Login

लेकीचं अपयश की सुनेची प्रगती

लेकीच अपयश की सुनेची प्रगती.
वाह ! कल्पना तुझा आणि तुझ्या जावेचा हा ब्लाऊज किती सुंदर दिसत आहे.
अगदी बारीक डिझाईन्सपण रेखीव दिसत आहेत.
कुठे शिवायला दिला होतास ?

कुठेच नाही. अगं म्हणजे आई, माझ्या जाऊबाई खूप एक्सपर्ट आहेत हा शिवणकामात . आयत्यावेळी त्यांनीच दिला मला शिवून.
कल्पना आपल्या मोठ्या जावेची म्हणजे रेणुकाची स्तुती करत म्हणाली.

आज कल्पनाच्या भावाचा साखरपुडा होता. त्यामुळे तिचे सासरचे कुटुंब या कार्यक्रमाला आले होते.
बोलता बोलता कल्पनाच्या आईंना समजले की रेणुका म्हणजे तिची मोठी जाऊ शिवणकाम खूप चांगले करते म्हणून त्यांनी रेणुकाला लग्नासाठी लागणाऱ्या साड्या, त्यांचे ब्लाऊस, फॉल पिको वैगेरे काम करून देण्याची विनंती केली. तेही मोबदल्यासकट.
यावर रेणुकाने ही हसत हसत त्यांची विनंती स्वीकारली.

त्यांचं हे बोलणं ऐकून सासूबाईंनी नाक मुरडले आणि तेथून दुसरीकडे गेल्या.

दुसऱ्या दिवशी.....

रेणुका वहिनी ,तुम्ही शिवणकामात एक्सपर्ट आहात तर घरच्या घरी व्यवसायाचा विचार का नाही करत?

तुला काय वाटतं कल्पना मी हा विचार केला नसेल ? पण आपल्या सासूबाईंमुळे मला करता येत नाही.

कल्पना - म्हणजे ? त्यांनी मनाई केलीय का तुम्हाला ?

रेणुका तिला समजावत म्हणाली, मला लग्नाआधीपासून शिवणकामाची आवड आहे.
लग्न करून या घरी आल्यानंतर एकदा आपल्या कावेरीताईंची ( नणंद) खोली आवरत असताना कपाटात मला आधुनिक डिझाईन्सचे कॅटलॉग, टिपा, पुस्तके , वैगेरेची पुस्तकं सापडली.
माझ्या नवऱ्याकडून मला समजलं की कावेरीताईंनी मोठ्या इन्स्टिट्यूट मधून fashion designer चा महागडा कोर्स केला. त्यावर सासूबाईंनी नातेवाईकात ,शेजाऱ्यापार्यात भरपूर कौतुक केलं. त्यांना एक बुटिक सुरू करून दिलं.
साधारण कामाच्या तुलनेत महागडे दर परवडणारे नव्हते म्हणून जास्त गिऱ्हाईक फिरकायचं नाही आणि एकदा आलेलं गिऱ्हाईक सुमार कामामुळे परत यायचं नाही . त्यामुळे ४ महिन्यातच ते बंद कराव लागलं.
याचं सासूबाईंना दुःख झालं. मी आल्यानंतर माझ्या स्वतःसाठी थोडफार शिवणकाम सुरू केलं आणि लोकांना ते पसंद पडलं.
हळूहळू मला कामं मिळू लागली
आणि सासूबाईंचा जळफळाट झाला.
मी घरातली कामं उरकून जेव्हा मशीन सुरू करायचे नेमकं तेव्हाच मला काहीना काही काम सांगायच्या.
कधी अचानक पाहुणे यायचे नाहीतर त्यांना काहीतरी दुखणी सुरू व्हायची.
मग माझ्याच लक्षात आला त्यांचा हा प्रकार. म्हणून मी थांबवलं हे. आता स्वतःपुरते करते काही असेल तर.

कल्पना - पण हे काय वागणं झालं ताई? मुलीचा व्यवसाय बिघडला म्हणून सुनेला बंदी?

साहजिकच आहे ज्या गोष्टीत आपली लेक अपयशी झाली त्यातच सुनेची होणारी प्रगती पाहून कोणत्याही आईला लेकीसाठी वाईट वाटणारच ना?
सोड कल्पना हा विषय आता.
रेणुका तिला सांगून निघून गेली.

पण इकडे कल्पना विचारात पडली. वरवर चांगलं वागणाऱ्या बोलणाऱ्या सासूबाई मात्र अशाही असू शकतात याचे तिला नवलच वाटले.

पुढे दुसऱ्याच आठवड्यात एकदा कावेरीताई घरी आली. दोन्ही जावानी मिळून त्यांचं आदरातिथ्य केलं. दुपारी खोलीत विश्रांती घेत असताना सहज कल्पना कावेरी ताईंशी गप्पा मारायला आली आणि तिने मुद्दामून तिच्या कोर्स आणि बुटिक बद्दल विचारणा केली.

यांवर कावेरी ताई हसू लागली.

कल्पना खरंतर मैत्रिणींच्या नादी लागून मी फॅशन डिझायनिंगला ॲडमिशन घेतलं खरं पण नंतर जाणवलं की यात इंटरेस्ट नाही येत आहे. मी नको म्हणत असतानाही आईने बुटिक सुरू करून दिलं पण मला ते manage करता आलं नाही. परिणामी बंद पडलं.
लग्नानंतर मला सासरच्या लोकांकडून व्यवसायाचे धडे मिळत गेले आणि मी आता घरच्या व्यवसायात मदत करते. लक्ष घालते.
बुटिक बद्दल मला काही वाटत नाही कारण त्यात मला कधी इंटरेस्टच नव्हता.

यावर कल्पनाने कावेरीताईंना रेणुका वहिनींसोबत जे घडतं आहे त्याबद्दल सांगितले.

त्याच दिवशी संध्याकाळी सर्व एकत्र जेवायला बसले.
जेवताना कावेरीचे लक्ष नसल्याचे पाहून सासूबाईंनी तिला विचारलेच..

काय झालं कावेरी ? तुला जेवण आवडलं नाही का ? दुसरं काही करायला सांगू का ?

ताई तुमच्या आवडीचं फ्रूट सॅलड पण आहे. हे घ्या असं म्हणून रेणुकाने वाटी त्यांच्या पुढ्यात ठेवली.

नाही गं रेणुकावहिनी जेवण नेहमीप्रमाणे चवदार झाले आहे पण मी काय सांगू ?
लग्नानंतर मी आमच्या घरच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात सासऱ्यांना आणि नवऱ्याला मदत करू लागले. थोडेफार लक्ष देऊ लागले.
यावरून सासूबाई विचित्र वागू लागल्या. सुरुवातीला चांगलं वागणाऱ्या बोलणाऱ्या सासूबाई मला न कळेल असा टोमणा मारतात. सर्वांसमोर गोड बोलतात.

कल्पना - पण असं झालं तरी काय ताई?

एकदा मोठ्या नणंदबाई घरी आल्या तेव्हा समजलं की त्यांचं शिक्षण असूनही घरचे नोकरी किंवा व्यवसाय करू देत नाहीत. त्यांचं शिक्षण फक्त घरकामातच जात आहे .
याउलट माझी परिस्थिती म्हणून त्या माझा राग राग करतात.

आता मला सांग आई . लेकीला प्रगती करता येत नाही म्हणून सुनेला अशी वागणूक देतात हे तुला तरी पटतं का गं?
तू पण अशीच वागली असतीस का तुझ्या सुनेसोबत?
यावर सासूबाईंनी चमकून रेणुकाकडे पाहिले . दोघींची नजरानजर झाली तशी त्यांनी नजर हटवली.

म्हणूनच मी सासूबाईंना सुनावलं आहे. काय पद्धत आहे का ?
मी आपलं घर आपली माणसं म्हणत तुमच्यासाठी सर्व करायचं आणि तुम्ही लेकीला मिळालं नाही म्हणून मला त्रास द्यायचा.
शिवाय धमकी पण दिली आहे जर हे बंद झालं नाही तर मी सरळ नवऱ्याला घेऊन वेगळं राहील मग करा काय करायचं ते.
बरोबर ना रेणुका वहिनी ?
एवढं बोलून कावेरीताई सरळ खोलीत निघून गेली.
इकडे ही मात्रा बरोबर लागू पडली .

दुसऱ्या दिवशी सासूबाई फोनवर..

छायाताई तुम्ही चौकशी केली होती ना, आमची रेणुका साड्यांचे ब्लाउस वैगेरे मस्त शिवते. आजच या मग घरी.


हे बोलणं ऐकून कावेरीताई आणि कल्पनाने एकमेकींना टाळी दिली.
0