विराज घरी येऊन बरेच दिवस होऊन गेले होते, पण त्यानंतर त्याची आणि मीराची भेटच झाली नव्हती. आश्रमातही दोघांची चुकामुक होत होती. तिच्यापर्यंत कसं पोहोचावं ते विराजला कळत नव्हतं. शेवटी एक दिवस त्याने हिम्मत करून काकूंकडून मीराचा फोन नंबर घेतला आणि तिला कॉल केला.
"हॅलो, कोण बोलतंय?", पलीकडून मीराचा आवाज ऐकून विराजच्या चेहऱ्यावर हलकं स्माईल आलं.
"हाय, विराज बोलतोय. सॉरी असा अचानक कॉल केला. कामात नाहीयेस ना?", विराजने आपला आनंद लपवत विचारलं.
"विराज? काय रे? आश्रमात सगळं ठीक आहे ना? मुलं बरी आहेत ना? काही काम होतं का?", मीराने काळजीने विचारलं. अचानक आलेल्या विराजच्या फोनने तिला टेन्शन आलं होतं.
"हो हो हो, मुलं आश्रम सगळे मजेत आहेत. मी सहजच केला होता अगं फोन. म्हंटलं बरेच दिवसात भेट नाही झाली म्हणून बघूया काय चाललंय. आजकाल आश्रमात येत नाहीस का तू?", तिने त्याला अजिबात मिस केलं नाहीये हे बघून विराजला थोडं वाईट वाटलं.
"अरे मी सध्या ऑफिसनंतर जाते आश्रमात. गेले काही शनिवार रविवार जरा कामात होते त्यामुळे जमत नव्हतं. तू काय म्हणतोयस?", मीरा ने विचारलं.
"मी मजेत, आज दुपारी माझं तुझ्या ऑफिसच्या बाजूला काम होतं, म्हणून म्हंटलं बघूया वेळ आहे का तुला. एकत्र लंच करूया?", विराजने आशेने विचारलं.
"मला नक्की आवडलं असतं रे, पण काम खूप राहिलंय. आज जरा वेळेवर घरी जाईन असा विचार करतेय. गेले काही दिवस कामामुळे काकूंना पण वेळ देता आला नाहीये", मीरा टेबलावरचे पेपर्स नजरेखालून घालत म्हणाली.
तिच्या बोलण्याने विराजचा जरा हिरमोड झाला, नाईलाजाने त्याने फोन ठेवला.
संध्याकाळी मीरा वेळेत काम संपवून घरी आली तेव्हा दारातच तिला काकूंच्या हसण्याचा आवाज आला. ती आत आली तेव्हा काकू आणि विराज समोरच गप्पा मारत बसलेले. त्याला घरी बघून मीराला आश्चर्य वाटलं.
"अगं मीरा? आज वेळेवर आलीस एकदम, जा हात पाय धुवून ये, आत्ताच चहा टाकलाय. हा विराज काय एक एक किस्से सांगतोय, हसून हसून पोट दुखलं माझं", काकू मीराकडे बघून म्हणाल्या.
चहा घेऊन गप्पा मारून झाल्यावर काकू मीराला म्हणाल्या, "मीरा ह्याला आपलं घर दाखव ना. माझ्याशी गप्पा मारून कंटाळला असेल तो".
"नाही काकू, असं काही नाही. मला मज्जा येत्ये", विराज एकदम अवघडून म्हणाला.
"हो का? मग माझ्याशीच गप्पा मारत बसायचंय का?", काकू त्याच्याकडे बघून डोळे वटारून म्हणाल्या आणि विराजला त्यांच्या प्रश्नाचा रोख कळला. तसा तो उठून मीरा बरोबर जायला निघाला.
पूर्ण घर, अंगण दाखवून झाल्यावर मीरा विराजला घेऊन गच्चीत आली. रात्रीचा हवेतला गारवा, बंगल्याच्या आसपास लावलेल्या झाडांच्या फुलांचा वास, आकाशातला पौर्णिमेचा चंद्र.. एकदम मस्त वातावरण होतं. "काय मस्त घर आहे तुमचं. पुण्यात आजकाल असे प्रशस्त बंगले, अंगण सहज नाही मिळत", विराज मीराकडे बघत म्हणाला.
पौर्णिमेच्या चांदण्यात नाहिलेल्या तिच्या चेहऱ्याकडे विराज बघतंच राहिला. मीरा त्याला उत्साहाने घराबद्दल, काका काकूंबद्दल सांगत होती. तिच्या प्रत्येक वाक्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव, तिच्या बोलक्या डोळ्यातले भाव, तिच्या आवाजातला चढ-उतार हे सगळं विराज त्याच्या मनात टिपत होता. तिच्याबरोबर असा एकांत मिळाल्याबद्दल त्याने काकूंचे मनातल्या मनात आभार मानले. शेवटी ही आयडिया त्यांचीच होती. दुपारी मीराने लंच साठी नाही म्हंटल्यावर हताश झालेल्या विराजने काकूंना फोन केला आणि त्यांनी त्याला संध्याकाळी घरी बोलवून हा सगळा प्लॅन बनवला होता.
"सॉरी, मी तुला बोअर करतेय का? कधीपासून मीच बोलतेय, तू बोलतच नाहीयेस", त्याला बराच वेळ शांत उभं असलेलं बघून मीराने विचारलं.
तसा विराज हसला, "काय करू, इतकं सुंदर वातावरण आहे, म्हणून एन्जॉय करतोय. मला काय करावंसं वाटतंय सांगू का?", विराजने खिशातून हेडफोन्स काढत विचारलं. "हे घे, हे घाल कानात", म्हणून विराजने मीराच्या कानात हेडफोन्स ची एक बाजू आणि दुसरी बाजू आपल्या कानात घालून मोबाईलवर गाणं लावलं.
' दीवाना हुआ बादल , ये देख के दिल झूमा, ली प्यार ने अंगड़ाई
दीवाना हुआ बादल, सावन की घटा छाई, ये देखके दिल झूमा
ली प्यार ने अंगड़ाई, दीवाना हुआ बादल'..
मीराबरोबर असं एकत्र गाणी ऐकताना विराजच्या मनात तिच्यासाठी एक वेगळीच भावना उमलत होती. आयुष्यात एवढं पूर्ण त्याला आधी कधीच वाटलं नव्हतं.
"काय कमाल असते ना जुन्या गाण्यांची मीरा. इतके वर्षांनंतर पण ऐकताना अंगावर काटा येतो. मला असं एकटंच जुनी गाणी ऐकायला फार आवडतं. आज पहिल्यांदाच कोणाबरोबर तरी हा अनुभव असा शेअर करतोय मी. पण मला खूप छान वाटतंय", बोलण्याच्या ओघात त्याने त्याचा हात गच्चीच्या कठड्यावर ठेवला आणि त्याच्या नकळत त्याचा हात मीराच्या हातावर विसावला. एकच हेडफोन्स शेअर करत असल्यामुळे त्यांची डोकी जवळपास एकमेकांना टेकली होती. मीराने अलगद तिचं डोकं विराजच्या खांद्यावर ठेवलं. रफींच्या आर्जवी आवाजातल्या त्या गाण्याने तिच्या मनाच्या कोपऱ्यात बंद असलेल्या आठवणी हळूहळू बाहेर येत होत्या. तिच्या डोळ्यातून आलेले अश्रू अलगद ओघळून विराजच्या हातावर पडले.
"मीरा, काय झालं?", त्याने विचारलं.
"काही नाही रे अवि, तुला तर माहितीच आहे मी ही जुनी गाणी ऐकताना किती भावुक होते", मीराने पटकन डोळे पुसत विराजकडे बघितलं आणि पुढच्याच क्षणाला तिला तिची चूक कळली. 'मी विराजला अवि म्हणाले?'. अंगावर वीज पडावी तशी ती कानातले हेडफोन्स काढून विराजपासून लांब झाली. तिच्या मनाच्या कमकुवतपणाची आणि आपण असं कुठल्या तिसऱ्या माणसासमोर तो दाखवत असल्याची लाज आणि चीड तिच्या चेहऱ्यावर पसरत होती. तिचा चेहरा गरम झाला होता. गालांवर लाजेची लाल छटा पसरली होती. तिने महत्प्रयासाने विराजकडे बघितलं आणि दुसऱ्याच क्षणी ती धावत गच्चीतून निघून गेली.
विराजला झाल्या प्रकारचा उलगडाच होत नव्हता. तो पुन्हा पुन्हा त्याचंच काही चुकलंय का याचा विचार करत होता. शेवटी तो एकटाच गच्चीतून खाली आला. त्याला एवढ्या वेळाने खाली आलेलं पाहून काकू त्याला काहीतरी चिडवणार तेवढ्यात त्यांनी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले. "विराज, काय झालं? आणि मीरा कुठेय?", त्यांनी विचारलं आणि विराजने घडलेला सगळा प्रसंग काकूंना सांगितला. तो सांगत असताना काकूंच्या चेहऱ्यावरचे बदलत चाललेले भाव तो बघत होता. "अवि कोण आहे? आणि मीरा अशी का वागली? तुम्ही त्यादिवशी मला म्हणाला होतात, हे सगळं सोप्पं नसणार आहे. त्याचा मीराच्या आजच्या वागण्याशी काही संबंध आहे का?", सगळं सांगून झाल्यावर विराजने काकूंना विचारलं.
विराजला सगळं सांगायची योग्य वेळ आता आली आहे हे काकूंना कळलं. "ये विराज, बस इकडे. सांगते मी", म्हणून त्यांनी विराजला आपल्या समोर बसवलं आणि घडलेलं सगळं त्याला सांगितलं. ते ऐकताना विराजला मीरासाठी, काका-काकूंसाठी वाईट वाटलं, अविचा रागही आला. सगळं ऐकून घेतल्यावर त्याचं मन सुन्न झालं. मीरासारख्या मुलीच्या नशिबात हे दुःख यावं याचं त्याला मनापासून वाईट वाटलं. पण या सगळ्यापेक्षा एक मोठ्ठा प्रश्न आता त्याला भेडसावत होता. 'त्याच्याही नकळत ज्या मुलीमध्ये तो गुंतत चालला होता, तिने तिच्या उभ्या आयुष्यात फक्त एकाच मुलावर प्रेम केलं होतं आणि कदाचित अजूनही करत होती. त्याला विसरून, त्याने केलेली फसवणूक विसरून ती पुन्हा कधी दुसऱ्या कोणावर प्रेम करू शकेल? माझ्यावर प्रेम करू शकेल?'
क्रमशः..!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा