गोष्ट छोटी डोंगराएवढी. विषय:- लेखणी एक शस्त्र. शिर्षक:- लेखणी एक कला. लेखणी म्हणजे काय ? लेखणी म्हणजे एक धारदार शस्त्र जे हटवते मनावर पांघरलेले अविचाराचे वस्त्र ! जे करू पाहते वाईट वृत्तीचा अस्त ! लेखणी सत्य असत्याची जाण देई मनाला मानसिक समाधान ! लेखणी शब्द, भावना,विचार यांची ओळख आणि पारख ,लेखणी विचार अविचाराचे स्पष्टीकरण, विचारामधील सामर्थ्य आणि फरक ,लेखणी विचारामध्ये समतोल साधण्याचे साधन शब्दातून व्यक्त होणार प्रत्येक गोष्टीचे आकलन. लेखणी अनुभवाचा प्रवास ज्यामध्ये प्रत्येक विषय असतो खास. शब्द आपल्या सगळ्याच्या जवळचे असतात.तेच तर कधी प्रेरणा, आत्मविश्वास वाढवायला मदत करतात."एका लेखणीत हजार तलवारीची ताकद असते ". हजार तलवारीनी जरी पराक्रम केला तरी त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम लेखणी करते. शब्दांनी करतात प्रहार, धाडसी झुंजार, समाजसुधारणा निर्धार विचारात बळ शब्दांना धार, सुरक्षित समाजाची शिल्पकार ,झेप गरुडा ची नजर सभोवार असत्याचा करते संहार हाती लेखणी तलवार अशी किमया लेखणीची. तसे पाहू गेले तर लेखक आणि लेखणीचा खूप जिव्हाळ्याचा संबंध,लेखकाला काय वाटते त्याचे काय विचार आहे हे तो त्याच्या लेखणीतून मांडतो त्यामुळे त्याची मनाची घुसमट कमी होते . म्हणतात ना आपल्याला काय वाटते ते दुसऱ्याला सांगीतले तर तेवढेच मन हलके होते त्याप्रमाणे जर तेच आपण लेखणी तून मांडले तर एखाद्याला पटले त्यातून त्याचे समाधान झाले तर चांगलेच आहे ना .... आई नेहमी म्हणते " आपण काय बोलतो याकडे आपले लक्ष नसते पण इतराचे खूप असते". त्यामुळे आपल्या बोलण्यातून नेहमी दुसऱ्याला प्रेरणा कशी मिळेल याकडे लक्ष दे. भलेही तुझे विचार इतरांना पटतील , नाही पटतील पण तुझे ध्येय सोडू नको. लेखणी ही एक कला आहे आपल्याला काय वाटते हे लिहून मोकळे व्हावे .जेव्हा काही गोष्टी इतराबरोबर नाही शेयर कराव्या वाटत तेव्हा हीच लेखणी आपला आधार असते ,हीच माझा श्वास असते. प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या कला , छंद, वैशिष्ट्ये वेगळी वेगळी असतात. तुमच्यासाठी जो उतारा असेल आयुष्यावरचा, पण एखाद्याची ती व्यथा असते. स्वतःला सतत खरवडून काढावे लागते..जखमा सोलून काढाव्या लागतात. रक्त ठिबकत राहते आणि जीवाला जाळत राहून लिहावे लागते. इतकं दान तर टाकावंच लागतं शब्दांच्या ओंजळीत. मी तर माझं सारं काही, शब्दांमधूनच मांडते.. ज्याला जसं वाटेल, तसा तो अर्थ लावतो.. कुणाला ते लेखन वाटतं.. कुणाला ती कविता वाटते.. तर कुणाला वाटते चारोळी.. हे शब्द म्हणजे, माझ्या भावनांचा पाझर असतो.. या शब्दांमधूनच, वर्षाच्या सरी सारखं बरसत मी असते.. नवं काही वाचताना, मनामध्ये येणारा उबाळ, आपलं नकळतं त्यात विरघळत जाणं.. इतर कविंच्या, इतर लेखकांच्या शब्दरुपी खोल डोहात, आपलं आपणचं आतवर रुततं जाणं.. शब्दान् शब्दागणिक आपलीच स्पंदने आपल्यालाच ऐकू येणं.. आणि शब्दान् शब्दाअंती, त्या संदर्भात आपलं आपणचं रीतं होत जाणं.. हा विलक्षण भावनिक उबाळ, कधी आपलाच आपणास उमजणं.. तर कधी आपणचं सगळं समजून, जाणून बुजून टाळणं.. जेंव्हा मी लेखणीच्या प्रेमात पडले, भावभावनांचे अतूट नाते विणत गेले.. प्रत्येक पात्राचा ठाव घेण्यात मन रमु लागले.. बघता बघता कितीतरी सुंदर शब्दाचा मेळ जमु लागला.. आजवर मनात कोंडून ठेवलेल्या विचारांना, मुक्त आकाशाने कवेत घेतल्यासारखे वाटु लागले.. दिवसागणिक अक्षराला अक्षर, शब्दाला शब्द जोडता जोडता अफाट लेखन तयार होऊ लागले.. स्वतःचं कौतुक करण्यात मन ही मागे न हटले.. प्रत्येक दिवसांची, लाजवाब लिखाणांची आता जणू मेजवानीच सुरू झाली.. मग लाजवाब लिखाणांची मेजवानी चाखण्यासाठी, मन ही अधीर होऊ लागले.. आता डोक्यातल्या विचारांनी मनाकडे, हदयाकडे वाट वळवली.. अबोल माणसालाही, लेखणीने बोलते असे काही केले.. तेंव्हा कुठे समजले, अबोल व्यक्तीएवढे बोलके दुसरे कोणीही नाही.. प्रेमाच्या ही पलीकडे लेखणीच्या प्रेमात मी पडले.. अशी ही लेखणीची कला सगळ्यांना मिळू दे. ॲड. श्रद्धा मगर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा