बघता बघता अविच्या लग्नाला दोन-तीन वर्ष होऊन गेली होती. ह्या काळात तो एकदाही भारतात आला नव्हता आणि काका-काकूही अमेरिकेला गेले नव्हते. डेझीला आणि त्याला नुकताच मुलगा ही झाला होता.. जय (jay) नाव ठेवलं होतं त्याचं. डेझीला दिवस गेले असताना अविने काकूंना फोनवर सांगितलं तेव्हा काकू खूप खुश झाल्या होत्या. त्या नवीन जिवाच्या येण्याने त्यांच्यामधलं सगळं अंतर दूर होईल असं त्यांना वाटत होतं. मागचं सगळं विसरून त्या नातवाचं स्वागत करायला तयार होत्या. कितीतरी वेळा त्यांनी अविला तिकडे येण्याबद्दल विचारलं, "अरे अवि, तुम्हाला दोघांना यातला काही अनुभव नाही. आम्ही असू तर मदत होईल. या काळात चांगलं पौष्टिक खायचं असतं. मी डेझी ला करून घालीन की खायला. नाहीतरी तुमच्या लग्नाला आता तीन वर्ष होऊन गेली तरी आम्ही तिला भेटलोही नाही आहोत", अविशी फोन वर बोलताना काकू म्हणाल्या.
"अगं आई, इकडे सगळं वेगळं असतं गं. डॉक्टर्स सगळा आहार लिहून देतात त्याप्रमाणेच खावं लागतं. आणि डेझी चे मॉम-डॅड आहेत की इकडे. ते जवळंच राहतात. तुम्ही कशाला तेवढ्याकरता एवढ्या लांबून येताय. आणि डेझीला सवय नाहीये ना तुमची, उगाच तुम्ही इकडे आल्यावर तिला अवघडल्यासारखं नको व्हायला. या परिस्थितीत तिला अजून काही त्रास नको", पलीकडून अवि म्हणाला. त्याच्या बोलण्याने काकुंना वाईट वाटलं. स्वतःच्या आई वडिलांमुळे काय अडचण होणार आहे ह्याला? पण नातवाच्या यायच्या चाहुलीने त्या इतक्या खुश होत्या की त्यांनी फार मनाला लावून नाही घेतलं.
पुढे जयचा जन्म झाला, तेव्हाही अविने काका काकूंना अमेरिकेला बोलावलं नाही. त्यांना फोटोमधूनच नातवाला आशिर्वाद देऊन समाधान मानावं लागलं होतं. मुलाच्या विरहाने काकू खचत चालल्या होत्या. काका दाखवत नसले तरी त्यांनाही मनातून आपल्या मुलाचं वागणं खटकत होतंच. अमेरिकेला जाताना काका काकूंना तिकडे न्यायचा किती उत्साह होता अविला. आणि आता त्यांनी विचारूनही तो त्यांना तिकडे न्यायचा विषय काढत नव्हता. त्याचे फोन येणंही कमी झालं होतं आणि पत्र येणं तर बंदच झालं होतं. जय अमेरिकेत मोठा होत होता पण त्याचे बोबडं बोलणं, गोड हसणं, घरभर दुडू दुडू धावणं ह्यातलं काहीच काका काकूंच्या नशिबात नव्हतं. मीराला त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं.
गेल्या काही वर्षात तिचा कामात खूपच छान जम बसला होता. इतका की काकांचे काही अशील आता खास मीराने त्यांच्या केसवर काम करावं म्हणून विनंती करायचे. त्याने काकांना फार बरं वाटायचं, हळूहळू त्यांनी मीरावर बरीच जबाबदारी टाकून आपला जास्तीत जास्त वेळ काकूंबरोबर घालवायला सुरवात केली होती. मीरा रात्री घरी आली की त्यांच्या स्टडी मध्ये दिवसभराच्या कामाची चर्चा त्यांच्याबरोबर करायची. ऑफिसबरोबर 'वात्सल्य' आश्रमाची जबाबदारी पण तिने छान सांभाळली होती. तिने आश्रमात मुलांच्या शालेय व्यतिरिक्त शिक्षणाचे वर्ग चालू केले होते. नृत्य, गायन, अभिनय, चित्रकला अशा बऱ्याच वर्गांचा त्यात समावेश होता. एक छोटंसं वाचनालय पण तिने चालू केलं होतं. तिकडे ती स्वतः मुलांबरोबर बसून वेगळी वेगळी पुस्तकं वाचायची.. त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून. अवि आणि तिचं नातं तिने मनाच्या एका कोपऱ्यात बंद केलं होतं. त्या कोपऱ्यात कोणालाच प्रवेश नव्हता.. अगदी तिलाही नाही. पण अविनंतर मीराने दुसऱ्या कोणांवर प्रेम केलं नव्हतं. म्हणजे तसं तिने ठरवलं नव्हतं, पण तिच्या पोळलेल्या मनावर सुखाची फुंकर घालेल असं कोणी अजून तिला भेटलंच नव्हतं.
काकूंना मीराच्या लग्नाची चिंता होती. तिचं लग्नाचं वय निघून जातंय असं त्यांना वाटत होतं. अविच्या लग्नाला ५-६ वर्ष होऊन गेली होती. तो त्याच्या आयुष्यात खुश होता, (म्हणजे असावा, कारण गेल्या काही महिन्यात त्याची पत्र आणि फोन दोन्ही बंद झाले होते). त्यांच्या लग्नाला काका काकूंनी केलेला विरोध आणि मीराशी अविचं लग्नाआधी असलेलं नातं या दोन्ही गोष्टींमुळे डेझीला त्याचं घरच्यांशी बोलणं आवडत नाही असं त्याने त्याच्या शेवटच्या पत्रात सांगितलं होतं. त्याच्या त्या पत्रानंतर काका काकूंची त्यांच्या नातवंडांना भेटण्याची उरली सुरली आशाही संपली होती. आता त्यांचं सगळं आयुष्य मीरा भोवतीच होतं. आणि तेव्हाच त्यांच्यावर काळाचा आघात झाला. एक दिवस मीरा रात्री काकांशी एका केस वर चर्चा करत होती. घशाला कोरड पडली म्हणून काका पाणी प्यायला स्वयंपाकघरात जात असताना दरवाजातच कोसळले. मीराने धावत जाऊन त्यांना आधार देऊन खुर्चीवर बसवलं आणि लगेच डॉक्टरांनी फोन केला. पण ते येईपर्यंत काका गेले होते.
काकांच्या जाण्याने काकू पुरत्या खचून गेल्या होत्या. त्यांनी अविला फोनकरून कळवलं तेव्हा त्याने भारतात यायला चक्क नकार दिला. तेव्हा सगळी क्रियाकर्म, सोपस्कार मीरानेच पुढाकार घेऊन केलं. काकूंना घरी एकटं सोडणं शक्य नव्हतं, त्यामुळे पुढचे अनेक दिवस मीरा घरूनच काम करत होती. अविच्या वागण्याचा तिला मनातून संताप होत होता. कोणी एवढं कसं बदलू शकतं? स्वतःच्या वडिलांच्या अंत्य दर्शनासाठी ह्याला येता येऊ नये? आणि ते ही बायकोला आवडत नाही म्हणून? मुलगा म्हणून काहीतरी कर्तव्य आहे की नाही? बरं येता नाही आलं, पण फोनकरून आईची चौकशी करावी, तिला थोडेदिवस तिकडे घेऊन जावं असंही वाटू नये ह्याला? पण तिने हे सगळे विचार बाजूला सारले. अवि नसला म्हणून काय झालं, मी तर आहे ना. मी घेईन काळजी काकूंची.
काकू थोड्या सावरल्यावर मीरा पुन्हा ऑफिसला जायला लागली. या काळात आश्रमाकडे तिचं खूपच दुर्लक्ष झालं होतं. पण ती एकटी तरी किती ठिकाणी पुरी पडणार. फोनवरून जरी ती आश्रमातल्या व्यवहारांचा, गरजांचा आढावा घेत असली तरी ती लहान मुलं तिची खूप आठवण काढत होती असं तिला उमा काकू (आश्रमात काम करणाऱ्या) सांगायच्या. म्हणूनच जशा काकू सावरल्या, मीराने रविवारी आश्रमात जाऊन सगळ्यांना सरप्राईज द्यायचं ठरवलं.
रविवारी सकाळी आवरून मीरा आश्रमात पोचली तेव्हा तिकडे एकदम शांतता होती. "सगळे गेलेत कुठे? परी? निहार? अजिंक्य ", मीराने हाक मारली पण काहीच उत्तर नाही आलं. तेवढ्यात उमा काकू बाहेर आल्या. "मीरा तू? कशी आहेस गं? आणि शकुंतला ताई कशा आहेत?", तिच्याजवळ येत त्या म्हणाल्या.
"मी बरी आहे काकू. आणि काकू पण हळूहळू सावरतायत. थोडा वेळ लागतोच ना अशा गोष्टीतून बाहेर यायला. पण आपले सगळे उद्योगवीर कुठे आहेत. कोणीच दिसत नाहीये. मी इकडॆ त्यांना सरप्राईज द्यायला आले अन सगळे गायब?", मीराची नजर अजूनही मुलांना शोधत होती.
"अगं त्यांची आज पिकनिक आहे आपल्या सारस बागेत. येतीलच एव्हाना", उमा काकू म्हणाल्या.
"पिकनिक? पण कोणाबरोबर?", मीराने न कळून विचारलं. उमा काकू पुढे काही बोलणार तेवढ्यात मुलांच्या आवाजाने दोघींचं लक्ष तिकडे गेलं. इतके दिवसांनी मीराला पाहून सगळी मुलं धावत तिच्याकडे आली. त्यांचं ते प्रेम आणि आनंद बघून मीराचं मन भरून आलं. तेवढ्यात मीराच्या लक्षात आलं परी कुठे दिसत नाहीये. "निहार, परी कुठेय?", तिने ७ वर्षाच्या निहारला विचारलं. त्याने आसपास बघितलं आणि खांदे उडवून तो पुन्हा मीराने आणलेल्या खाऊवर ताव मारण्यात मग्न झाला. मीराला आता टेन्शन यायला लागलं होतं, ती परीला शोधायला बाहेर जायला निघणार तेवढ्या आश्रमाच्या फाटकातून तिला परी आत येताना दिसली. तिने धावत जाऊन तिला मिठी मारली. तिच्याबाजूला उभ्या असणाऱ्या माणसाकडे बघून मीराची काळजी अजूनच वाढली. परी कुठल्या अनोळखी माणसाबरोबर आली आहे?
"तुम्ही कोण? आणि परी तुमच्याबरोबर कशी आली?", मीराने परीबरोबर आलेल्या माणसाला विचारलं.
"अगं मीरा, मुलं यांच्याबरोबरच गेली होती बागेत", उमा काकू मीराला म्हणाल्या.
"अच्छा, म्हणजे तुम्ही घेऊन गेला होतात मुलांना. एक तर एवढ्या सगळ्या मुलांना तुम्ही एकटे सांभाळू शकाल असं वाटलं कसं तुम्हाला? कोणी हरवलं असतं, कोणाला काही झालं असतं म्हणजे? लहान आहेत हो ही मुलं. आणि माझी परी, ती तर बिचारी एवढीशी पोर, चांगलं वाईट तिला कळत नाही, कुठे हरवली असती म्हणजे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आहात कोण? कोणाच्या परवानगीने मुलांना बाहेर घेऊन गेलात", मीरा रागाने बोलत होती. परीच्या काळजीने आणि ह्या अनोळखी इसमावरच्या रागाने तिच्या डोळ्यांतून पाणी येत होतं.
"तू नक्कीच यांची मीरा ताई असणार. ही मुलं म्हणतात अगदी तशीच आहेस हां तू", परी बरोबर आलेला तो माणूस हसून बोलला. मीरा त्याच्या बिनधास्तपणाकडे त्रासून पहातच राहिली, 'कोण आहे हा?'
"सॉरी, माझी ओळख करून द्यायला विसरलो. हाय, मी विराज मोहिते", विराज हात पुढे करत म्हणाला.
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा