इंदिरा गांधी यांना पत्र
||| श्री ||
विद्या कुंभार
ब/५, वृंदावन अपार्टमेंट
व्ही. एच. रोड,
मुंबई ४०००००
दिनांक - १९ नोव्हेंबर २०२४
ब/५, वृंदावन अपार्टमेंट
व्ही. एच. रोड,
मुंबई ४०००००
दिनांक - १९ नोव्हेंबर २०२४
आदरणीय इंदिराजी,
सा. न. वि. वि.
तुमच्या सारख्या कणखर व्यक्तिमत्त्व असलेल्या स्त्रीला माझा मानाचा मुजरा. पत्र लिहिण्यास कारण असे की, आज तुमचा वाढदिवस त्यासाठी खूप शुभेच्छा आणि शाळेत असताना 'पिता के पत्र' ह्या पुस्तकाचा मराठीत अनुवाद असलेले पुस्तक मी शाळेच्या ग्रंथालयातून नियमानुसार माझ्या नावावर एका आठवड्यासाठी वाचण्यास निवडले होते त्याबद्दल सांगायचे होते. खर तर विविध कथा वाचणारी मी पहिल्यांदाच पत्रांचा संग्रह असलेले हे पुस्तक वाचत होते. ३० पत्रातून तुमचे आणि तुमच्या वडिलांचे नाते किती घनिष्ठ होते हे त्यातून उमगले. शक्यतो पत्रात खुशाली कळवतात,पण तुमच्या पत्रात तुमचे वडील दूर असूनही अमूल्य असे कधी पृथ्वीबद्दलचे ज्ञान तर कधी विविध विषयांवर माहिती देणारे एक शिक्षकच भासत होते. जणू तुमच्या दोघांचा प्रत्यक्ष समोर होणारा संवाद आहे असेच वाचतांना वाटत होते. त्यावेळेस तुमचे वय लहान असूनही तुमची जिज्ञासू वृत्ती आणि आपले वडील महत्त्वाच्या कामासाठी म्हणजेच देशासाठी आपल्यापासून दूर आहेत ह्याची समज तुम्हाला त्या वयात होती, ह्याचे विशेष वाटते.
तुम्ही राजकारणी तर होताच पण त्या आधी एक आज्ञाधारक मुलगी होता. प्रत्येक गोष्टींचे बारकावे आणि निरीक्षण करण्याचा स्वभाव अनेक धाडसी निर्णय घेण्यात नक्कीच कामी आला असेल, हे तुमच्याबद्दल जाणून घेताना समजले. तुमचा अंतराळवीर राकेश शर्मा ह्यांच्याशी संवाद साधतानाचा कृष्ण-धवल असलेला व्हिडिओ आणि त्यातून त्यांनी दिलेले 'सारे जहासे अच्छा' हे उत्तर ऐकताना अंगावर काटाच आला.
असे म्हणतात वारसा हक्काने मिळालेले यश किंवा एखादे पद हे सहज मिळालेले असते, पण तुम्ही कधीही तुमच्यात त्याची पात्रता नव्हती असे कृतीतून दाखवलेच नाही. कारण वारसा हक्काने जरी मिळाले तरी ते पुढे चालवण्यासाठी आणि सोपवलेल्या जबाबदारीचे शिवधनुष्य त्या काळात एका स्त्रीने पुरुषांच्या बरोबरीने उचलणे वाटते तितके सोपे नव्हते.
आजही स्त्री शिक्षणामुळे तिच्या कर्तृत्त्वाने पुढे जात असताना तुमच्या सारख्या पोलादी स्त्रीचा इतिहास नक्कीच समोर ठेवून पुढे चालत आहे. युद्ध काळात आणि त्यावेळी राखलेला संयम आणि तुमची स्त्रीवादी भाषणे आजही प्रेरणादायी आहेत.
तुमच्या प्रखरतेने आपले मुद्दे मांडण्याची वृत्ती तसेच प्रसंगावधान राखून घेतलेले देशहिताचे निर्णय आणि स्वातंत्र्यसंग्रामात असलेला सहभाग ह्याची माहिती वाचतांना सर्व नजरेसमोर येते. कोणतेही काम करण्याची इच्छा असावी लागते आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला वेळ आणि श्रम त्यासाठी खर्ची घालावा लागतो हाच बोध तुम्ही जणू तुमच्या कार्यातून सांगितला.
ह्या पत्राद्वारे एवढेच सांगण्याचा हेतू की, एक स्त्री तिला संधी दिल्यास काहीही करू शकते. ह्याचे एकमेव उदाहरण म्हणून आजही आम्ही तुम्हाला पाहतो. तुमच्याशी भेटण्याचा योग आला नाही पण ह्यातून माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
आपली कृपाभिषाली,
विद्या कुंभार
विद्या कुंभार
(प्रस्तुत पत्रातील पत्ता हा काल्पनिक म्हणून लिहिला आहे साम्य आढळल्यास योगायोग आहे असे समजावे.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा