लेखनातील ऋतू... ऋतुजा.

This is about my writer come sweet friend Rutuja. She is well known for her stories. Whcih are inspiring. Her loving personality is to adorable. Soft at heart and standing by the truth is her quality.

नमस्कार, 

मी पूजा आणि आज माझा ब्लॉग, माझ्या एका खास मैत्रिणी बद्दल आहे, ती म्हणजे आमची लाडकी ऋतुजा. ऋतुजा म्हणजे ऋतूंची राणी; शांत, प्रसन्न, मेहनती आणि देखणी. 

आधी माझे आणि ऋतुजाचे नाते म्हणजे एक वाचक आणि एक लेखक आणि आता आम्ही गोड, घनिष्ट मैत्रिणी. ईरावर मी तिच्या कथा वाचत आणि समीक्षण देत असे; त्यावर ती पण छान उत्तर देत होती. मी एक वाचनवेडी; मी ईरावर बहुतेक सगळ्याच कथा वाचत होते; मला या सर्व लेखिकांचे खूप कौतुक वाटत होते; त्यांची भन्नाट कल्पनाशक्ती मला भुरळ घालत होती. आपण पण लिहून बघावे असा विचार करत मी ईरा लेखक ग्रुपमध्ये शामिल झाले. तिथे खूप जणांशी ओळख झाली; तिथे मला ऋतुजा सापडली. तिची "पुढचे पाऊल" या कथामालिका बद्दल मी तिचे कौतुक केले आणि त्यातूनच मग आमची ओळख झाली. ग्रुपमध्ये ऋतु सोबत कधीतरी गप्पा होत. चॅम्पियन्स स्पर्धे निमीत्त आम्ही दोघी एकाच ग्रुपमध्ये आलो आणि इथून पुढे आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. स्पर्धे निमीत्त वेगवेगळ्या विषयांवर बोलणं झाल्यामुळे, चर्चा केल्यामुळे, एकमेकींचे विचार जाणून घेताना आमच्यात छान मैत्री होत गेली.

मी आणि ऋतुजा, स्वभावाने एकदम विरुद्ध टोक, तरीही आमचे छान जुळले. तिला काही प्रश्न असेल किंवा कुठल्याही एॅप्स् ची माहिती हवी असेल तर बिनधास्त विचारते. मी सुद्धा कुठल्या आयडिया सुचविल्या तर त्या विचारात घेते आणि अंमलात आणते. तिची नाराजी असो किंवा निराशा व्यक्त करते पण तेही खूपच निरागस आणि गोड वाटते मला. कौतुक सुद्धा भरभरून करते. कुठलीही प्रतिक्रिया देताना तिला माझ्याकडे संकोच वाटत नाही हे खूप आनंददायी आहे.  

 स्वभावाने शांत आणि संयमी अशी ऋतू आमच्या ग्रुपमध्ये थोडीशी बडबडी झालीये; माझ्यासोबत बाकी सगळ्यांचा बडबड्या गुण तिला लागला नसेल तर नवलच; ती सुद्धा बिनधास्त गप्पा मारू लागली; गमती जमती, सुख दुःख सगळं शेअर करू लागली. परिस्थिती कशीही असू देत, चूक नसतानाही ती 'सॉरी' म्हणून टाकते आणि प्रकरण शांत करते. हा तिचा एक गुण खूप छान असला तरी कधीकधी मला हे पटत नाही म्हणून मी सुरुवातीला तिला इमोजी मधून फटके दिले आहेत. ऋतूचे चिडणे सुद्धा तिच्यासारखेच शांत, रागावली, चिडली आहे, हे कळूनच येत नाही. तिची फोटोंची हौस पण खूप भारी आहे. फक्त फोटोचा विषय निघायला हवा, मग सगळ्यांचे फोन हँग नाही झाले तर बघा.

ऋतुजाची शिक्षणाची आवड वाखाणण्याजोगी आहे. घर, मुलं, मेडिकल शॉप, लिखाण आणि शिक्षण, अशी तारेवरची कसरत करत ती आयुष्याचा समतोल साधत आहे. एवढे सर्व असून सुद्धा ती ईरावर प्रत्येक स्पर्धेत भाग घेते. कुठलीही फेरी असो, त्या सगळ्यात हिरिरीने सहभाग नोंदवीत नेहमीच स्वतःला झोकून देत असते. परीक्षा तोंडावर आलेली असताना सुद्धा हिच्या कथा लिहून संपूर्ण असतात. ह्याला माझ्या दृष्टीने दूरदृष्टी म्हणेन; कारण आपल्यामुळे आपल्या ग्रुपचे कुठूनही नुकसान होऊ नये आणि झाले तर ही सगळे स्वतःवर ओढून घेईल, हे नक्की.  

ऋतुजाने आतापर्यंत बऱ्याच लघुकथा, कथामालिका, जलद कथा, कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत ईरावर तिचे ७३५ ब्लॉग्ज प्रकाशित झाले आहेत. तिच्या कथांमधून स्त्री संघर्ष जास्त जाणवतो, स्त्रियांनी स्वतःसाठी उभे राहावे, असे संदेश तिच्या कथांतून मिळत असतात. तिची "पुढचे पाऊल" ही कथा बरीच गाजली आहे. सुखाची ओंजळ, अहिल्या.. संघर्ष मातृत्वाचा, बोचणारा पाऊस, काटेरी वाटेवरून चालतांना, माहेरची ओढ, थोडं तिचंही कौतुक करा, होऊ कशी उतराई अशा अनेक सुंदर सुंदर कथामालिका लिहिल्या आहेत. ती बऱ्याच साहित्यिक व्यासपीठावर लिहीत असते आणि पुरस्कार पण प्राप्त करत असते. 

ऋतुजामध्ये आत्मविश्वास प्रचंड आहे, म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत हार न मानता जिंकण्याची जिद्द ठेवते. कितीही संकटे आली, कोणीही तिला टोचून बोलले, त्रास दिला, आत्मविश्र्वास तोडायचा प्रयत्न केला तरी ती कुठल्याच अशा गोष्टीने खचत नाही; थोड्या वेळसाठी दुखावते पण परत हिमतीने उभी राहते. ती आपले लक्ष्य विचलित होऊ देत नाही. मला तिचा हा गुण खूप आवडतो. तिच्या पासून अशा बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळत आहेत. 

आनंदी, उत्साही ऋतुजा, कायम अशीच हसत रहा.. तू खूप प्रेरणादायी सुंदर मैत्रीण आहेस…