छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र
|| श्री ||
कामिनी सुरेश खाने
अ/६, शिवकृपा सोसायटी,
एम. जी. रोड,
रायगड ४१०२२२
दिनांक - १९ फेब्रुवारी २०२५
अ/६, शिवकृपा सोसायटी,
एम. जी. रोड,
रायगड ४१०२२२
दिनांक - १९ फेब्रुवारी २०२५
आदरणीय महाराज,
सा. न. वि. वि.
सा. न. वि. वि.
सर्वात आधी तर तुम्हाला मानाचा मुजरा! मी या स्वराज्यातील एक साधारणशी मुलगी. प्रत्यक्षात तुम्हाला भेटणं तर नशिबात नाही; पण कधी नव्हे ते आज पत्राच्या माध्यमातून तुमच्यासोबत बोलण्याची संधी मिळत आहे, हेही नशिबाहून कमी नाही.
छत्रपती! हा एक शब्द उच्चारला तरी ऊर अभिमानाने भरून येतो. का येऊ नये? तुम्ही आमच्यासाठी जे काही केलंत, त्यानंतर आम्हाला तुमचा अभिमान वाटायलाच हवा ना! तो नाही वाटला, तर आम्हाला स्वतःच्याच नजरेला नजर मिळवायलाही लाज वाटेल. तुम्ही होतात म्हणून आज आम्ही आहोत, हे वाक्य जे सारी रयत बोलते ते काही उगीच नाही. तुमचं स्थान कायम सर्वोच्च आणि अबाधितच राहील, यात काही शंकाच नाही. मात्र माझ्या मनात काही विचार घोळत राहतात. आता ते बरोबर की चुकीचे हे तुम्हीच सांगा.
तुमचं स्थान कायम राखलं जाईल, ही बाब खरीच आहे; पण माझ्या मनातील विचारांची गर्दी मला काही वेगळंच सुचवू पाहते. म्हणजे बघा ना, तुमचं स्थान काय आहे हे सांगणारे लोक तर आज भरपूर आहेत; पण या सगळ्यात अगदी मनापासून तुमचा किंवा तुमच्या विचारांचा विचार कोण करतं? आज तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात यात काही शंकाच नाहीये; पण आदर्श मानतो हे बोलणं आणि प्रत्यक्षात तसं वागणं, यात फरक असतोच ना! बाकी कोणाचं तर ठाऊक नाही; पण मला तरी या वागण्या बोलण्यात कमालीची तफावत जाणवते.
खरं सांगू, शिवजयंती किंवा राज्याभिषेक सोहळा यांसारख्या दिवशी लहानथोरांचा उत्साह पाहून माझ्याही मनाला अर्थातच चांगलंच वाटतं. तरीही या सगळ्यात अचानक जाणीव होते की हे सर्व तर फक्त आजच्याच दिवसासाठी आहे ना! ते जे उत्साहाचं उधाण आलेलं असतं ते दुसऱ्या दिवशीपासून तर पार रसातळाला गेलेलं असणार. बरं आणि उत्साह तरी काय असतो? पारंपरिक पद्धतीने तयारी करून मिरवणं आणि त्या शोभेला समाज माध्यमांवर सजवणं! वर्षभरात इतर दिवशीही कपाळी चंद्रकोर असलेलेच काय ते खरे मावळे किंवा शिवकन्या, शिवरायांसारखी दाढी वाढवून फिरणारे ते शिवभक्त, गाड्या किंवा इतर मालमत्तेवर राजेंच्या नावाचा वापर, हे आणि असं किती कायकाय सुरू असतं. खरं सांगा राजे, तुम्ही या नावाचे आणि शोभेचे भुकेले आहात? मला तर असं वाटत नाही.
राजे, तुम्ही स्वराज्य निर्माण केलंत ते या अशा शोभेच्या मिरवणुकीसाठी नव्हे, तर तुमच्या विचारांचा प्रभाव आम्हा रयतेवर कायमस्वरूपी दिसून यावा म्हणून ना. आज रयत काय करत आहे? मी राजेंना मानतो असं बोलून सरळसरळ रोजच्या वागण्यात त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने वळत आहे. हे कसं सहन होईल?
फार काही न बोलता आता निरोप घेते. तुमच्या या रयतेला तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे याचा साक्षात्कार करून देता आला तर तेवढं पहा.
आपली आज्ञाधारक,
कामिनी खाने
कामिनी खाने
© कामिनी सुरेश खाने
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा