वडिलांना पत्र

On Father's Day
प्रिय पप्पा,

कसे आहात? मजेत असाल अशी आशा करते. आम्ही सगळे कसे आहोत, हे तर तुम्हाला सगळंच ठाऊक असेल. तुम्ही आम्हाला बघू शकता, पण आम्ही तुम्हाला बघू शकत नाही. आज फादर्स डे असल्याने सकाळपासून तुम्हाला पत्र लिहायचं म्हणतेय पण भावनेच्या भरात शब्दच सुचत नाहीयेत.
पप्पा, तुम्हाला जाऊन तीन वर्षे होऊन गेलेत, पण अजूनही तुम्ही गेले तो दिवस डोळ्यासमोरून जात नाही. बऱ्याच वेळेस तुम्ही आजूबाजूला आहात असच वाटत राहतं. तुम्ही इतक्या लवकर जायला नको होतं, पण असो देवाची तीच मर्जी असेल.
तुम्ही गेल्यावर सगळंच काही विखुरलं होतं. या गेल्या तीन वर्षांत आम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी सगळं काही सावरण्याचा प्रयत्न केला. तुम्ही अर्धवट सोडलेली प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या आशिर्वादाने त्यात बऱ्यापैकी यश आलं.
या वर्षी तर आपल्या घरात एक सोडून दोन मंगलकार्य घडली, त्यात तुमची कमी प्रामुख्याने जाणवली.
माझ्यासाठी तुम्ही मुलगा शोधावा ही माझी सुरुवातीपासूनची इच्छा होती, पण तुम्ही अचानक निघून गेलात. विशेष म्हणजे तुमची मुलगी या ओळखीनेच माझं लग्न जमलं, याचा सगळ्यात जास्त आनंद मला झाला.
लग्न जमवाजमवी मध्ये मी तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही असता तर बऱ्याच गोष्टी सहज व सोप्या झाल्या असत्या. साखरपुड्यातील फॅमिली फोटो काढताना तुमचा फोटो हातात धरून हात थरथरत होते, डोळे भरून आले होते. आपल्या महत्त्वाच्या क्षणी आपले पप्पा हजर नाहीत हे खूप वेदनादायक होत.
आपलं कन्यादान आपल्या वडिलांनी करावं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, पण माझं ते स्वप्न स्वप्नच राहिलं. कन्यादानाचा क्षण माझ्यासाठी खूप कठीण गेला. लग्नाच्या दिवशी घरातून निघताना तुमच्या फोटोच्या पाया पडत असतानाही मला खूप भरून आलं होतं. माझ्या आयुष्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणी माझ्यासोबत माझे पप्पा नव्हते.
तुमची मान खाली जाईल अस याआधी कधी वागले नाही आणि यापुढेही वागणार नाही. आयुष्यात संकटं तर येत आहेत, पण त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या संघर्षमय आयुष्याचा प्रवास डोळ्यासमोर ठेवून संकटांना हसून सामोरे जात आहे.
सध्या माझ्या आयुष्यात काय सुरू आहे, हे सगळं तुम्हाला ठाऊक आहेच. काही प्रश्न सोडवत आहे, ती सोडवताना तुम्ही सोबत असता तर सगळं सहज सोपं झालं असत किंवा ते प्रश्न तुम्ही माझ्या समोर उभे राहूच दिले नसते. अशावेळी तुमची खूप आठवण येते.
पप्पा, तुमच्याकडे खूप संयम होता. कितीही संकटं आले तरी तुम्ही कधीच हतबल झाला नाहीत, हेच लक्षात ठेवून मीही संयम ठेवून बऱ्याच गोष्टी आता वेळेवर सोडून दिल्या आहेत. या सगळ्यात मला तुमचा आशिर्वाद आवश्यक आहे.
एक मात्र खरं आहे की, वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. वडील नावाचे छप्पर प्रत्येकाला असावे.
अक्षयच्या लग्नातही तुमची खूप आठवण झाली. तुम्ही नसल्याने आपला फॅमिली फोटो अपूर्ण वाटतो. तुम्ही गेल्यापासून आईने तुमचा रोल निभावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तुम्ही तिकडे एकटे आहात तुमची काळजी घ्यायला कोणीच नाही. आम्ही इकडे सगळेजण एकमेकांची काळजी घेत आहोत.
आमच्यात कितीही मतभेद झाले तरी आम्ही बहीण-भाऊ एकमेकांचा हात सोडत नाही आणि सोडणार पण नाही. आपलं कुटुंब हे असंच अभेद्य राहील.
पत्राचा शेवट करताना एवढंच सांगेल की, तुमच्या या मुलीची स्वप्नं खूप मोठी आहेत, ती पूर्ण करण्यासाठी मी कष्ट करत आहेच, त्यात यश मिळेल हा आशीर्वाद मला द्या.
तुमची मुलगी,
सुप्रिया

©®Dr Supriya Dighe