अवकाळी पावसास पत्र
|| श्री ||
अ.ब.क
ब/५, वृंदावन अपार्टमेंट
व्ही. एच. रोड,
मुंबई ४०००००
दिनांक - १ एप्रिल २०२०५
अ.ब.क
ब/५, वृंदावन अपार्टमेंट
व्ही. एच. रोड,
मुंबई ४०००००
दिनांक - १ एप्रिल २०२०५
आदरणीय पावसा,
स. न. वि. वि.
स. न. वि. वि.
काय खळबळ माजवलीस रे, खरचं विश्वासचं बसत नाहीये. म्हणजे सर्व तुझी आठवण उन्हाळ्यानंतर काढतात आणि तू तर अचानकच आलास. आलास ते आलास आणि किती जोरात बरसत होतास. अवकाळी नाही तर अवखळ आहेस तू. तुला खूप आनंद झाला असेल ना असे पडून पण आमच्या शेतकरी राजाची तुला थोडी पण दया नाही आली का रे? पूर्ण जगाचा तो पोशिंदा आणि फक्त तुझ्यापुढेच त्याने हात टेकले. त्याचा तो चिंतातुर झालेला चेहरा आणि पीक येण्यासाठी घेतलेले कर्ज पाहून खूप वाईट वाटले. त्याच्यासाठी त्याचे पीक हे फक्त पैशाचे साधन नाहीये, स्वतः च्या पोरावानी तो त्याची काळजी घेतो. आता तुझ्या ह्या अवेळी पावसाने त्याची मेहनत वाया गेली. तू तरी त्या निष्पाप असलेल्या शेतकऱ्याचे पुन्हा नुकसान करू नकोस.
फक्त शेतकऱ्याचेच नाही बरं का, तर काल होणाऱ्या गावच्या जत्रेलाही त्याचा फटका बसला. वर्षभर ह्या जत्रेसाठी सगळे वाट पाहत असतात. शहरातली माणसे पण सुट्ट्या टाकून त्यानिमित्ताने गावी येतात. तसेच काही स्थानिक व्यापारी ह्या जत्रेत होणाऱ्या खरेदी-विक्रीमुळे लांबच्या गावाहून एक आशा घेवून इथे येतात, पण तू तर त्यांच्या पोटावर पण लाथ मारल्यासारखे केलेस. कितीही त्यांचा विक्रीचा माल झाकून ठेवला तरी तो थोडातरी भिजलाच. आधीच मालाला योग्य भाव मिळत नाही, त्यात आता असा खराब झालेला माल कोण घेईल सांग ना?
तसेच विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातही तू येण्याने तिथली माती वाहून गेली आणि खेळाचे मैदान पाण्याचे मैदान झाले. पूर्ण वर्षभर सराव करून त्या सर्व खेळाडूंनी ह्या दिवसाचे स्वप्न पाहिले होते. क्षणात त्यावर तुझ्या आगमनाने पाणी फिरले. त्यांची हिरमुसलेली मने आणि तुझ्यापुढे हारलेले पाहून त्यांच्या काळजाला किती जखमा झाल्या असतील ह्याचे मोजमापच नाही.
त्यामुळे पुढच्यावेळी असा अचानक येताना थोडा विचार करशील का ? तू फक्त वर्षा ऋतूत येतोस ना तेव्हाच खूप आनंद देवून जातोस. वेळेत पडणारा पाऊस सर्वांना आवडतो पण असा मध्येच कधीही दर्शन देणारा फक्त दुःख देवून जातो. त्यामुळे सर्वांच्या आनंदाचे कारण तू बनावेस असे वाटते.
तू म्हणशील की पर्यावरणाचे बदलते चक्र ह्यास कारणीभूत आहे, तेही मान्य आहे. आता जनजागृती सारेच करत आहेत. काही लोक पुढे येऊन वृक्ष लागवड करत आहेत प्रदूषण करणारे आम्हीच, आता जागे झालोय पण तुझीही थोडी साथ आम्हाला हवीच. मग देशील ना साथ? पावसावर प्रेम करणेच शोभते तक्रार आणि तिरस्कार नाही.
आशा आहे मला जे म्हणायचे आहे, ते तू समजून घेशील.
अवकाळी पावसाला त्रासलेली,
क.ख.ग
क.ख.ग
© विद्या कुंभार
सदर पत्राचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे कॉपी करून इतर ठिकाणी पोस्ट केल्यास कारवाई करण्यात येईल.
फोटो सौजन्य साभार गुगल/मेटा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा