आदरणीय शिवराय,
छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा स्वराज्याचे बीज आपल्या रयतेमध्ये रोवण्याचे जे काम केले, अशा माझ्या महान राजाला कोटी कोटी प्रणाम ! महाराज तुम्हाला असं वाटलं असेल ना की, मी कोण ? तर तुमच्या स्वराज्यातील आधुनिक पिढीतील एक सर्वसामान्य मुलगी. तुमचा इतिहास वाचताना नेहमी अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहतच नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा स्वराज्याचे बीज आपल्या रयतेमध्ये रोवण्याचे जे काम केले, अशा माझ्या महान राजाला कोटी कोटी प्रणाम ! महाराज तुम्हाला असं वाटलं असेल ना की, मी कोण ? तर तुमच्या स्वराज्यातील आधुनिक पिढीतील एक सर्वसामान्य मुलगी. तुमचा इतिहास वाचताना नेहमी अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहतच नाही.
एवढ्या कमी वयामध्ये स्वराज्याची शपथ घेऊन जे स्वप्न पूर्ण केले, हे त्याकाळी सोपे नव्हतेच. त्यासोबतच राजमाता जिजाऊ यांची मिळालेली सोबत त्यातून मिळालेले अनेक धडे, हे आजही आमच्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत. मग सर्वधर्मसमभाव ही भावना असो, जी मावळ्यांची एक सैन्याची तुकडी करत असताना त्यात वंश, धर्म आणि जात, हे न पाहता फक्त स्वराज्यासाठी उभी केलेली, ही मोठी फलटणच होती. जर खरंच आपण आपल्याच लोकांमध्येच एखाद्या विशिष्ट कारणांवरून भांडलो असतो, तर एवढे गड त्यावेळेस जिंकणे शक्य नव्हते. तुमच्या दूरदृष्टीबद्दल तर काय बोलायचं, शत्रू हा कितीही शक्तिशाली आणि मोठा असला तरी सुद्धा तुमच्या या युद्धनीतीमुळे नेहमीच शत्रूला हार मानायला लागली. याच्यामध्ये नियोजनबद्धता कशी असावी, हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे.
कोणत्याही स्थितीमध्ये पळून जाऊ नये,परंतु ज्या वेळेस शत्रूचा वेढा आपल्याला पडलेला आहे आणि त्यावेळेस आपल्याला जिंकणे हे शक्य नाही, असे वाटत असतानाच त्या वेढ्यातून बाहेर पडणे, म्हणजेच दोन पावलं मागे जाऊन पुढे विजयासाठी, अजून दोन पावलं पुढे जायला हवे, ही तुमची जी विचार करण्याची पद्धत होती ही खरच खूप वेगळी होती.
पुरंदरचा तह याच्यामध्ये आपल्याकडील जे किल्ले होते, ते काही द्यावे लागणार होते आणि त्यावेळेस तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल, याचा विचार करणे खूप अवघड आहे; परंतु तुम्हाला स्वतःवर आणि आपल्या मावळ्यांवर खूप विश्वास होता की, आपण ते किल्ले पुन्हा जिंकू शकतो. त्या नकारात्मक स्थितीतूनही सकारात्मक गोष्टींचा जो विचार तुम्ही केला, त्याचे आजतागायत कौतुक वाटते.
आजकाल छोट्याशा गोष्टीवरून किंवा जीवनामध्ये येणाऱ्या संकटांमधून लगेच नैराश्याकडे झुकणारी ही पिढी, त्यांना जर प्रेरणा घ्यायची असेल, तर ती तुमच्याकडून नक्कीच घ्यायला हवी. परस्त्री ही मातेसमान असते, ही तुमची शिकवण आजही समाजाला द्यावी लागते, हे खरंतर समाजाचा दुर्दैव आहे.अत्याचार पीडित मुलीला किंवा स्त्रीला न्याय हा तुमच्या दरबारात मिळतच होता. आता कुठेतरी जी हिंसक वृत्ती आणि वासनेचा डोंब उसळलेला आहे, त्यामुळे कित्येक आपल्या आया-बहिणीमध्ये भीती निर्माण झालेली आहे. तुमच्यावेळी त्यावर कठोर शासन व्हायचे की, ती गोष्ट पुन्हा होऊ नये, याची खबरदारी घेतली जायची. सर्वांमध्ये तुमचा एक दरारा असायचा. आता कुठे लोकांमध्ये भीती दिसतच नाही. स्त्रियांना आपल्या आईभवानी सारखा सन्मान देणे, हे मोठे कार्य तुम्ही तर केले होते, परंतु कुठेतरी आता ते लोकांमध्ये हळूहळू लोप पावायला लागत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही जन्म घ्यावा असं नेहमी वाटते.
अन्याय हा कधी सहन करायचाच नसतो, न्यायासाठी झगडणे, हे किती महत्त्वाचे असते. हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवले. हे किल्ले आपली संपत्ती आहेत,मात्र त्यांचीच आता झालेली दुरावस्था बघून मनाला खूप वाईट वाटते की, किल्ल्यांच्या बांधणीसाठी त्यावेळेस आत्ताच्या प्रमाणे कोणतेच आधुनिक साधन नव्हते; तरी सुद्धा खूप कमी वेळामध्ये विविध किल्ले तुम्ही बांधले होते. समुद्रामध्ये किल्ला बांधणे, हे किती कठीण काम आहे, परंतु ते काम सुद्धा तुम्ही नेटाने पूर्ण केले होते.
तुमची देवावर श्रद्धा तर होती, परंतु कर्मावर सुद्धा तुमचा जास्त विश्वास होता. या पत्राद्वारे तुमच्याशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न केला आहे. " छत्रपती शिवाजी महाराज की जय.",या घोषणेने माझं पत्र पूर्ण करत आहे.
एक शिवकन्या,
विद्या कुंभार.
विद्या कुंभार.
प्रस्तुत पत्र हे स्वलिखित असून लेखिकेकडे त्याचे अधिकार आहेत, त्यामुळे कॉपी अथवा इतरत्र पोस्ट करू नये. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा