Login

लेकुरवाळी पर्स

Purse And Other Stories
"आई, एव्हढं गॉगलचं कव्हर ठेव तुझ्या पर्समध्ये!" चिरंजीवांची आज्ञा झाली अन् तिनं हसून तिचं पालन केलं.

"काय रे हे, जे दिसलं ते आईच्या पर्समध्ये कोंबतोस, लहान आहेस का तू... किती ओझं होईल त्यांना
.. तू तुझ्या बॅकपॅकमध्ये ठेव ना" लाडक्या सुनबाईनी लेकाला डिवचलं.

"मग तुझ्या पर्समध्ये ठेव ना..ह्या... केव्हाढीशी पर्स गं तुझी, एक मोबाईल जेमतेम मावेल त्यात " लेकानं देखील तितक्याच ताकदीने बायकोला झिडकारलं.

"असू दे गं.... काही ओझं बिझं नाही होत मला... मी लेकुरवाळी तशी माझी पर्सही!" मी त्या गोड भांडणाचा निकाल लावला.

खरंच आपल्यासारखी आपली पर्सही लेकुरवाळी असते किनई.... पर्स म्हणजे अगदी जीवाभावाची सखीच जणू!

बरं पर्स ह्या शब्दाची व्याप्ती तरी किती!!! अगदी छोट्या बटव्या पासून, क्लच, फंक्शनल,ऑफिस पर्स, स्लीन्ग बॅग, शबनम बॅग, टोटे बॅग आणि आणखी कितीतरी प्रकार!!आजकाल तर मुलींच्या बॅकपॅकवजा पर्सेस मिळतात.

प्रत्येक प्रसंगाला एक वेगळी पर्स हवीच. शॉपिंगसाठी वेगळी, कुणाच्या घरी जायचं तर वेगळी, लग्नसमारंभासाठी वेगळी, ऑफिससाठी वेगळी तर प्रवासासाठी वेगळी... प्रत्येकवेळी वेगळा आकार, वेगळा प्रकार पण पर्स मात्र हवीच हवी!

स्त्रियांच्या पर्समध्ये काय काय सामावतं ह्याचा विचार तर कुणीच करू शकत नाही. अगदी सेप्टीपिनेपासून तर औषधाच्या गो्लीपर्यंत आणि बाळाच्या लंगोटापासून तर सॅनिटरी पॅडपर्यंत सगळं काही ही पर्स आपल्या पोटात सामावून घेते.

आजकाल पर्स चे ऑर्गनायझर पण मिळतात. म्हणजे ऐनवेळी पर्स बदलायची तर धांदल नको... आणि अमुक इतके कप्पे पर्सला हवेतच असा आग्रह ही नको. ह्या ऑरगॅनायझर मध्ये सामान व्यवस्थित भरायचं आणि ते एका बॅगमध्ये ठेवायचं की झाली पर्स तयार!

त्यामुळे पर्सची डिझाईन आवडलीये पण सामान मावणार नाही हा प्रश्नच मिटला.

देण्याघेण्यासाठी तर पर्स हा एक उत्तम पर्याय आहे. आपण म्हणू त्या किमतीत हव्या त्या प्रकारात पर्सचे कितीतरी पर्याय उपलब्ध असतात. शिवाय वस्तू आहे उपयोगाची हं!

जसं आलेली साडी रंग आवडला नाही, पोत चांगलं नाही, आखूड आहे, अश्या कारणाने वापरणं टाळल्या जातं तो प्रश्न पर्सच्या बाबतीत सहसा उद्भवत नाही.

त्यामुळे मला भेट देण्यासाठी पर्सचा पर्याय नेहमीच आवडतो.

अगदी संक्रांतीच्या वाणापासून ते कार्पोरेट गिफ्टपर्यंत पर्स एकमेवाद्वितीय आहे.

आजकाल मिळणारे प्रवासी पाऊच, छोट्या प्रवासी बॅग्स, एव्हढंच नव्हे तर बाहेरगावी जाताना जास्तीचे पादत्रणाचे जोड ठेवण्यासाठी मिळणाऱ्या छोट्या बॅग्स ही पर्सची चुलत-मावस भावंडेच!

तर अशी ही प्रत्येक स्त्रीच्या जीवाभावाच्या, लेकुरवाळ्या पर्सची कहाणी सुफळ संपूर्ण!!!
0