लेकींच भाग्य
भाग १
"अहो वहिनी, पेढे कशाला आणलेत ? दुसरी पण मुलगीच झाली ना ? मग साखर वाटायची असते साखर ! शेवटी नशिबाचेच खेळ म्हणावे लागतील... मुलगा असता तर घराण्याला दिवा मिळाला असता, आता या दोन मुली म्हणजे आयुष्यभर फक्त उजेडासाठी तेलच ओतावे लागणार तुम्हाला ! "
शिल्पा ताईंनी सोफ्यावर ऐसपैस बसत, आपल्या हातातील सोन्याच्या जाड पाटल्या मिरवत सुनीताच्या हातातील पेढ्याचा बॉक्स बाजूला सारला. सुनीता नुकतीच बाळंत होऊन हॉस्पिटलमधून घरी आली होती. अंगात त्राण नव्हता, पण जाऊबाईंच्या या जहरी शब्दांनी तिच्या काळजाचे पाणी पाणी केले. सुरेश बाजूलाच उभा होता, त्याच्या हातात त्याची छोटी लेक 'स्नेहल' शांतपणे झोपली होती.
" शिल्पा वहिनी, मुलगी झाली म्हणून साखर का वाटायची ? लक्ष्मी आली आहे माझ्या घरी, मग पेढेच वाटणार ना ! " सुरेशने आपला आवाज शांत ठेवला, पण त्याच्या शब्दांत एक प्रकारचा खंबीरपणा होता.
"अरे सुरेश, तू खूप भोळा आहेस रे ! तुला अजून जगाचा अनुभव नाही. एक मुलगी असती तर चाललं असतं, पण आता दोन मुली म्हणजे तुम्हाला आतापासूनच त्यांच्या लग्नासाठी पैशाची तरतूद करावी लागणार. तुझ्या त्या हेल्परच्या तुटपुंज्या पगारात हे कसं जमणार ? माझी दोन मुलं बघ, अविनाश आणि सिद्धार्थ !
उद्या दोन सुना घरात येतील, तेव्हा भरभक्कम लक्ष्मी घेऊन येतील. मला चिंता नाही, कारण माझे मुलगे माझं म्हातारपण सावरतील. तुला मात्र या मुलींना सासरी पाठवताना खिसा रिकामा करावा लागेल." शिल्पा ताई एखाद्या न्यायाधीशासारखा निकाल सुनावत होत्या.
सुनीताच्या डोळ्यांतून टचकन पाणी आलं. तिला त्या क्षणी स्वतःच्या अस्तित्वावरच शंका येऊ लागली. हेल्पर म्हणून नोकरी करणारा नवरा, स्वतः शिवणकाम करून घर चालवणारी ती... अशात दोन मुलींचं शिक्षण, लग्न हे डोंगर तिलाही भीतीदायक वाटू लागले.
पण सुरेशने तिची अस्वस्थता ओळखली होती. त्याने स्नेहलला हळूच पाळण्यात ठेवलं आणि तो शिल्पा ताईंच्या समोर जाऊन उभा राहिला.
" वहिनी, मुलगा असो वा मुलगी, ते देण्याघेणाऱ्याच्या हातात नसतं. माझ्या नशिबाने मला दोन परी सारख्या मुली दिल्या आहेत आणि मी त्यात खूप खुश आहे. तुम्ही म्हणताय की मला कष्ट करावे लागतील ? "
" तर हो, मी करीन ! पण माझ्या मुली जन्माला येताना त्यांचं भाग्य सोबत घेऊन आल्या आहेत. मला खात्री आहे, माझी साक्षी आणि ही छोटी स्नेहल एक दिवस असा पराक्रम करतील की या सुरेशचं नाव जगाच्या नकाशावर कोरलं जाईल. मुली ओझं नसतात वहिनी, त्या तर घराचा आधार असतात." सुरेशचे हे शब्द शिल्पा ताईंना एखाद्या चपराक बसल्यासारखे लागले.
" हो हो, बघूया ! बोलायला काय जातंय, जेव्हा शाळेची फी भरायची वेळ येईल आणि लग्नाचे मांडव पडतील तेव्हा कळेल हे मुलींचं भाग्य !" असं म्हणत शिल्पा ताई फणफणत तिथून निघून गेल्या.
खोलीत शांतता पसरली. सुनीता रडत होती. सुरेशने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
" सुनीता, रडू नकोस. आज वहिनी जे बोलल्या, ते या समाजाचं वास्तव आहे. पण आपल्याला हे वास्तव बदलायचं आहे. आपण या दोघींना इतकं शिकवू, इतके चांगले संस्कार देऊ की त्यांना लग्नासाठी कोणासमोर हात पसरायची गरज पडणार नाही. तू शिवणकाम कर, मी कंपनीत ओव्हरटाईम करेन, पण आपल्या मुलींच्या शिक्षणात कमतरता पडू द्यायची नाही."
सुनीताने डोळे पुसले. तिला तिच्या नवऱ्याचा अभिमान वाटला. सुरेश फक्त एक हेल्पर नव्हता, तर तो एक बाप होता, ज्याने आपल्या मुलींच्या पंखांना बळ देण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
त्या रात्री सुरेश कंपनीत कामावर गेला. हेल्परची नोकरी म्हणजे घाम गाळणं आलं. जड लोखंडी सळ्या उचलणं, यंत्रांची स्वच्छता करणं आणि साहेबांच्या आज्ञा पाळणं. पण आज सुरेशला थकवा जाणवत नव्हता. प्रत्येक जड ओझं उचलताना त्याला शिल्पा वहिनींचे ते शब्द आठवत होते,
"दोन मुली म्हणजे आयुष्यभर तेल ओतावे लागणार ! "
"हो, मी तेल ओतेन." सुरेश मनाशीच पुटपुटला.
" पण माझ्या कष्टाचं तेल ओतून मी माझ्या मुलींच्या भविष्याचा दिवा इतका प्रज्वलित करेन की सगळ्यांचे डोळे दिपून जातील."
दुसरीकडे, शिल्पा ताई आपल्या मुलांना, अविनाश आणि सिद्धार्थला, दुध-बदाम भरवत होत्या.
" माझ्या राजांना काही कमी पडायला नको. तुम्ही तर माझे हिरे आहात. त्या सुरेशच्या मुली बघा, कशा फाटक्या कपड्यांत वाढतील. उद्या तुमची लग्नं झाली की तुमची सत्ता असेल या घरावर ! "
त्या मुलांच्या लाडात एवढ्या मग्न होत्या की, त्यांना शिक्षणापेक्षा वारसा जास्त महत्त्वाचा वाटत होता.
सुनीताने त्याच रात्री जुन्या साड्यांमधून साक्षी आणि स्नेहलसाठी छोटी छोटी कुंची आणि दुपटी शिवायला घेतली. तिच्या सुईचा प्रत्येक टाका एका नव्या निश्चयाने पडत होता.
सुनीताने त्याच रात्री जुन्या साड्यांमधून साक्षी आणि स्नेहलसाठी छोटी छोटी कुंची आणि दुपटी शिवायला घेतली. तिच्या सुईचा प्रत्येक टाका एका नव्या निश्चयाने पडत होता.
मध्यमवर्गीय संसाराची ही सुरुवात होती, जिथे एका बाजूला अहंकाराचा माज होता आणि दुसऱ्या बाजूला कष्टाचा साज.
काळ पुढे सरकणार होता, टोमणे वाढणार होते, गरिबीशी युद्ध होणार होतं... पण सुरेश आणि सुनीता नावाच्या त्या दोन जिद्दी जीवांनी मुलींच्या भाग्याचा नवा इतिहास लिहायला सुरुवात केली होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा