लघुकथा
सेकंड इनिंग
शीर्षक- लेकीच्या घरी आईचे माहेरपण
सेकंड इनिंग
शीर्षक- लेकीच्या घरी आईचे माहेरपण
आई, कां गं आज तू नाराज दिसत आहेस? शर्वरीने आपल्या आईला विचारले.
नाही गं. आज थोडं डोकं जड वाटत आहे. बाकी काही नाही. आई, तू माझ्यापासून काही पण लपवू नकोस. मी तुझी मुलगी आहे. आई, माझ्या मनात काय आहे हे तू जशी ओळखतेस नां, तसं तुझं मन मी नक्कीच जाणू शकते.
खरं खरं सांग नक्की काय झालं? शर्वरीने आईला बोलते केले.
अगं शर्वरी, काल माझ्या वाचनात आलं की दिवाळीला प्रत्येक स्त्री पहिल्या अभ्यंगस्नानाला घरातील सर्वांना ओवाळते. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीला ओवाळते. पाडव्याला नवऱ्याला ओवाळते. पण त्या स्त्रीला कोण ओवाळतं.? खरंच किती अर्थ दडलेला आहे या ओळींमध्ये.
शर्वरी, माझी आई मी लहान असतानाच वारली. मला दोन बहिणी आणि मी तिसरी. माझ्या आजी-आजोबांना मुलाची आशा होती. पण माझ्या रुपात तिसरीही मुलगीच झाल्यामुळे माझ्या आईचा त्रास आणखीनच वाढला.
सतत अपमानित बोलणे, मारझोड करणे. अशातच एका आजाराने तिला ग्रासले व त्यातच तिचा मृत्यू झाला. माझे तर माझ्या आजी आजोबांनी, वडिलांनी तोंड सुद्धा पाहायचे टाळले होते. सांगताना सारखे शारदाताईंचे डोळे भरून येत होते.
"आई इतकी कशी गं निष्ठुरता? इतके कसे निष्ठुर होऊ शकतात आई वडील आपल्याच अपत्यांच्या प्रति. मुलगा आणि मुलगी सारखेच नां नाही गं.
शर्वरी, तेव्हाचा काळ वेगळा होता. मुलगी म्हणजे आर्थिक अडचण समजली जायची. परक्याचं धन असं वारंवार तिच्यासमोर म्हटलं जायचं. स्त्री भ्रूणहत्या व्हायच्या. त्यामुळे लिंग गुणोत्तर कमी होत गेले.
समाजात आज मुलगा मुलगी भेद केला जात नाही. संविधानामध्ये स्त्री पुरुष समानता तत्व आहे. आज शासनाकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जात आहे.
नोकरीच्या ठिकाणी स्त्रियांसाठी आरक्षण आहे. मुली/स्रिया उच्च शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन करत आहे. म्हणजे एकंदरीत पूर्वीचे चित्र अगदी पालटून गेले आहे.
परंतु मागील काळामध्ये मुलींची संख्या जी कमी झाली ती अजूनही भरून निघाली नाही. लिंग गुणोत्तर समप्रमाणावर आलेच नाही. म्हणूनच आज मुलींसाठी सोन्याचे दिवस आले आहेत. पूर्वी उपवर मुलींसाठी मुलगा शोधावा लागे. आता उपवर मुलासाठी मुलगी मिळायला वेळ लागतो. कदाचित एके काळच्या स्त्रीभ्रूणहत्येचा हा शाप असेल.
पहा मी गोष्ट सांगण्याच्या नादात कुठल्या कुठे पोहोचली. असो.
मी शाळेत जायला लागले तरी पण माझ्यावरचा माझ्या आजी आजोबांचा, वडिलांचा रोष काही कमी झाला नव्हता. मी 'नकोशी' होते नां... मी अभ्यासात हुशार. पण त्याची कोण काळजी घेतो. मला वाचनाचा छंद. मी शालेय लायब्ररीतून पुस्तके आणून लपून लपून वाचायची.
मैत्रिणींकडे गेल्यावर त्यांच्याकडील वर्तमानपत्र वाचायची मला भारी हौस. त्यामुळे साहजिकच बाहेरील जगाशी माझी ओळख होती. पण एक सांगू कां शर्वरी, माझ्या कुटुंबात होत असलेली माझी उपेक्षा, कुटुंबातील वातावरण यामुळे मी आणखीनच मजबूत होत गेले. उपवर होताच एक एक करून आम्हां तीनही बहिणींची लग्ने झाली.
माझ्या सासरी अगदी भरलेलं कुटुंब. सासू-सासरे, नणंद, दीर. खूप छान वाटलं मला. माझ्या जीवनाची ही सेकंड इनिंग. इथे माझ्या माहेरच्या अगदी विरुद्ध वातावरण. मी खूप आनंदात होते.
मी मनातून ठरवूनच टाकले होते, की माझ्या वाट्याला जे आलं ते कुणाच्याच वाटायला येऊ नये. योगायोगाने मला भरलेलं कुटुंब मिळालं. माझ्या सासू-सासर्यांच्या रूपाने प्रेमळ आई-वडील, दीराच्या रूपाने भाऊ, व नणंदेच्या रूपाने बहीण मिळाली होती.
माझ्या लग्नानंतरची पहिली दिवाळी. दिवाळीच्या दिवशी मी पहाटे उठले. घरातील सर्व काम आटोपली. ताटात दिवे, उटणे, हळदीकुंकू, अक्षता ठेवून मी पंचारती तयार केली. माझे सासू-सासरे उठले. तेव्हा सासूबाई तर माझी तयारी पाहून सासुबाई अवाक् झाल्या.
"शारदा, किती पहाटे उठलीस गं? काम आंघोळ आटपून तुझी तयारी पण झाली. सासुबाईंनी मला कौतुकाने विचारले.
मी त्यांना सांगितले,"हो आई मला या गोष्टी करायला खूप आवडतात. आपण आपली संस्कृती जपायलाच पाहिजे नां." संस्कृती आणि कॉम्प्युटर, संस्कृती आणि नवनवीन तंत्रज्ञान हे सोबत चालायला पाहिजे असं मला वाटतं. माझे विचार ऐकून सासुबाईंनी माझे तोंड भरून कौतुक केले.
खरं सांगू का शर्वरी मला आणखीन काय हवे होते. लहानपणापासूनच या सर्व गोष्टींना मी पारखी झाले होते. पहिल्या अभ्यंग स्नानाला मी सर्वांना उटणे लावून ओवाळले.आंघोळी झाल्यावर देवपूजा करून मी सर्वांना फराळ दिला. अशी ही दिवाळीची सुरुवात झाली.
दिवाळीचे पाचही दिवस माझा हा नित्यनेम चालू होता. हे सर्व करत असताना मला खूप समाधान वाटत होतं. माझे सासू-सासरे म्हणजे अगदी देव माणसं. तुझ्या वेळी गरोदर असताना त्यांनी माझे सर्व डोहाळे पुरवले.
आधीच त्यांनी आपला मुलगा शरदला सांगून ठेवले होते, की मी माझ्या सुनेला बाळंतपणासाठी तिच्या माहेरी पाठवणार नाही. ती इथेच राहणार. शरदचाही नकार नव्हता. अर्थात त्यांना माझ्या माहेरी माझ्याबद्दलची जराही कल्पना नव्हती. मीही शरदला हे सर्व सांगायचे टाळले होते.
खरंच आई तू नेहमी म्हणायची, "प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते." अगदी खरं आहे ते.
शर्वरी मन लावून ऐकत होती. आईच्या गोष्टी संपूचं नये असं तिला वाटत होतं. शर्वरी, तुझं लग्न झालं आहे. आता तू सुद्धा तुझ्या सासू-सासऱ्यांना असचं सुखात ठेव.
"अगं मोठ्यांचे आशीर्वाद खरंच खूप मोलाचे असतात गं."शारदाताई लेकीला सांगत होत्या.
हो आई. माझ्या सासुबाई माझे नेहमी कौतुक करत असतात. मी त्यांना म्हणते हे सर्व माझ्या आईचे संस्कार आहेत.
आई, तुला एक गोष्ट सांगू कां? कालच माझ्या सासुबाईंचा फोन आला होता. तुझ्या आईला माहेरपणासाठी सोबत घेऊन ये. मी सक्षमला तुझ्या आईला व तुला घ्यायला पाठवत आहे. येऊन जा आईला घेऊन म्हणून.
आई, चल कर तयारी. आता मी माझ्या घरी तुझं माहेरपण करणार आहे. शारदा ताईंना काय बोलावं कळेना.शर्वरीने आपल्या बाबांना सुद्धा आपल्या सोबत चलण्याचा आग्रह धरला.पण त्यांनी सांगितले, की तुझ्या आईलाच घेऊन जा.खूप थकली गं ती.मी नंतर येईन. ठीक आहे बाबा.शर्वरी म्हणाली.
कां गं शर्वरी तुझ्या सासूबाईंना माझ्या विषयी, माझ्या बालपणाविषयी काही कळलं तर नाही नां? शारदाताईंना शंका आली.
आई मनात नाना शंका आणू नकोस. कदाचित हे हृदयाचं हृदयाशी कनेक्शन असू शकतं.
चल आटप लवकर. दुसऱ्या दिवशी सक्षम म्हणजे शर्वरीचा नवरा त्यांना घ्यायला आला. शर्वरीच्या घरी पोहोचताचं शर्वरीच्या सासुबाईंनी शारदाताईंचे थाटात स्वागत केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी शर्वरीने आपल्या आईला उटणे लावून पंचारतीने ओवाळले. शारदाताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.. त्यांनी आपल्या लेकीला हृदयाशी धरले. शर्वरी, आजचा दिवस माझ्या साठी सर्वात खास दिवस आहे. माझ्या आयुष्यातली ही पहिली दिवाळी,पहिली ओवाळणी. शर्वरीच्या सासुबाईंनी सुद्धा शारदा ताईंना ओवाळले. जेवनात त्यांच्या आवडीचे पदार्थ करून त्यांना खायला दिले.
शारदाताई, तुमच्या लेकीला तुम्ही खूप चांगले संस्कार दिले. खरंच शर्वरी खूप गुणाची आहे. शर्वरीच्या सासुबाई कौतुकाने शारदाताईंजवळ सांगत होत्या. आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं, की आता तुम्हाला माहेर पणाला बोलवायचं. आणि दरवर्षी यायचं बरं कां लेकीच्या सासरी आईचं माहेरपण अनुभवायला. ते ऐकून शारदाताईंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. हो ताई, नक्कीच येत जाईल मी. शारदाताई म्हणाल्या.
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा