Login

लिंबाचे टिकाऊ सरबत

व्हिटॅमिन सी.
उन्हाळ्याचा दिवसात लिंबाचे सरबत पिणे शरीराला व मनाला थंडावा देणारे असते.  उन्हाळ्यात लिंब खूप महाग असतात म्हणून मी आज तुम्हाला लिंबाचे टिकाऊ सरबताची रेसिपी सांगणार आहे. ती लिंबाच्या सरबताची रेसिपी तुम्ही लिंब स्वस्त असताना करुन ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. ते सरबत तीन ते चार महिने फ्रीजमध्ये छान राहते. ह्या टिकाऊ सरबतामुळे ऐनवेळी पाहुणे घरी आले की झटपट सरबत तयार होते. तसेच आपली मुले व नवरा पण स्वतःच्या हाताने सरबत बनवून पिऊ शकतात. कट्ट्यावर पसारा न करता.

* लिबांचे टिकाऊ सरबत *

साहित्य : १ कप लिंबाचा रस [ साधारण १२ मोठी रसाची लिंबं ], अडीच कप साखर, ३/४ कप पाणी, चवीनुसार मीठ आणि तुम्हाला आवडत असेलतर सब्जाच्या बीया तुम्ही सरबतामध्ये घालू शकता. सब्जाच्या बीयांमध्ये भरपूर फायबर असते व उन्हाळ्यात ते पाण्यासोबत किंवा सरबतात घालून पिणे खूप फायदेशीर असते.

कृती : १ कप लिंबाचा रस घ्यावा. तो रस गाळणीने
गाळून घ्यावा म्हणजे लिंबाच्या बिया आणि लिंबाचा राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल. अडीच कप साखर आणि ३/४ कप पाणी एका पातेल्यात एकत्र करावे आणि गॅसवर ठेवून त्याचा एकतारी पाक करावा. एकतारी पाक झाला की गॅस बंद करावा आणि पाकात थोडी वेलदोडयाची पूड घालावी  त्याने सरबताला फ्लेवर छान येतो. पाक थंड झाल्यावर तयार पाकात १ कप लिंबाचा रस घालून ५ मिनिटे ढवळावे. नंतर तयार लिंबाचे सरबत काचेच्या बाटलीत भरुन फ्रीजमध्ये ठेवावे. लिंबाचे सरबत जेव्हा बनवायचे असते तेव्हा काचेच्या बरणीतून एक ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घ्यावा, त्यात गार पाणी व बर्फ घालावे आणि मिक्स करावे. हवे असल्यास चवीनुसार मीठ घालून सरबत तयार करावे. सरबतामध्ये सब्जा हवा असेल तर सरबत करण्याच्या आधी पंधरा ते वीस मिनिटे एक चमचा सब्जा एक कप पाण्यात भिजत घालावा. पंधरा ते वीस मिनिटात सब्जा छान फुलून येतो. तो सब्जा तुम्ही सरबतमध्ये घालून पिऊ शकता.