"सॉरी, माझी ओळख करून द्यायला विसरलो. हाय, मी विराज मोहिते", विराज हात पुढे करत म्हणाला.
मीराला अजूनही तिच्या समोर उभा असलेला माणूस कोण आहे कळत नव्हतं. ती गोंधळून त्याच्या पुढे काही बोलायची वाट बघत होती. तेवढ्यात उमा काकू बोलल्या, "अगं मीरा, विराज मागच्या महिन्यापासून आश्रमात यायला लागलाय. नुकताच पुण्याला शिफ्ट झालाय. मी तुला पेपर्स पण पाठवले होते की सही साठी. आपण सगळे बॅकग्राऊंड चेक केले आहेत". त्यांचं बोलणं ऐकून मीराला एकदम आठवलं. काका गेल्यावर काही आठवडे तिला आश्रमात येत आलं नव्हतं त्यामुळे विराज आश्रमात यायला लागल्याचं तिला माहित नव्हतं.
"अच्छा आत्ता आठवलं मला. नाही म्हणजे मला आनंदच आहे तुम्ही या आश्रमासाठी काम करताय त्याचा मि. मोहिते, पण इकडचे काही नियम आहेत ते तुम्हाला कोणी सांगितले आहेत का? तुम्ही अजून या शहरात नवीन आहेत, या मुलांबद्दल तुम्हाला जास्त काही माहित नाही, फक्त महिन्याच्या ओळखीवर तुम्ही एवढ्या सगळ्या मुलांना एकत्र बागेत घेऊन गेलात. तुम्हाला कळतंय का हे किती रिस्की आहे?", मीरा ला अजूनही विराजचं मुलांना बाहेर घेऊन जाणं पटलं नव्हतं. पण तिला आजचा दिवस मुलांबरोबर घालवायचा होता, म्हणूनच विराज काही बोलायच्या आधीच ती आत निघून गेली. विराजही तिच्या मागोमाग आत गेला.
दिवस कसा निघून गेला मीराला कळलंही नाही. मुलांना गोष्टी वाचून दाखवताना, त्यांच्याबरोबर खेळताना ती तिचा मागच्या काही दिवसांचा तणाव पूर्णपणे विसरून गेली. रात्री मुलं जेऊन झोपायला गेल्यावर ती आश्रमातून निघाली. काकूंसाठी कचोऱ्या घ्यायच्या म्हणून ती समोर 'योगेश्वरी' मध्ये गेली. तेवढ्यात तिला मागून ओळखीचा आवाज ऐकू आला, "मीरा?". मागे विराज उभा होता.
"मि.मोहिते? तुम्ही अजून इकडेच?", मीरा त्याच्याकडे बघत म्हणाली.
"अगं, मी आश्रमातच होतो, तू बघितलं नाहीस का मला? आपण एकत्रच तर खेळत बसलो होतो मुलांशी?", विराज दुकानदाराच्या हातून कचोऱ्या घेत म्हणाला.
"नाही.. लक्ष नाही गेलं माझं. मुलांमध्ये बिझी होते ना मी. त्यांच्याबरोबर असताना लक्ष विचलित होऊन चालत नाही. लहान आहेत ती अजून", मीरा सकाळच्या प्रकारासाठी विराजला टोमणा मारत म्हणाली. तेवढ्यात दुकानदाराने तिच्याही कचोऱ्या आणून दिल्या.
"चला निघते मी", म्हणून मीरा तिकडून निघाली. मीरा रिक्षाची वाट बघत असताना विराज बाईकवर तिच्यासमोर येऊन थांबला, आपलं हेल्मेट काढून पुढयात ठेऊन तो म्हणाला, "परीला थंड चालत नाही, तिला टॉन्सिल्स चा त्रास आहे. निहार ला भेळ आवडते पण तिखट नाही. त्याला गर्दीत गेल्यावर भीती वाटते म्हणून अजिंक्य कायम त्याच्याबरोबर असतो. अजून सांगू का एवढं बास?",विराज मीराकडे पहात होता. एवढ्या कमी वेळात त्याला मुलांबद्दल एवढं माहिती आहे हे बघून मीराला आश्चर्य वाटलं. काय बोलावं तिला सुचेना.
"मीरा आय थिंक आपली ओळख जरा चुकीच्या पद्धतीने झाली आहे. अगं मी पुण्यात लहानाचा मोठा झालोय त्यामुळे इकडचा कोपरा न कोपरा मला माहित आहे. मी एकटा नव्हतो घेऊन गेलो मुलांना, आपल्या आश्रमातले सदा काका आणि अनिता माझ्याबरोबर आलेले. आणि तुला कदाचित आठवत नसेल, पण मी गेली १० वर्ष वेगवेगळ्या अनाथ आश्रमांमध्ये काम केलं आहे. आधी शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी पुण्यातून बाहेर होतो. पण आता परत पुण्यात शिफ्ट झालोय. गेली कित्येक वर्ष मला सुट्टीच्या दिवशी समाजसेवा.. हा शब्द मला खरं तर आवडत नाही. यात सेवा काय, कर्तव्यच आहे ते आपलं.. म्हणूनच मी 'वात्सल्य' ला यायला सुरुवात केली", विराज हेल्मेटमुळे विस्कटलेले केस नीट करत म्हणाला.
आता मात्र मीराला तिच्या सकाळच्या वागण्याचं वाईट वाटलं. ती काही बोलणार तेवढ्यात एक रिक्षा तिच्यासमोर येऊन थांबली. "घ्या मॅडम, तुमची रिक्षा पण आली. आय होप तुझा सकाळचा राग गेला असेल. भेटूच पुन्हा, गुड नाईट!", म्हणून विराज त्याच्या वाटेला निघून गेला आणि मीरा तिच्या.
मीरा घरी आली तेव्हा काकू कुठलातरी जुना सिनेमा बघत बसल्या होत्या. "आलीस का गं मीरा, कशी आहेत मुलं. माझ्यामुळे त्यांना इतके दिवस त्यांच्या मीरा ताईला भेटता नाही आलं. खुश झाली असतील ना तुला बघून. चल जेवून घेऊ आता, उशीर झालाय ना", म्हणून काकू उठून जेवणाची तयारी करायला गेल्या. जेवून मीरा आपल्या खोलीत आली, आणि नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत बसली. पण सकाळचा प्रसंग तिच्या डोक्यातून जात नव्हता. 'असं कोणाला समजून घ्यायच्या आधी त्यांच्यावर चिडणं हा माझा स्वभाव कधीच नव्हता. काय माहित मला आज काय झालं. गेल्या काही वर्षात मी एवढं काही गमावलं आहे की आता ह्या मुलांना काही झालेलं मी सहन नाही करू शकणार म्हणूनच कदाचित मी अशी रिऍक्ट झाले असेन. आणि विराज, तो तसा चांगला मुलगा वाटतो. जबाबदारीची जाणीव असलेला. मी जरा बाकीच्यांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे', मीरा स्वतःशीच विचार करत होती. ते काही नाही, मी मि.मोहितेंची माफी मागितली पाहिजे.
काका गेल्यांनतर ऑफिसची सगळीच जबाबदारी मीरावर आली होती. अन आता तर काकाही नव्हते तिला अडलेल्या केसेसमध्ये मदत करायला. त्यामुळं तिच्या कामाचं प्रेशर खूपच वाढलं होतं. काकू तिला एक-दोनदा म्हणाल्या होत्या, "मीरा आता हे नाहीयेत तर तुला हवं तर तू दुसरीकडे कुठेतरी नोकरी बघू शकतेस, तुला एकटीला आपली लॉ फर्म सांभाळणं कठीण जात असेल, कळतंय मला".
पण मीराला ते अजिबात मान्य नव्हतं, "असं कसं करेन मी काकू, ही लॉ फर्म आपल्या काकांचं स्वप्न होतं. त्यांनी किती विश्वासाने ते माझ्या हातात दिलं. आता ते कोणातरी तिसऱ्याच्या हातात देणं मला नाही जमणार. थोडं कठीण जाईल, जास्त काम करावं लागेल एवढंच ना? करेन की मी",मी म्हणून मीराने काकूंचा प्रस्ताव नाकारला.
"खरंच मीरा, किती करतेस तू या घरासाठी. ह्यांना तुझं फार कौतुक होतं. एवढ्या लहान वयात तू कंपनीची जबाबदारी घेतलीस, घर संभाळलंस, आत माझी काळजी घेतेस. सख्ख्या मुलाने जे केलं नाही ते सगळं तू केलंस आणि अगदी मनापासून केलंस. पण आता तू तुझ्या आयुष्याचा पण विचार केला पाहिजेस. अवि तुझ्या आयुष्यातून जाऊन किती वर्ष झाली, पण तू दुसऱ्या कोणाचा विचारच नाही केलास, तुला मान्य असेल तर मी बघू का मुलं तुझ्यासाठी? काही गोष्टी वेळच्या वेळी होऊन गेलेल्या बऱ्या असतात", काकू मीराचा हात हातात घेत म्हणाल्या. पण मीराने तो विषय टाळला. ती काही मुद्दामून लग्न टाळत नव्हती, पण अविनंतर पुन्हा कोणावर एवढा जीव लावावा असं तिला वाटलंच नाही. त्याबरोबर येणाऱ्या अपेक्षा आणि त्यानंतर अपेक्षाभंगाचं दुःख हे सगळं तिला पुन्हा नको होतं. म्हणून तिने तिचं काम तिचं आयुष्य बनवलं होतं. आणि ती लग्न करून गेल्यावर काकूंकडे कोण बघणार ह्याची पण काळजी तिला होतीच.
रात्री जेऊन मीरा झोपायला जात असताना तिचा फोन वाजला. आश्रमातून सदा काकांचा फोन होता, परीला खूप ताप आला होता आणि तापात ती सतत मीराचं नाव घेत होती. मीरा फोन ठेऊन तडक आश्रमाकडे निघाली. ती तिकडे पोचली तेव्हा डॉक्टर आधीच तपासून, औषध देऊन गेले होते आणि परी शांत झोपली होती. मीराने तिच्याजवळ जाऊन अलगद तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला परीमध्ये कायम तिचं लहानपण दिसायचं. तिच्याएवढी असतानाच मीरा आश्रमात आली होती. आश्रमाची सवय व्हायला, इकडच्या सगळ्यांशी मैत्री करायला तिला कठीण जात होतं. पण तेव्हाच शकुंतला ताई तिच्या आयुष्यात आल्या आणि तिचं आयुष्यच बदललं. परीचं आणि मीराचं नातं पण तसच होतं. आणि आज तिला असं आजारी बघून मीराच्या डोळ्यात पाणी आलं.
"मीरा? तू एवढ्या रात्री इकडे?", मागून आलेल्या आवाजाने मीराने चमकून बघितलं. दारात विराज उभा होता.
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा