं. विचार बदलले, भावना परिपक्व झाल्या आणि शब्दांना नवी धार मिळाली.
या वर्षात लेखन फक्त छंद राहिला नाही. ते स्वतःशी संवाद साधण्याचं साधन बनलं. या वर्षात मी लिहायचं म्हणून लिहत नव्हते तर शब्द माझा श्वास बनले. मनात साठलेलं, कुणाला न सांगता येणारं सगळं कागदावर उतरू लागलं. काही ओळी अवघड होत्या, काही प्रसंग वेदनेतून आलेले; पण ते लिहिल्यावर हलकं वाटायचं.
या वर्षात लेखन फक्त छंद राहिला नाही. ते स्वतःशी संवाद साधण्याचं साधन बनलं. या वर्षात मी लिहायचं म्हणून लिहत नव्हते तर शब्द माझा श्वास बनले. मनात साठलेलं, कुणाला न सांगता येणारं सगळं कागदावर उतरू लागलं. काही ओळी अवघड होत्या, काही प्रसंग वेदनेतून आलेले; पण ते लिहिल्यावर हलकं वाटायचं.
हे वर्ष मला धावायला लावणारं नव्हतं. ते मला थांबायला शिकवत होतं. पूर्वीसारखी घाई नव्हती. लोक, नाती, प्रसंग सगळं नीट न्याहाळत पाहायची सवय लागली. कोण काय म्हणतंय यापेक्षा का म्हणतंय हे महत्त्वाचं वाटू लागलं. अपेक्षा कमी झाल्या पण समज वाढली. माझ्या कथेतली अनेक पात्रं जणू माझ्याच मनाचे वेगवेगळे कंगोरे घेऊन उभी राहिली. त्यांच्यामधून नात्यांची गुंतागुंत, स्त्रीमनाची घालमेल, समजूतदारपणा आणि न सांगता येणाऱ्या वेदनाही व्यक्त करता आल्या.
या गत वर्षाने मला संयम शिकवला. प्रत्येक गोष्ट लगेच सुटत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या क्षणी लगेच मिळत नाही हे शांतपणे स्वीकारायला शिकवलं. संवादाचं महत्त्व कळलं तसंच मौनाचंही. जुनीच नाती या वर्षी वेगळ्याच नजरेने नव्याने पाहिली. जवळचे असूनही दूर असलेले लोक समजले आणि फार बोलत नसतानाही सोबत उभे राहणारेही. सगळ्यांनाच दोष देणं थांबलं. काही वेळा स्वतःला समजून घेणं जास्त गरजेचं वाटलं. आवडत्या नावडत्या सर्वांना स्वीकारलं. ज्यांना मी आवडत नाही त्यांचंही अस्तित्व आहे. तेही याच जगाचा भाग आहेत हेही स्वीकारलं. त्यांचं असणं स्वीकारलं.
हे वर्ष फार झगमगाटाचं नव्हतं. पण जे काही होतं ते खरं होतं. थोडं अस्वस्थ, थोडं हळवं करणारं होतं. चुका झाल्या, संभ्रम आले; पण त्यातूनच दिशा सापडली. या वर्षाने मला मजबूत केलं असं नाही म्हणता येणार पण त्याने मला खरं, प्रामाणिक बनवलं. दोन हजार पंचवीस हे वर्ष संपताना एवढंच वाटतंय, मी अजूनही शोधात आहे; पण आता शब्द माझ्या सोबत आहेत. हे वर्ष खूप काही मिळालं म्हणून महत्वाचं ठरलं असं नाही पण स्वतःपासून धावणं थांबलं.
नवीन वर्षात, दोन हजार सव्वीस मध्ये खूप मोठे प्लॅन्स नाहीत पण काही गोष्टी ठरवल्यात. नवीन वर्षात मी खूप मोठं काही लिहीन असं नाही पण जे लिहीन ते प्रामाणिक असेल. रोज लिहिलं पाहिजे. सतत चांगलं लिहिलंच पाहिजे अशा अपेक्षा शब्दांवर लादणार नाही. जेव्हा मन भरलेलं असेल तेव्हाच लिहीन. कारण रिकाम्या मनातून आलेले शब्द कधीच खोल जात नाहीत.
नवीन वर्षामध्ये माझ्या कथेतील पात्रं अधिक मोकळी असतील. त्यांना योग्य अयोग्याच्या चौकटीत बंदिस्त करणार नाही. ती चुकतील, थांबतील, गोंधळतील आणि तरीही खरी वाटतील. कारण माणूस तसाच असतो.
मी लेखनात धाडस करीन. सुरक्षित वळणं, सवयीचे विषय, नेहमीची शैली यांच्यापलीकडे जाऊन लिहिण्याचा प्रयत्न करीन. सगळ्यांना आवडावं यापेक्षा ज्यांना भिडेल त्यांना भिडावं आणि त्याही पुढे जाऊन मला आवडलं पाहिजे हे महत्त्वाचं ठरेल.
नवीन वर्षांमध्ये मी माझ्या लेखनाला वेळ देईन. लेखन आणि आयुष्य यांच्यात भिंत उभी करणार नाही. दोन्ही एकमेकांत मिसळून जाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या शब्दांशी प्रामाणिक राहीन. ते थांबले तरी, हरवले तरी मी त्यांना जबरदस्तीने लिहिण्यास भाग पाडणार नाही. हे वर्ष माझ्यासाठी “मी मोठी लेखिका वगैरे होईन असं काही नाही पण नवीन वर्षात मी स्वतःचा आवाज गमवू देणार नाही हे नक्की..
